Sunday, March 27, 2016

मिलिंद प्रश्न

''महाराज, मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे- १. सक्लेश म्हणजे चिकटलेले असे चित्त २. श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त ३. सकृदायामी व्यक्तीचे चित्त ४. आनागामी व्यक्तीचे चित्त ५. अर्हत व्यक्तीचे चित्त ६. प्रत्येक बुध्दाचे चित्त आणि ७. सम्यक सम्बुध्दाचे चित्त.

१. संक्लेश चित्त
''महाराज, लालसेच्या आहारी गेलेले ( रागयुक्त ), दुष्ट मोहात बुडालेले, क्लेशांच्या भोवर्यात सापडलेले चित्त ( मन ) कृत्याची व प्रज्ञेची जाणीव नसलेले अशा लोकांचे चित्त किंवा मन अतिशय जड, विकृत आणि मंद असते.

''ते का बरे? ''

''कारण की, त्यांच्या चित्ताला शिक्षण मिळालेले नसते. म्हणजे त्यावर सुसंस्कार जडलेले नसतात.

''महाराज, समजा एखादा वेळू त्याच्या रांजीतून काढावयाचा असल्यास तो कधीही सहजपणे काढता येणार नाही़. हे काम अत्यंत युक्ती, प्रयुक्ती व हळूहळू करावे लागते. कारण अवाढव्य वाढलेला वेळू आपल्या अनंत व विशाल शाखा संपूर्ण रांजीत पसरविल्यामुळे त्याची परस्परात चांगलीच गुंतागुंत झालेली असते. अशारीतीने फसलेला वेळू कापून काढणे अत्यंत कठीण असते. महाराज, याच उदाहरणाप्रमाणे लालसेच्या आहारी गेलेले.... जे लोक असतात त्यांचे चित्त अतिशय जड, विकृत आणि मंद असते. ''

''ते का बरे? '' तर सालसादी क्लेशांच्या रांजीत पूर्णतः त्याची गुंतागुंत होऊन फसल्यामुळे  होय. या सात प्रकारच्या चित्तांपैकी हा पहिला प्रकार होय.

२. श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त

''दुसर्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते. महाराज, ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ करुन घेतला आहे, जे कधीही वाईट मार्गाने जात नाहीत, ज्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुध्दाच्या धर्माची जाणीव झाली आहे अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयापासून एकदम मुक्त, हलके व गतीमान होत असते. तथापि वरच्या ( आर्यमार्ग ) विषयात त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबतीत ते जड, विकृत आणि मंदच असते. म्हणून त्यांची कार्य ही मंदगतीनेच चालतात. ''

''ते का बरे? '' तर तीन विषयात चित्त एकदम परिपूर्ण परिशुध्द झालेले असते. तथापि बाकीच्या अवस्थांचे बाबतीत चित्ताचे क्लेश ( मळ ) मात्र कायम असतात. महाराज, ज्याप्रमाणे वेळूवांच्या रांजीतील वेळू कापून काढताना तीन पेरांपर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकी वरच्या शाखा तशाच त्या रांजीत गुंतलेल्या अवस्थेत सोडून दिल्यामुळे वेळू ओढताना तीन पेरांपर्यंत पकडावयास किंवा ओढावयास कठीण जाणार नाही़. परंतु बाकी वरचा भाग ओढने अशक्य व कठीणच होते.''

''ते का बरे? ''

''खालचा भाग कापून साफ केला असला तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे. महाराज, याप्रमाणेच ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ केला आहे... अशा लोकांचे चित्त, आत्मभाव, कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयांपासून एकदम मुक्त, हलके व गतीमान होत असते. तरीपण वरच्या विषयावरील त्याला विचार शक्तीच्या कार्यात अडचणी येतात. कारण त्याबाबतीत ते जड, विकृत आणि मंदच असते. ते का म्हणून? तर, ह्या तीन भ्रममूलक बाबी दूर झाल्या असल्या तरी बाकीचे क्लेश अवशिष्ट असल्यामुळेच असे घडते. दुसर्या प्रकारचे चित्त हे असे आहे.

