Tuesday, April 28, 2020

विठ्ठल रामजी शिंदे

वरवर पाहता अखिल भारतखंडात हिंदूंची वर्णव्यवस्था रूढ झालेली जरी दिसत असली तरी तिचा तपशील आणि जोर निरनिराळया प्रांतांत अगदी निराळा आहे. ह्या भिन्नतेचे कारण ब्राह्मणी आणि बौध्द संस्कृतीची भिन्नभिन्न काळी भिन्नभिन्न कारणांनी झालेली झटापट हे होय. पंजाब आणि वायव्येकडील प्रांतांत जी व्यवस्था आहे; ती बिहार, बंगाल, ओरिसाकडे आढळत नाही आणि खाली द्राविड देशात अगदीच निराळी आहे.  बिहार, बंगाल देशांत बौध्द धर्माचा उदय आणि अंमल जारी असल्याने आणि हिंदुस्थानात याच भागात बौध्द धर्म उदय पावून तो येथेच सर्वात अधिक काळ टिकल्याने येथील जातिभेदाची रचना इतर प्रांतांहून अगदी निराळी दिसते. येथे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च वर्णांची जी तुरळक वस्ती आहे ती बाहेरूनच आलेली आहे. वैद्य, कायस्थ हा जो मोठा मध्यमवर्ग आहे, तो क्षत्रिय आणि वैश्य यांचे मिश्रण आहे; आणि बाकी उरलेला जो मोठा बहुजनसमाज तो निर्भेळ आर्येतर आणि एके काळी पूर्ण बुध्दानुयायी होता. बाराव्या शतकात मुसलमानांची अकस्मात धाड येऊन जी राज्यक्रांती झाली तिचा धक्का जीर्ण झालेल्या बौध्द धर्माला लागून, तो नष्ट झाला. मुसलमानी हल्ल्याची ही लाट ओसरून गेल्यावर बौध्दांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी तत्कालीन क्षत्रिय राजांच्या साह्याने समाजाची हल्ली रूढ असेलेली पुनर्घटना केली. ह्या घडामोडीत बल्लाळसेन हा राजा प्रमुख होता. त्याने नवीनच स्मृती बनवून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने आचरणीय, अनाचरणी, अस्पृश्य आणि ग्रामबाह्य वगैरे जनसमूहांचे नवीन वर्ग बनविले.  अर्थात ह्या उलाढालीत एका मोठया नवीनच अस्पृश्यवर्गाची समाजात भर पडली. ही गोष्ट आधुनिक संशोधनामुळे कशी सिध्द होत आहे, ते पाहू. संशोधनाच्या कामी बंगाली पंडितांनी अलीकडे बरीच आघाडी मारली आहे. हिंदुस्थानातून बौध्द धर्म अजीबात नष्ट झाला आहे, अशी अजून पुष्कळांची समजूत आहे.  पण खरा प्रकार तसा नसून बंगालतील काही भागांतून आणि विशेषतः ओरिसातील काही कानाकोपऱ्यात हा धर्म काही अप्रसिध्द आणि मागासलेल्या जातींत अद्यापि प्रचलित आहे; व त्यांची गणना चुकून हिंदू धर्मातच होते, असा शोध प्रसिध्द संशोधक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री ह्यांनी केला आहे. ओरिसात मयूरभंज म्हणून एक लहानसे संस्थान आहे. तेथील महाराजांच्या साह्याने बाबू नगेंद्रनाथ बसू, बंगाली विश्वकोशाचे संपादक, ह्यांनी १९०८ साली त्या संस्थानच्या जंगलात प्रवास केला, तेव्हा त्यांना जे शोध लागले ते त्यांनी इ.