Sunday, March 13, 2016

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते! विज्ञान, प्रज्ञा आणि जीव ( आत्मा ) हे तिन्ही शब्द; अक्षर आणि अर्थ या दोन्ही दृष्टीने वेगवेगळे आहेत की एकाच अर्थाची ही वेगवेगळी नावे आहेत? ''

स्थविर नागसेन म्हणाले, 'जाणीव करुन घेणे' ही विज्ञानाची ओळख आहे. त्यातील 'गुढार्थ व भाव यासह समजून घेणे' ही प्रज्ञेची ओळख आहे आणि आत्मा नावाची तर कोणतीच वस्तू अस्तित्वात नाही.''

''भंते, जीव म्हणून काही एक अस्तित्वात नाही असे आपण म्हणता तर डोळ्याद्वारे रुपाला पाहण्याचे, कानाद्वारे शब्द ऐकण्याचे, नाकाद्वारे वास घेण्याचे, जीभेद्वारे स्वाद घेण्याचे, शरीराद्वारे स्पर्शानूभव करण्याचे आणि मनाद्वारे विषयधर्म समजावून घेण्याचे कार्य कोण करतो? ''

''महाराज, आपल्या म्हणण्याप्रमाणे शरीरात वास्तव्य करीत असूनही शरीरापासून अगदी वेगळा असा डोळ्याच्या साह्याने रुप पाहणारा, नाकाच्या साह्याने सुगंध घेणारा, जिभेच्या साहाय्याने स्वाद घेणारा, शरीराच्या साहाय्याने स्पर्शानुभव करणारा आणि मनाच्या साहाय्याने विषय धर्माची जाणीव करुन घेणारा असा जीव ( आत्मा ) आहे तर डोळे काढल्यानंतर त्या मोठ्या छिद्रातून त्याला ( आत्म्याला ) चांगले स्पष्ट रुप दिसत असावे, कानात गरम लोखंडी सळई टाकून कानाची छिद्रे मोठी केल्यानंतर त्याला अधिक स्पष्ट ऐकू येत असावे, नाक कापून काढल्यानंतर नाकाची भोके मोठी झाल्याने चांगला सुगंध घेता येत असावा, जीभ जर ओढून बाहेर काढली तर अधिक चांगला स्वाद घेता येत असावा, शरीराचे कापून तुकडे केले असता नि:शरीर उघड्यावर तो आल्याने चांगल्याप्रकारे स्पर्श करता येत असावा, कारण यासर्व इंद्रियांचा तो खिडक्या प्रमाणे उपयोग करीत आहे ना! जर खिडकी अधिक उघडली तर बाहेरील दृश्य अधिकच स्पष्ट दिसू लागते आणि एकदमच खिडकी काढून टाकली तर बाहेरील दृश्य एकदमच साफ दिसू लागते. असेच तुमच्या जीवाचे सुध्दा होत असावे.

''नाही भंते, असे काही घडत नाही.''
''महाराज, असे जर घडत नाही तर आमच्या आत बसणारा असा कोणीही जीव ( आत्मा ) नाही, हेच यावरुन सिध्द होते. ''

''भंते, फार छान. ''

» अरुप धर्मासंबंधी स्थविर म्हणाले, ''महाराज, भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे. ''

''भंते, ते कोणते कार्य बरे? ''

''महाराज, ते म्हणजे एकाच वस्तूच्या आलंबनावर ( विषयांवर ) अवलंबून असलेले चित्त आणि रुप-रहित धर्माचे ( विषयाचे ) विश्लेषण त्यांनी केले आहे. आणि असेही त्यांनी सांगितले की, याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात, याला संज्ञा म्हणतात, याला चेतना म्हणतात आणि याला चित्त असे म्हणतात. ''

''कृपाकरुन उदाहरणाने स्पष्ट करावे. ''

''महाराज, समजा कोणी एक मनुष्य नावेत बसून समुद्राच्या मध्येभागी जाऊन समुद्राचे ओंजळभर पाणी हातावर घेवुन त्याची चव घेऊ लागला की, हे गंगा नदीचे पाणी आहे, हे यमुना नदीचे पाणी आहे, हे अचिरावतीचे पाणी आहे, हे सरयूचे आणि हे मही नदीचे पाणी आहे, तर असे त्या पाण्याच्या चवीवरुन तो मनुष्य त्या त्या नद्यांचे पाणी सांगू शकेल काय? ''

''भंते, असे सांगणे तर एकदमच अवघड आहे.''

''महाराज, एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असणारे रुप-रहित चित्त ( मन ) आणि चैतासिक धर्म या़ंचे विश्लेषण करणे हे त्याहीपेक्षा अवघड कार्य आहे. पण ते भगवान बुध्दाने केले आहे.''

''भंते ठिक आहे.''

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...