३. सकृदागामी व्यक्तीचे चित्त

''तिसर्‍या प्रकारचे चित्त या दोन्ही प्रकाराहूनही वेगळे असते. ''महाराज, लालसा, द्वेष आणि मोह हे केवळ नाममात्र राहिले आहेत. अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त पाच अवस्थांत एकदम हलके व गतीमान असते. परंतु यापेक्षा उंच अवस्थांत जड, विकृत आणि मंद असते. कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या पाच अवस्थांपर्यंत चित्त परिशुध्द झालेले असले तरी वरच्या अवस्थांत क्लेश अजून शिल्लकच असते. हे असे घडते- महाराज, वेळूवाच्या रांजीमधून कापून काढत असता वेळू पाच पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा प्रशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढावयास मुळीच कठीण जाणार नाही. परंतु वरच्या शाखा प्रशाखा अजून रांजीत परस्परात गुंतुन असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते. का की, वेळू खाली पाच पेरांपर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ न करता असाच सोडून देण्यात आला आहे. महाराज, याप्रमाणेच ज्यांनी सकृदागामी पदाचा लाभ करुन घेतला आहे, त्यांचे चित्त जीवनातील पाच कनिष्ठ अवस्थांपर्यंत एकदम दृतगतीने high speed विचार कार्य करीत असते. का की, येथे ते हलके आणि गतीमान असते. तरीपण यापेक्षा वरच्या अवस्थांत जड आणि मंदच असते. हे तिसर्‍या प्रकारचे चित्त समजावे.''

४. अनागामी व्यक्तीचे चित्त

''चौथ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते.''

''महाराज, ज्यांनी अनागामी नावाची वरची अवस्था गाठली, त्यांचे पाच बंधन आपोआप गळून पडतात आणि जीवनाच्या दहा अवस्थांपर्यंत त्यांचे चित्त एकदम साफ झालेले असते. म्हणून येथपर्यंत विचारशक्ती सुलभतेने व तत्परतेने कार्य करीत असते. का की, चित्त हलके आणि गतीमान असते. परंतु याहीपेक्षा वरच्या भूमीत चित्तास कार्य करावयास बर्याच अडचणी येतात. कारण येथे चित्त जड आणि मंद असते. का की, दहा स्थानांपर्यंत चित्त एकदम परिशुध्द झाले असले तरीपण वरच्या अवस्थेतील चित्तमळ अजून अवशिष्ट असतात. महाराज, वेळवाच्या रांजीतून वेळू कापून काढत असता दहा पेरांपर्यंत समस्त शाखा प्रशाखा तोडून काढल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढणे कठीण नाही़... महाराज, असेच आहे अनागामी अवस्था प्राप्त करणार्या व्यक्तीचे चैतासिक दहा स्थानांपर्यंत चित्त दृतगतीने कार्य करण्यास त्यास कठीण जात नाही़, परंतु यापेक्षा वरच्या भूमीत अत्यंत कठीण व मंद गतीने कार्य करणे भाग पडते. का की, दहा स्थानांपर्यंत चित्त एकदमच परिशुध्द झालेले असले तरी बाकीच्या वरच्या अवस्थांत अजून क्लेश शिल्लक राहिलेले आहेत. असे अनागामी पदाचा लाभ करणारे व्यक्ती पुन्हा मानवी जगात कधीही येत नाही. ह्यांचे चित्त चौथ्या प्रकारचे चित्त होय.''

५. अर्हतपद प्राप्‍त व्यक्तीचे चित्त

''पाचव्या प्रकारचे चित्त वरील चार चित्ताहून एकदम वेगळे आहे.