स. १९११ साली Modern Buddhism and its Followers in Orissa ('आधुनिक बौध्द धर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी') ह्या नावाच्या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द केले आहेत. त्या पुस्तकाला सदर हरप्रसाद शास्त्री यांनी आपली विस्तृत आणि अधिकारयुक्त प्रस्तावना जोडिली आहे. पान २४ वर शास्त्रीमहाशय लिहितात :  ''इ.स.च्या १२ वे शतकाचे शेवटी मुसलमानांची टोळधाड हिंदुस्थानावर पडली. त्यांनी प्रमुख बौध्द मठांचा आणि विश्वविद्यालयांचा नाश करून त्या ठिकाणी आपल्या लष्कराचे ठाणे केले. हजारो साधूंचा शिरच्छेद करून त्यांची संपत्ती लुटली, पुस्तकालये जाळली,.... ब्राह्मणांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बौध्द हिंदुस्थानातून समूळ नाहीसा झाला असे भासविण्यास सुरुवात केली. सुशिक्षित आणि बुध्दिवान बौध्द मारले गेले, अथवा दूरदेशी पळून गेले. मागे त्यांचा प्रांत ब्राह्मणांच्या कारवाईला मोकळा झाला. पुष्कळ बौध्दांना जबरीने किंवा फुसलावून मुसलमानी धर्मात कोंबण्यात आले. अशिक्षित, बौध्द बहुजनसमाज कोकरांच्या कळपाप्रमाणे निराश्रित झाला. त्याला मुसलमानी किंवा हिंदू धर्माचा नाइलाजाने आश्रय घ्यावा लागला. अशा निराश्रितांपैकी जे पूर्णपणे आपल्या कह्यात येण्यास कबूल होते, त्यांनाच दुराग्रही ब्राह्मणांनी हिंदू धर्मात घेतले. अशांना 'नवशाखा शूद्र' अशी बंगाली समाजात संज्ञा आहे. ह्याशिवाय इतर बौध्दांचा जो मोठा भाग स्वतंत्रपणे राहू लागला, तो बहिष्कृत होऊन अनाचरणीय ऊर्फ अस्पृश्य ठरला.'' ह्या अनाचरणीय जाती हल्ली जरी अस्पृश्य हिंदू समजण्यात येत आहेत, तरी त्या पूर्वी चांगल्या सन्माननीय बौध्द होत्या.  त्यांपैकी हल्ली सर्वच अस्पृश्य नाहीत. नुसत्या अनाचरणीय म्हणजे त्यांचे पाणी ब्राह्मणांस चालत नाही अशा होत. वणिक सोनाराची जात अतिशय श्रीमंत व वजनदार असूनही ती अशीच अनाचरणीय आहे. त्यांची गणना नवशाखा शूद्रांपेक्षाही अधिक खालची गणली जात आहे. ते पूर्वी चांगले बौध्द होते. पण त्यांच्यावर ह्या धांदलीच्या काळात बल्लाळसेन ह्या हिंदू राजाचा काही झनानी कारस्थानामुळे राग होऊन ते असे खाली दडपले गेले. मग इतर सामान्य स्वातंत्र्येच्छू जाती अगदी हीन व अस्पृश्य बनल्या ह्यात काय नवल !  मुसलमानांची पहिली धडाडी संपून त्यांचा जम बसल्यावर आणि बौध्द धर्म दडपून गेल्यावर बंगालमधील हिंदू धर्माची नवी घडी पुनः बसू लागली. ह्यासंबंधी ह्या शास्त्रीपंडिताचे असे मत आहे की, लोकांना आपल्या पूर्वापार खऱ्या संबंधांचा विसर पडला; आणि ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणे हल्लीचे जातिभेद संकरजन्य अगर बहिष्कारजन्य आहेत असा समज दृढ झाला. ह्या नवीन रचनेच्या शिरोभागी ब्राह्मण विराजमान झाले. इतकेच नव्हे, तर उलटपक्षी कित्येक कुशल कारागीर जाती आणि संपन्न व्यापारीवर्गदेखील