''महाराज, ज्यांनी अर्हतपदाचा लाभ करुन घेतला आहे. ज्यांचे चारही आश्रव तुटून पडले, ज्यांचे क्लेश-मळ सर्वस्वी नाहीसे झाले, चित्त निर्मळ व स्वच्छ झाले, ज्यांचे ब्रह्मचर्य जीवन सफल झाले, अडचणीचे ओझे उतरले, कार्यसिध्दी पूर्णं झाली, ज्यांना सत्यज्ञानाचा साक्षात्कार झाला, ज्यांचे समस्त भावबंधणे नष्ट होऊन चित्त पुर्णत: विशुद्ध झाले. त्यामुळे आता पुनर्जन्माची बेडी कायमची तुटली. श्रावकांनी मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत ज्यांच्या चित्ताने सफलता प्राप्त केली आहे. म्हणजे यांत ते हलके व तत्पर आहे. परंतु प्रत्येक बुध्दाच्या भूमी संबंधाने ते अजूनही जड व मंदच असते. ते का बरे? श्रावकाच्या भूमीकेत त्याचे चित्त एकदम परिशुध्द झाले असले, तरी प्रत्येक बुध्दाच्या भूमीके संबंधाने अजून शुद्ध झालेले नाही.

''महाराज, वेळवाची संपूर्ण रांज तोडून एकदम साफ केली असता त्यातील कोणताही वेळू सहजपणे ओढून काढता येतो. महाराज, त्याचप्रमाणे अर्हतपद प्राप्‍त केलेल्या व्यक्तीचे असते. श्रावकाने मानवी जीवनात करावयाच्या किंवा समजून घ्यावयाच्या बाबतीत त्यांचे चित्त एकदम हलके व दृतगतीने कार्य करणारे असले तरी प्रत्येक बुध्दाच्या भूमीकेत जड व मंद गतीनेच त्याला कार्य करावी लागतात. हेच आहे पाचव्या प्रकारचे चित्त.

६. प्रत्येक बुध्दाचे चित्त

''सहाव्या प्रकारचे चित्त पाचही चित्ताहून वेगळे असते. महाराज, ते म्हणजे प्रत्येक बुध्दचित्त. ते स्वतः चा आधार स्वयंमच असतात, त्यांना दुसर्यावर अवलंबून राहण्याची अवश्यकता नसते, त्यांचा कोणी गुरु किंवा आचार्य नसतो. त्यांचे वास्तव्य गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकट्याचेच असते, ते आपल्या जीवनात एकदम निर्मळ व परिशुध्द झालेले असतात, त्यांच्यात कसल्याही प्रकारचा दोष नसतो. त्यांचे चित्त स्वतः संबंधाने अतिशय हलके व गतीमान असते. परंतु सम्यक सम्बुध्दाच्या क्षेत्राच्या बाबतीत जड व मंदच असते. का की, जरी ते प्रत्येक बुध्दाच्या विषयी बिल्कूल परिशुध्द व निर्मळ असले तरीपण सर्वज्ञ बुध्दाचे क्षेत्र विशाल आहे. जे स्वतः प्रज्ञावंत असून दुसर्यांना देखील प्रज्ञेच्या मार्गाने नेतात ते सर्वज्ञ बुध्द होत. असे तरी का व्हावे, तर प्रत्येक बुध्द स्वतः च्या क्षेत्रामध्ये एकदम निष्कलंक असले तरी सम्यक सम्बुध्दाचे क्षेत्र इतके विस्तृत असते की सामान्य बुध्द पोहचूच शकत नाही. त्याच्या चित्ताच्या कार्यशक्तीला तोड नाही़.

''महाराज, समजा एखादा माणूस आपल्या परिसरातील लहान ओढे किंवा लहान नदी तो स्वतः च्या इच्छेनुसार कधीही पार करतो. मग तो दिवस असो की रात्र असो त्याला कशाची भीती वाटत नाही़, परंतु अत्यंत खोल, विशाल, अथांग आणि ज्याचा किनारा दृष्टीस पडत नाही असा महान समुद्र जर त्याने पाहिले तर त्यास काय वाटेल? तो भयभीत होईल आणि पलीकडे जाण्याची हिम्मत चूकूनही करणार नाही. असेच प्रत्येक बुध्दाचे. ते का बरे? तर का की, आपल्या क्षेत्रातील नदीशी तो पूर्णपणे परिचित आहे. परंतु महान समुद्र विशाल आहे. हाच चित्ताचा सहावा प्रकार आहे.''

७. सम्यक सम्बुध्दाचे चित्त

सातव्या प्रकारचे चित्त या सहाही चित्तांहून पूर्णतः वेगळे असते.

''महाराज, ज्यांनी सम्यक सम्बुध्दत्व प्राप्‍त केले त्यांना जगातील सर्वच प्रकारचे ज्ञान असते. अर्थात ते सर्वज्ञ असतात. त्यांना दहा प्रकारची शक्ती लाभलेली असते. म्हणूनच ते दशबल या नावाने संबोधिले जातात. चार प्रकारच्या विशेष ज्ञानावर त्यांचा आत्मविश्वास असतो. बुध्द धर्माची १८ लक्षणे त्यांचे अंगी असतात. त्यांचे इंद्रिये पूर्णतः ताब्यात असतात. त्यांच्या आकलन शक्तीपासून काहीही लपून राहू शकत नाही. अर्थात त्यांचे ज्ञान सर्वत्रगामी असते. समस्त क्षेत्रात त्यांचे चित्त तेजस्वी आणि दृतगामी असते. का की, ते सर्वच प्रकारे एकदम परिपूर्ण व परिशुध्द झालेले असते.

''महाराज, एखादा तीक्ष्णधार लावलेला, कोठेही गंज न लागलेला, अगदी सरळ, गाठरहीत नोकदार आणि कोठेही वळसा नसलेला बाण आहे. तो जर जबरदस्त धनुष्यास जोडून शक्तीशाली तिरंदाजाने एखाद्या पातळ रेशमी किंवा मलमल किंवा पातळ उनी कापडाच्या आडव्या पट्टीवर सोडला तर त्या कापडाने त्यास प्रतिबंध होईल काय? त्याच्या कार्यात मंदपणा येईल काय?

''नाही भंते, धनुष्यामधून अत्यंत वेगाने सुटलेल्या तीक्ष्ण बाणास तेवढ्याशा पातळ कापडाने कसा काय मंदपणा येऊ शकेल? ''

''ते का बरे? ''

''का की, इतके पातळ आणि मऊ कापड आहे आणि बाण तिक्ष्ण असून बाण सोडणारा शक्तीशाली आहे? ''

''महाराज, त्याचप्रमाणे बुध्दत्व प्राप्त केलेल्या लोकांचे चित्त सर्वच विषयात अत्यंत तीक्ष्ण व दृतगती असते. असे का घडते? का की, ते सर्व प्रकारे परिपूर्ण व परिशुध्द असतात, हाच चित्ताचा सातवा प्रकार होय.

''महाराज, हे जे सातव्या प्रकारचे सम्यक सम्बुध्दाचे चित्त आहे, ते बाकी सर्व चित्तांपेक्षा सर्वच प्रकारने श्रेष्ठ असते. ते आपल्या अपरिमित गुणामध्ये हलके व शुद्ध असे असते. महाराज, त्यांचे चित्त इतके हलके आणि शुद्ध असल्या कारणानेच भगवान सम्यक सम्बुध्द दोन्ही प्रकारच्या ऋध्दीशक्ती दाखवू शकतात. यावरुनच त्यांच्या चित्ताची शुध्दता व हलकेपणा  दिसून येतो, याशिवाय त्या ऋध्दीशक्तींचे दुसरे कोणते कारण दिसत नाही. या ऋध्दीशक्तींचे सुध्दा भगवान बुध्दाच्या चित्ताशी तुलना केली तर त्याही अत्यल्प वाटतात. तरीपण भगवान बुध्दांची सर्वज्ञाता 'अवर्जन' प्रतिबध्द ( इच्छा करताच सिध्द होणारी ) अशी होती. ज्या गोष्टी जाणून घ्यावयाच्या आहेत  त्या क्षणात चिंतन ( ध्यान ) करुन बुध्द जाणून घेत असत. यातच त्यांची सर्वज्ञता होती.

''महाराज, जसा कोणी मनुष्याने अगदी सुलभतेने एखादी वस्तू आपल्या हातातून दुसर्याच्या हातात द्यावी, तोंड उघडताच आवाज केला जावा; तोंडात पडलेला घास गिळून टाकावा, डोळे मिटल्यावर ते उघडता यावे, हात मागेपुढे करावे. याप्रमाणे किंवा याहीपेक्षा अधिक सुलभतेने बुध्द आपल्या सर्वज्ञतेच्या बळावर जी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असेल ती जाणून घेत असत. तथापि ते ध्यानावस्थेत जरी नसले तरी त्यांना सर्वज्ञ या संबोधाशिवाय दुसरे संबोधन त्यांच्याकरीता लावता येणार नाही़.''