जे पूर्वी सन्मान्य बौध्द होते, ते या मनूत हीनत्वाप्रत पोहचले. ज्यांच्या पूर्वजांनी काही शतकांपूर्वी बौध्द धर्माची तत्त्वे तिबेट आणि चीन देशात पसरविली, ज्यांनी जलप्रवास करून हिंदुस्थानचा उद्योग आणि व्यापार वाढविला अशी 'मनसार भाषान' इत्यादी आद्य बंगाली ग्रंथांतून भडक वर्णने आहेत, तेच आज केवळ ब्राह्मणांच्या कटाक्षामुळे अनाचरणीय व तिरस्करणीय बनले आहेत !  (Modern Buddhism प्रस्तावना पान २३ पहा.) पण अशा विपन्नावस्थेमध्येही बौध्द धर्म अगदीच नष्ट झाला नसून तो गुप्तरूपाने हीनदीन समाजाच्या वहिवाटीत अद्यापि असला पाहिजे, अशी बळकट शंका आल्यावरून तो शोधून काढण्याचे काम गेल्या शतकाचे शेवटी व चालू शतकाचे आरंभी धाडसी आणि सहानुभूतिसंपन्न शोधकांनी चालविले होते. अशांपैकी एक संशोधक बाबू नगेंद्रनाथ बसू हे ओरिसा प्रांतातील मयूरभंज संस्थानचे मालक महाराज श्री रामचंद्र भंजदेव ह्यांच्याबरोबर त्या संस्थानातील जंगलात फिरत होते. ते खिचिंग नावाच्या खेडयाजवळ पोहचले असता त्यांना 'पान' नावाच्या अस्पृश्य जातीच्या काही तरुण पोरांनी मनोहर गाणी गाऊन दाखविली.  'धर्मगीता' नावाच्या जुन्या ग्रंथाशी त्यांचा संदर्भ जुळल्याने नगेंद्रबाबूंना साश्चर्य आनंद झाला. त्यानंतर त्यांना काही वृध्द माणसे भेटली. त्यांनी जुन्या बुध्दानुयायी पाल राजांची गाणी गाऊन दाखविली.  अशा रीतीने ह्या ओसाड जंगलात विस्मृतिगर्तेत दडपून गेलेल्या बौध्द धर्माचा आकस्मिक सुगावा लागल्यामुळे या बाबूंनी आपला शोध पुढे नेटाने चालविला. बडसाई आणि खिचिंग गावांजवळ त्यांना ओरिया भाषेतील काही हस्तलिखित पोथ्या, एक जुना बौध्द स्तूप, धर्मराज आणि शीतला ह्या महायान बौध्द पंथाच्या मूर्ती व इतर खाणाखुणांचा शोध लागला. पण सर्वात आश्चर्याची गोष्टी ही की ह्या सर्व गत वस्तू आजवर भक्तीने सांभाळून ठेवल्याचे सर्व श्रेय, नगेंद्रबाबू हे बाथुरी अथवा बाउरी या हीन व अस्पृश्य मानिलेल्या जातीलाच देत आहेत ! सोळाव्या शतकातील ओरिसाचा राजा प्रतापरुद्र ह्याच्या कारकिर्दीत बलरामदास नावाचा कवी होऊन गेला. हा प्रतापरुद्राच्या छळाला भिऊन आपला बौध्द धर्म लपवून ठेवून हिंदुधर्मात मिळूनमिसळून राहत होता.  त्याने आपल्या 'गणेश विभूति' नावाच्या ओरिया भाषेतील काव्यावर आपणच 'सिध्दांताडंबर' नावाची टीका केली आहे. त्यात त्याने बाथुरी जातीची पूर्वपीठिका अशी सांगितली आहे. खालील उताऱ्यावरून आपल्यास जाता जाता ओरिया भाषेशी मराठीचे किती साम्य आहे हेही दिसेल. निराकार दक्षिणरु विप्र होए जात ॥ उत्तर अङ्गरु जान गोपाल सम्भूत ॥१७॥ वदन अंतरे विश्वामित्र मुनि कहि ॥ ताहांकु अङ्गरे वाउरि जात होई ॥१८॥ तार तहु तेर सुत हइल जनम ॥ ताहार पत्नीर नाम पद्मालया जान ॥२५॥ कनिष्ट पत्नीरे चित्र उर्वशी तार नाम ॥ गंधकेशी वलीण तार दुतिय भार्य्या जान ॥२६॥ वायुरेखा वलिण से चतुर्थक काहि ॥ वार सुत जन्म हेले चारि पत्नी तेहि ॥२७॥ भावार्थ  : निराकाराच्या (शून्य ब्रह्माच्या) उजव्या कुशीतून विप्र जन्मले, डावीतून गोपाल, तोंडातून विश्वामित्र, त्याच्यापासून बाउरी जात उद्भवली.  पद्मालया, ऊर्वशी, गंधकेशी आणि वायुलेखा अशा चार पत्नींपासून विश्वामित्राला १२ पुत्र झाले. भाष्य  :  एवे वाउरि वार पुत्र नामक हिवा ।  पद्मालयापुत्र दुलि वाउरि अटन्ति ब्राह्मणसङगे वेद पढु यान्ति ।  ब्राह्मण ज्येष्ठ वाउरि कनिष्ठ ।  ए पढुथिले राजा प्रतापरुद्रङग ठारु गोप्य करि रखि अच्छन्ति ।... पद्मालयापुत्र वायोकांडी परमानन्द भोइ राधी शासमल । Modern Buddhism पान १५-१६ ॠग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात विश्वामित्राचे पुत्र शंबर असे म्हटले आहे. त्याच्याशी वरील माहितीचा संदर्भ नगेंद्रबाबूंनी जुळविला आहे. पण ह्याशिवाय या बलरामदासाच्या मताला दुसऱ्या कुठल्याही हिंदू अथवा बौध्द पुराणांचा आधार नाही असे नगेंद्रबाबू कबूल करतात. पुढे आणखी 'गणेशविभूती'त म्हटले आहे की, पद्मालया तिन पुत्र जेष्ठ से प्रमाण । विष्णुङ्ग सङ्गते से ऱ्हुयुत्नि सम्भाषणं ॥ सङ्खासुर मारि प्रभु सङ्ख ताङ्कु दिले । पंचजन सङ्ख तुम्म सम्माल वोइले ॥ आउ नव भाइ अश क्कुइ न जुगाइ । विचारि जानिलेटी संशय केला सेहि ॥१२॥ (पान १७) अर्थ  :  पद्मालयाच्या पाच पुत्रांना विष्णूने आपला शंख दिला, पण इतर तीन बायकांच्या मुलांना मात्र विष्णूने आपणांस स्पर्शही करू दिला नाही. ह्या वाक्यातील सङ्ख ह्या शब्दाचा अर्थ नगेंद्रबाबू बौध्द संघ असा करतात व शून्य पुराणात सङ्ख हे पद संघ ह्या अर्थाने योजिलेले आढळते, असा दाखला देतात. अशिक्षितांमध्ये संघाचा अपभ्रंश संख होणे साहजिक आहे. वरील वाक्याचा लाक्षणिक अर्थ असा होईल की, बाउरी जातीच्या प्रमुख ग्रामणीने आपल्या शत्रूंचा संहार करून संघाचे आधिपत्य मिळविले. म्हणजे बाउरी जातीचाच बौध्द धर्मात शिरकाव होऊन ते मान्यतेला पावले. बाकीच्या शबर जाती बौध्द धर्माचा स्वीकार न करता तशाच जंगली स्थितीत राहिल्या. (Modern Buddhism  पान २०) 'गणेशविभूती'त गणेशाला पुढे बाउरी जातीसंबंधी हेही गुह्य सांगण्यात आले आहे : कलियुगे न छुइव ।  वाउरी छुइले सकल पातक क्षय हव । वोलि विष्णुमाया करि गोप्य कोरि रखि अच्छन्ति । शुन हे गणेश वड गहनए गुप्त करि थुइवु । एथि सकाशरु वाउरिगार काटिले ब्राह्मण निभाइ पारन्ति नहि । मूर्ध्ना पातक क्षय हव वोलि शाप्यकु मानियान्ति ॥  (अध्याय १२) अर्थ  :  कलियुगात बाउरींना शिवू नये; शिवल्यास सकळ पापांचा क्षय होतो, म्हणून जो तो त्यांना शिवेल यासाठी त्यांना अस्पृश्य ठेवण्यात विष्णूची माया आहे. वर सिध्दांताडंबरामध्ये सांगितल्याप्रमाणे हल्लीच्या बाथुरी ऊर्फ बाउरी ह्या अस्पृश्य जातीचा ब्राह्मणांशी काही संबंध आहे काय ह्या प्रश्नाला नगेंद्रबाबू खालील उत्तर देत आहेत :  ''मयूरभंज संस्थानात शोधाअंती आम्हाला जी अनेक प्रकारची सामग्री मिळाली आहे तीवरून हल्लीची बाथुरी ही जात खरोखरी आर्यवंशीय असावी असे आम्हास वाटते. ह्या प्रांतात ही सामग्री भरपूर आहे. मयूरभंज संस्थानातील सिंहलीपाल दुर्गावरील सुंदर इमारतीचे अवशेष, प्राचीन 'आठरा देऊळ' नावाचे दगडी मंदिर, जोशीपूर किंवा दासपूर नावाचा चिरेबंदी किल्ला वगैरे पुराव्यांवरून बाथुरी हे आर्य आहेत, इतकेच नव्हे तर ह्या प्रांती हे लोक पूर्वी पराक्रमी राज्यकर्ते, मंत्री व सेनानी होते, अशी जी थोडयाच दिवसांमागे समजूत होती ती साधार आहे, असे दिसते. अद्यापि हे लोक ब्राह्मणांप्रमाणे जानवी घालतात, दहा दिवसांचे सुतक पाळतात, श्राध्द करितात, आणि ह्यांच्या श्राध्दांचे जेवण ब्राह्मण आणि वैश्यही जेवतात.  ह्या जातीच्या प्रमुखाला आजही 'महापात्र' हा किताब आहे. खरा बाउरी ब्राह्मणाच्याही हातचे खात नाही; त्याच्या जातीमध्ये त्याला फारच मान आहे. ह्याच्या पूर्वजांनीच हल्लीच्या भंजराजाला राज्यस्थापनेमध्ये मदत केली. पूर्वी ह्या राजाचे २२ सामंत होते. त्यांत सिंहलीपाल, आदिपूर, दासपूर आणि करुंजा येथील अनुक्रमे चार जमीनदार बाउरी जातीचे होते. ह्यांना भंजांकडून रुप्याच्या छत्रचामराचा मान होता. पण आता ह्या सर्व गत गोष्टी झाल्या. हे सर्व कर्जबाजारी होऊन खायची भ्रांत, अशी कठीण स्थिती झाली आहे.  भोवतालच्या कोळी, सांताळ लोकांत मिसळून त्यांच्यात चालीरीती आचरू लागले आहेत.'' (Modern Buddhism पान ३२) जी अवस्था बाउरींची पश्चिम बंगाल व ओरिसामध्ये तीच पोडांची (पौंड्र ?) मध्य बंगालात आणि नामशूद्रांची (चांडाल) पूर्व बंगलात आहे.  इ.स. १९०१ च्या खानेसुमारीत ह्या दोन जातींसंबंधाने पुढील उल्लेख आहे  :  ''नामशूद्र १८,६१,००० आणि पोड ५,००,००० आहेत. पण ह्यांच्यापैकी फार मोठी संख्या मुसलमान झाल्याने ह्यांचा खरा विस्तार दृष्टीआड झाला आहे. पूर्व बंगलात १,०५,००,००० मुसलमान आहेत.  पैकी निदान ९,००,००० ह्याच जातीतून गेले असावेत.  दंतकथेवरून ह्यांचा संबंध प्राचीन पौड्रवर्धन राजाशी पोहोचतो. ह्याची राजधानी खारातोय नदीवर होती.  ह्यांनी आपल्या पूर्वीच्या बौध्द धर्माची अद्यापि आठवण राखिली आहे. धर्मराज व धर्मठाकूर ह्या रूपाने ते अद्यापि बुध्दाचीच पूजा करितात. ह्यांचा वंश बहुशः मोंगली (मांगोलियन) आहे. हे प्रथम ब्रह्मपुत्रा नदीच्या दरीतून ईशान्येकडून उत्तर बंगालात शिरले असावेत.  