Saturday, March 26, 2016

मिलिंद प्रश्न

''भंते नागसेन, भगवान बुध्दांनी संबोधीचा लाभ करुन आपल्यामधील समस्त अकुशल कर्मे किंवा पापे जाळून टाकली होती की, त्यापैकी काही शिल्लक राहिली होती?''

''महाराज, समस्त पापे जाळून टाकल्यामुळेच ते भगवान बुध्द झाले. त्यांच्यात पापांचा ( वाईटांचा ) लवलेशही नव्हता.''

''भंते,  त्यांना कधी तरी शारीरिक पिडा झाली होती काय?''

''होय महाराज, एकदा राजगृह या नगरात भगवान बुध्दाच्या पायात दगडाचा एक लहान अणकुचीदार तुकडा रुतला होता. तसेच एकदा त्यांना अतिसार सुध्दा झाला होता. एकदा पोटात दु:खू लागल्यामुळे जीवक वैद्याने त्यांना जुलाब देखील दिला होता. एकदा वायुचा प्रकोप झाल्यामुळे स्थविर आनंद यांनी गरम पाणी आणून दिले होते.''

''भंते, भगवान बुध्दाने समस्त क्लेश जाळून जर बुध्दत्वाचा लाभ केला होता, तर त्यांना शारीरिक पीडा भोगाव्या लागल्या होत्या़, हे विधान खोटे ठरते आणि त्यांना शारीरिक कष्ट भोगावे लागले होते, हे विधान खरे मानावे तर त्यांनी आपले सर्व क्लेश जाळून टाकले होते, असे केलेले विधान पूर्णपणे खोटे ठरते. भंते, कर्मावाचून कधी सुख-दु:ख होऊ शकत नाही. सर्व सुखदु:खाचे मुळ कर्म आहे. हे सुध्दा एक कोडे आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. आपण उलगडा करुन समजावून सांगावे.''

''नाही़ महाराज, सर्वच वेदनांचे मूळ कर्मात नाही. ज्या कारणांमुळे संसारातील सर्वच प्राणी सुख-दु:ख भोगतात, त्यांचीही आठ कारणे आहेत - १. वायु प्रकोप होणे, २. पित्त प्रकोप होणे, ३. कफाची वृध्दी होणे, ४. सन्निपाताचा दोष उद्भवणे, ५. ऋतु बदल होणे, ६. खान पानात गडबड होणे, ७. नैसर्गिक इतर प्रभाव आणि ८. आपल्या कर्माचे फळ. याच कारणांमुळे सर्व प्राणीमात्रास सुख दु:खे भोगावी लागतात. महाराज, कर्माच्या फळाशिवाय सुखदु:खाचे दुसरे कारण असू शकत नाही, असे मानणारे चुकीचे विधान करतात.''

''भंते नागसेन, तरीपण याशिवाय दुसर्या सात कारणांचे मूळही कर्मच आहे. कारण ते सुध्दा सर्व कारणांमुळे उत्पन्न होतात.''

''महाराज, जर सर्वच दु:खे कर्माच्याच कारणाने उत्पन्न होतात, असे मानले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारात विभक्त करता येणार नाही़. महाराज, वायुचा प्रकोप होण्याची दहा कारणे आहेत- १. थंडीमुळे, २. उष्णतेमुळे, ३. भुकेमुळे, ४. तहानेमुळे, ५. अतिभोजनामुळे, ६. अधिक वेळ एकसारखे उभे राहिल्यामुळे, ७. अतिपरिश्रमामुळे, ८. अतिवेगाने चालण्यामुळे, ९. नैसर्गिक प्रभावामुळे आणि १०. आपल्या कर्माच्या फळामुळे. या दहा कारणांपैकी पहिली नऊ कारणे मागील किंवा पुढील जन्मी आपला परिणाम घडवीत नाहीत तर केवळ याच जन्मी परिणाम घडवितात. म्हणून सर्वच सुखदु:खे कर्माच्याच कारणाने परिणामकारक ठरतात, असे म्हणता येत नाही़.

''महाराज, पित्ताचा प्रकोप होण्याची तीन कारणे आहेत - १. थंडी, २. उष्णता, ३. अनियमित भोजन तसेच महाराज, कफ वृध्दीचे सुध्दा तीन कारणे आहेत- १. थंडी, २. उष्णता आणि ३. खाण्यापिण्यातील दोष. या तिन्हीपैकी एखादे जरी बिघडले तरी त्यामुळे वेदना होतात. ह्या वेगवेगळ्या वेदना आपापल्या स्वतंत्र कारणामुळेच होत असतात. महाराज, याप्रमाणे कर्म फळामुळे होणारी दु:खे थोडी आहेत, परंतु अधिक दु:खे तर इतर कारणांमुळेच होणारी आहेत. तथापि मूर्ख लोक मात्र सर्व प्रकारच्या दु:खाची मुळे कर्मफळात आहेत, असे समजतात. कोणाचे कर्मफळ कशात आहे, हे भगवान बुध्दावाचून कोणीही सांगू शकत नाही.''

महाराज, भगवान बुध्दाच्या पायास दगडाचा एक लहानसा अणकुचीदार तुकडा लागून जी दुखापत झाली होती ती वायू किंवा पित्तादी प्रकोपामुळे नाही तर संयोगवश बाह्य कारणामुळेच झाली होती. महाराज, शेकडो-हजारो वर्षांपासून भगवान बुध्दाबद्दल देवदत्ताच्या मनात वैरत्व चालून राहिले होते. त्याच वैरामुळे देवदत्ताने एका पहाडाच्या उतारावरुन खालच्या रस्त्याने चालत जात असलेल्या भगवान बुध्दाच्या डोक्यावर पडेल अशा बेताने फार मोठा धोंडा लोटला, परंतु मध्येच दोन धोंडे आडवे आल्यामुळे तो धोंडा त्यात अडकून राहिला. एवढेच की, त्या धोंड्याशी टक्कर होऊन त्यातील एक लहानसा पापुद्रा उसळून भगवान बुध्दाच्या पायास लागून रक्त आले. महाराज, यामुळे भगवान बुध्दाला जे दु:ख झाले ते एकतर त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसर्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही. जसे एखादे बीज उगवत नाही. त्याचे कारण जमीन चांगली नसावी किंवा बीजातच काही दोष असावा. तसेच अन्न पचन होत नाही़, याचे कारण पोटात काहीतरी दोष असावा किंवा अतिभोजन झाले असावे, हेच याचे कारण असू शकते. तद्वतच महाराज, भगवान बुध्दाला ते झालेले दु:ख त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसर्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही.

''महाराज, भगवान बुध्दास त्यांच्या स्वतःच्या कर्मफळामुळे किंवा खानपानाच्या दोषामुळे कधीही दु:ख झालेले नाही़. हे खरे की, इतर सहा कारणांपैकी कोणत्या तरी एकामुळे कधी शारीरिक पीडा होत असते. तथापि त्यामुळे भगवान बुध्दाच्या जीवनाचा अंत होईल इतकी शक्ती त्यात मुळीच नव्हती. महाराज, चार महाभूतांपासून बनलेल्या या शरीराला थोडेफार सुख-दु:ख तर होतच असते.''

''महाराज, समजा एखादे लहानसे मातीचे ढेकूळ वर फेकले असता ते परत जमीनीवरच येऊन पडते. म्हणजे जमीनीने पूर्वी केलेल्या कृत्याचे हे फळ आहे म्हणून ते तिच्यावर जोराने येऊन आदळते असे समजावे काय? ''

''नाही़ भंते, जमीनीचे चांगले अगर वाईट कर्म ते काय असणार की ज्यायोगे तिला सुख-दु:खे भोगावी लागतात! ते जमिनीच्या कर्मफळामुळे नव्हे तर दुसर्याकडून वर फेकले गेल्यामुळे अशारीतीने येऊन पडते.''