तेथेच त्यांचे राज्य असावे. तेथून मग कोच, राजवंशी इत्यादी लोकांनी त्यांना हुसकून लावल्यामुळे ते खाली समुद्रकिनाऱ्यापर्यंत आले असावेत. गेल्या १० वर्षांत नामशूद्र शेकडा १० व पोड शेकडा ११ ह्या प्रमाणात वाढले आहेत.'' सन १९२३ आणि सन १९२८ ह्या दोन साली मी ब्राह्मसमाजाच्या प्रचारकार्यासाठी पूर्व बंगालातील जेसोर जिल्ह्यात फिरतीवर होतो. दोन्ही वेळा सुमारे महिनाभर ह्या नामशूद्रांच्या खेडयांत त्यांच्याशी अगदी मिळूनमिसळून राहिलो. ह्या लोकांत आमच्या 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'च्या शाळा व हायस्कुले-त्यांनी स्वतः चालविलेल्या-बऱ्या चालल्या आहेत. ह्यांच्या धार्मिक उपासना व सामाजिक चालीरीती, ह्यांची नावे व गृह्यसंस्कार वगैरेंचे बारीक निरीक्षण केल्यावरून, ही मोठी जात पूर्वी बौध्द धर्मानुयायी असून ह्यांनी राजवैभव एके काळी चांगले भोगले असावे अशी माझी खात्री झाली. हे हल्ली शेतीचा धंदा यशस्वी रीतीने करितात. विशेषतः ताडीच्या झाडांपासून गूळ करण्याचे कारखाने घरोघरी दिसले. असो. येथवर या उत्तरयुगातील टप्प्यांची लक्षणे सांगितली. ह्या युगात अस्पृश्य समाजात जी भली मोठी भर पडली ती प्राचीन युगातल्या वर्णव्यवस्थेमुळे किंवा मध्ययुगातल्या ग्रामसंस्थेमुळे नसून भलत्याच अवांतर कारणांनी म्हणजे हिंदूंच्या दुष्ट राजनीतीमुळे व आत्मघातकी कोतेपणामुळे किंवा वृत्तिमात्सर्यामुळे पडली आहे. दक्षिण हिंदुस्थानात बौध्द धर्माचा नायनाट इ.स. ८००-९०० या शतकात झाला तसा तो उत्तर हिंदुस्थानात १२००-१५०० च्या दरम्यान झाला. दक्षिणेत हा अत्याचार शैव आणि वैष्णव पंथांनी केला पण उत्तरेस त्या विध्वंसाचे अपश्रेय जे एकटया मुसलमानांच्याच कपाळावर काही बंगाली पंडित व संशोधक चिकटवू पाहतात, त्याची मात्र खात्री पटत नाही. मुसलमानांचे आगमन केवळ निमित्तमात्र होते.  दक्षिणेकडे हे निमित्तही कोठे दिसत नाही. त्या अर्थी उत्तरेकडेही ह्या निमित्तावर इतिहाससंशोधकांनी फारसा भर ठेवून चालायचे नाही. मुसलमानंनी फार तर पुष्कळशा बौध्दांची कत्तल केली असेल व पुष्कळांना जबरीने बाटविले असेल. पण बाकी उरलेल्यांना अस्पृश्य करा आणि गावाबाहेर ठेवा, असा काही हिंदू वरिष्ठ वर्गांना त्यांचा आग्रह असणे शक्य नाही. ह्या बाबतीत महामहोपाध्याय हरप्रसार शास्त्री यांचे स्पष्टोद्गार फारच मार्मिक आणि निर्भीड आहेत. ते म्हणतात की, मुसलमान आले तेव्हा पूर्व आणि उत्तर हिंदुस्थानातील बौध्द धर्मीय जातीच समाजाचा वरिष्ठ आणि वजनदार असा वरचा भाग होत्या. म्हणून त्याच मुसलमानांच्या डोळयावर आल्या. त्यांची अशी वाताहत झाल्याबरोबर दुराग्रही ब्राह्मणांनी, तत्कालीन शिल्लक उरलेल्या हिंदू राजवटीतून आपले वर्चस्व वाढविण्याकरिता मुसलमानांच्या छळांतून जिवंत उरलेल्या बौध्द बहुजनसमाजाला बहिष्कृत करून कायमचे दडपून टाकले. सन १९२१ ऑक्टोबरच्या Dacca Review ('डाक्का रिव्ह्य') नावाच्या मासिकाच्या अंकात हरप्रसाद शास्त्री पुनः लिहितात की, ''ज्यांना हल्ली डिप्रेस्ड क्लासेस असे लेखण्यात येते, त्या जाती एकेकाळी बगालात राज्य करीत असलेल्या - नव्हे साम्राज्य भोगीत असलेल्या - बौध्द जातींचेच अवशेष आहेत...  