''महाराज, बरोबर याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुध्दास पृथ्वी समजावे. कोणत्याही कर्मफळापासून ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन आदळते. त्याप्रमाणे कोणत्याही कर्मफळावाचून भगवान बुध्दाच्या पायावर तो दगडाचा पापुद्रा पडला, असेच समजावे.

''महाराज, लोक जमीन खणतात किंवा तिची कुळकाठी काढतात. तेव्हा हे तिच्या पूर्व कर्माच्या फळामुळे असे घडते, असे मानावे काय? ''

''नाही़ भंते''

''महाराज, भगवान बुध्दाच्या पायास दगडाचा एक तुकडा लागला होता, त्याचेही असेच आहे. भगवान बुध्दाला अतिसार झाला होता, तो सुध्दा त्यांच्या कर्मफळामुळे नाही़ तर सन्निपातामुळे होय. यात कर्मफळ व सन्निपात याचा तिळमात्र संबंध येत नाही. याशिवाय आणखी जे काही दु:ख तथागताला झाले होते त्याचे कारण त्यांचे स्वतः च्या कर्मफळात नसून त्या सहा दुसर्या दोषांत आहेत. महाराज, संयुक्त निकायातील मोलियसीवक सुत्तात स्वतः देवाधिदेव भगवान बुध्दानेच म्हटले आहे की, 'सीवक, संसारात काही यातना तर पित्त प्रकोप पावल्यामुळे होतात. याची जाणीव स्वतः ला देखील होऊ शकते आणि हीच बाब दुसरे सर्वच लोक कबुल करतात. सीवक सर्व प्रकारची सुख-दु:खे किंवा अन्य कष्ट प्राणीमात्रास भोगावे लागतात, याचे कारण केवळ त्याचे स्वतःचेच पूर्वजन्मीचे कर्मफळ होय, असे जे काही श्रवण परिव्राजक निर्ग्रथ मानतात ते स्वतःच्याच ज्ञानाची फसवणूक करीत आहेत व लोकांच्या अनुभवाची ते पायमल्ली करतात, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मी म्हणतो की, त्यांचे असे मत चुकीचे आहे. कफ, वायू, सन्निपात इत्यादी समस्त बाह्य दोषांपासून उद्भवणार्या कष्ट व यातना यासंबंधी देखील असेच समजले पाहिजे. याविषयी स्वतः च समजून घेतले पाहिजे आणि समस्त लोक देखील असेच मानतात. सीवक, सर्वच सुख, दु:ख, उपेक्षा व वेदना भोगाव्या लागतात त्या स्वतःच्याच पूर्वजन्मीच्या कर्माच्या फळामुळे होते, असे जे काही दुसरे श्रमण-ब्राह्मण म्हणतात, ते आपल्या स्वतःच्याच ज्ञानाची व इतर लोकांच्या अनुभवाची अवहेलना करतात. त्याप्रमाणे ते दोन्ही दृष्टीने केवळ लोकांची फसवणूक करीत असल्यामुळे मी म्हणतो की, त्यांचे असे म्हणने एकदमच चुकीचे आहे.''

''महाराज, यावरुन असाच सारांश निघतो की, सर्वच दु:खाचे वा कष्टाचे कारण आपल्या पूर्वजन्मीचे कर्मफळ नाहीत. तेव्हा आता तुम्ही भगवान बुध्दाने आपल्या बुध्दत्व प्राप्तीपूर्वी सर्वच पापांना ( क्लेशांना ) जाळून टाकले होते, हे विधान विश्वासपूर्वक मानावयास पाहिजे.''

''बरोबर आहे भंते, आपले म्हणने. हे मी सहर्ष स्वीकार करतो.''

Sunday, March 13, 2016

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते! विज्ञान, प्रज्ञा आणि जीव ( आत्मा ) हे तिन्ही शब्द; अक्षर आणि अर्थ या दोन्ही दृष्टीने वेगवेगळे आहेत की एकाच अर्थाची ही वेगवेगळी नावे आहेत? ''

स्थविर नागसेन म्हणाले, 'जाणीव करुन घेणे' ही विज्ञानाची ओळख आहे. त्यातील 'गुढार्थ व भाव यासह समजून घेणे' ही प्रज्ञेची ओळख आहे आणि आत्मा नावाची तर कोणतीच वस्तू अस्तित्वात नाही.''

''भंते, जीव म्हणून काही एक अस्तित्वात नाही असे आपण म्हणता तर डोळ्याद्वारे रुपाला पाहण्याचे, कानाद्वारे शब्द ऐकण्याचे, नाकाद्वारे वास घेण्याचे, जीभेद्वारे स्वाद घेण्याचे, शरीराद्वारे स्पर्शानूभव करण्याचे आणि मनाद्वारे विषयधर्म समजावून घेण्याचे कार्य कोण करतो? ''

''महाराज, आपल्या म्हणण्याप्रमाणे शरीरात वास्तव्य करीत असूनही शरीरापासून अगदी वेगळा असा डोळ्याच्या साह्याने रुप पाहणारा, नाकाच्या साह्याने सुगंध घेणारा, जिभेच्या साहाय्याने स्वाद घेणारा, शरीराच्या साहाय्याने स्पर्शानुभव करणारा आणि मनाच्या साहाय्याने विषय धर्माची जाणीव करुन घेणारा असा जीव ( आत्मा ) आहे तर डोळे काढल्यानंतर त्या मोठ्या छिद्रातून त्याला ( आत्म्याला ) चांगले स्पष्ट रुप दिसत असावे, कानात गरम लोखंडी सळई टाकून कानाची छिद्रे मोठी केल्यानंतर त्याला अधिक स्पष्ट ऐकू येत असावे, नाक कापून काढल्यानंतर नाकाची भोके मोठी झाल्याने चांगला सुगंध घेता येत असावा, जीभ जर ओढून बाहेर काढली तर अधिक चांगला स्वाद घेता येत असावा, शरीराचे कापून तुकडे केले असता नि:शरीर उघड्यावर तो आल्याने चांगल्याप्रकारे स्पर्श करता येत असावा, कारण यासर्व इंद्रियांचा तो खिडक्या प्रमाणे उपयोग करीत आहे ना! जर खिडकी अधिक उघडली तर बाहेरील दृश्य अधिकच स्पष्ट दिसू लागते आणि एकदमच खिडकी काढून टाकली तर बाहेरील दृश्य एकदमच साफ दिसू लागते. असेच तुमच्या जीवाचे सुध्दा होत असावे.

''नाही भंते, असे काही घडत नाही.''
''महाराज, असे जर घडत नाही तर आमच्या आत बसणारा असा कोणीही जीव ( आत्मा ) नाही, हेच यावरुन सिध्द होते. ''

''भंते, फार छान. ''

» अरुप धर्मासंबंधी स्थविर म्हणाले, ''महाराज, भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे. ''

''भंते, ते कोणते कार्य बरे? ''

''महाराज, ते म्हणजे एकाच वस्तूच्या आलंबनावर ( विषयांवर ) अवलंबून असलेले चित्त आणि रुप-रहित धर्माचे ( विषयाचे ) विश्लेषण त्यांनी केले आहे. आणि असेही त्यांनी सांगितले की, याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात, याला संज्ञा म्हणतात, याला चेतना म्हणतात आणि याला चित्त असे म्हणतात. ''

''कृपाकरुन उदाहरणाने स्पष्ट करावे. ''

''महाराज, समजा कोणी एक मनुष्य नावेत बसून समुद्राच्या मध्येभागी जाऊन समुद्राचे ओंजळभर पाणी हातावर घेवुन त्याची चव घेऊ लागला की, हे गंगा नदीचे पाणी आहे, हे यमुना नदीचे पाणी आहे, हे अचिरावतीचे पाणी आहे, हे सरयूचे आणि हे मही नदीचे पाणी आहे, तर असे त्या पाण्याच्या चवीवरुन तो मनुष्य त्या त्या नद्यांचे पाणी सांगू शकेल काय? ''

''भंते, असे सांगणे तर एकदमच अवघड आहे.''

''महाराज, एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असणारे रुप-रहित चित्त ( मन ) आणि चैतासिक धर्म या़ंचे विश्लेषण करणे हे त्याहीपेक्षा अवघड कार्य आहे. पण ते भगवान बुध्दाने केले आहे.''

''भंते ठिक आहे.''

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...