नेपाळातल्या दाखल्यावरून असे दिसते की, बंगलातील आजचे तिरस्कृत वर्ग काही शतकांपूर्वी बौध्द धर्मी असून तेव्हा ते हिंदुधर्मीयांशी जोराची स्पर्धा करीत असावेत. मुसलमानी स्वारीचा धक्का ह्यांनाच अधिक जाणवला, ह्याचे कारण बौध्द हे राज्यकर्ते होते आणि ब्राह्मण वाचे ह्याचे कारण त्यांना त्या वेळी कसल्याही प्रकारचे महत्त्व नव्हते.''  शास्त्री महाशय स्वतः ब्राह्मण असूनही ते जोरजोराने आज गेली ३० वर्षे हा आपला सिध्दांत प्रतिपादन करीत आहेत. नेपाळातील त्यांचा दाखला विशेष रीतीने लागू पडतो, तो असा की, ''तेथील बौध्दधर्मीयांचे राज्य गुरखे नावाच्या हिंदू क्षत्रियांनी बळकाविल्यावर तेथील ब्राह्मण आणि क्षत्रिय वृत्तीचे लोक तेवढे सारे हिंदू बनून बाकी उरलेल्या व्यापारी, कारागीर आणि श्रमोपजीवी जाती एकजात जशाच्या तशाच बौध्दधर्मीय उरल्या आहेत. त्याचप्रमाणे बंगालात नेपाळच्याहीवर मजल गेली आहे. म्हणजे वरिष्ठ वर्ग मुसलमान अथवा हिंदू बनून उरलेल्या वैश्य, शूद्र जाती अनाचरणीय, बहिष्कृत आणि तिस्करणीय झाल्या आहेत.  ते खरोखरीच हीन नसून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने अंत्यज आहेत.''  शास्त्री महाशयांचा हा सिध्दांत खरा असून ध्यानात घेण्याजोगा आहे. बंगालात जो अत्याचार ब्राह्मणांना मुसलमानांच्या वावटळीत करता आला, तो अत्याचार द्राविड देशात जैन राजांना बाटवून तेथील शैवाचार्यांनी केला, ह्या कर्नल ऑल्कॉट यांच्या म्हणण्याला विजयनगर कॉलेजमधील दोन ब्राह्मण अध्यापकांकडून अर्ध्याअधिक पुराव्याचे पाठबळ मिळत आहे. पूर्वीच्या दोन युगांतील प्रकार घडला असेल तसा असो. पण बुध्दोत्तरकालीन ह्या तिसऱ्या युगात मात्र केवळ दडपशाहीनेच अस्पृश्यतेच्या पेवात आजकालची भली भयंकर भर पडली, हे उघड दिसते. आधुनिक युग डोळयांसमोरच आहे. आता ह्या डोळस युगात मागील पापांचे नुसते संशोधनच नव्हे तर निश्चित गणनाही दर दहा वर्षाला सार्वजनिक खर्चाने चालू आहे. ह्या शिरगणतीच्या रिपोर्टावरून ह्या भरतखंडाचा निव्वळ सहावा हिस्सा अस्पृश्य ठरला हे जगजाहीर झाले आहे.  हा सहावा हिस्सा एकदम आणि पूर्वीपासून स्वयंसिध्द नसून तो कोणत्या टप्प्यांनी बनत आला आहे, हे उपलब्ध प्रमाणांनी संक्षेपतः व ढोबळ मानाने निर्दिष्ट करण्याचा वर प्रयत्न करण्यात आला आहे.

साभार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , समग्र वाङ्मय. . . .

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...