Saturday, March 26, 2016

मिलिंद प्रश्न

''भंते नागसेन, भगवान बुध्दांनी संबोधीचा लाभ करुन आपल्यामधील समस्त अकुशल कर्मे किंवा पापे जाळून टाकली होती की, त्यापैकी काही शिल्लक राहिली होती?''

''महाराज, समस्त पापे जाळून टाकल्यामुळेच ते भगवान बुध्द झाले. त्यांच्यात पापांचा ( वाईटांचा ) लवलेशही नव्हता.''

''भंते,  त्यांना कधी तरी शारीरिक पिडा झाली होती काय?''

''होय महाराज, एकदा राजगृह या नगरात भगवान बुध्दाच्या पायात दगडाचा एक लहान अणकुचीदार तुकडा रुतला होता. तसेच एकदा त्यांना अतिसार सुध्दा झाला होता. एकदा पोटात दु:खू लागल्यामुळे जीवक वैद्याने त्यांना जुलाब देखील दिला होता. एकदा वायुचा प्रकोप झाल्यामुळे स्थविर आनंद यांनी गरम पाणी आणून दिले होते.''

''भंते, भगवान बुध्दाने समस्त क्लेश जाळून जर बुध्दत्वाचा लाभ केला होता, तर त्यांना शारीरिक पीडा भोगाव्या लागल्या होत्या़, हे विधान खोटे ठरते आणि त्यांना शारीरिक कष्ट भोगावे लागले होते, हे विधान खरे मानावे तर त्यांनी आपले सर्व क्लेश जाळून टाकले होते, असे केलेले विधान पूर्णपणे खोटे ठरते. भंते, कर्मावाचून कधी सुख-दु:ख होऊ शकत नाही. सर्व सुखदु:खाचे मुळ कर्म आहे. हे सुध्दा एक कोडे आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. आपण उलगडा करुन समजावून सांगावे.''

''नाही़ महाराज, सर्वच वेदनांचे मूळ कर्मात नाही. ज्या कारणांमुळे संसारातील सर्वच प्राणी सुख-दु:ख भोगतात, त्यांचीही आठ कारणे आहेत - १. वायु प्रकोप होणे, २. पित्त प्रकोप होणे, ३. कफाची वृध्दी होणे, ४. सन्निपाताचा दोष उद्भवणे, ५. ऋतु बदल होणे, ६. खान पानात गडबड होणे, ७. नैसर्गिक इतर प्रभाव आणि ८. आपल्या कर्माचे फळ. याच कारणांमुळे सर्व प्राणीमात्रास सुख दु:खे भोगावी लागतात. महाराज, कर्माच्या फळाशिवाय सुखदु:खाचे दुसरे कारण असू शकत नाही, असे मानणारे चुकीचे विधान करतात.''

''भंते नागसेन, तरीपण याशिवाय दुसर्या सात कारणांचे मूळही कर्मच आहे. कारण ते सुध्दा सर्व कारणांमुळे उत्पन्न होतात.''

''महाराज, जर सर्वच दु:खे कर्माच्याच कारणाने उत्पन्न होतात, असे मानले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारात विभक्त करता येणार नाही़. महाराज, वायुचा प्रकोप होण्याची दहा कारणे आहेत- १. थंडीमुळे, २. उष्णतेमुळे, ३. भुकेमुळे, ४. तहानेमुळे, ५. अतिभोजनामुळे, ६. अधिक वेळ एकसारखे उभे राहिल्यामुळे, ७. अतिपरिश्रमामुळे, ८. अतिवेगाने चालण्यामुळे, ९. नैसर्गिक प्रभावामुळे आणि १०. आपल्या कर्माच्या फळामुळे. या दहा कारणांपैकी पहिली नऊ कारणे मागील किंवा पुढील जन्मी आपला परिणाम घडवीत नाहीत तर केवळ याच जन्मी परिणाम घडवितात. म्हणून सर्वच सुखदु:खे कर्माच्याच कारणाने परिणामकारक ठरतात, असे म्हणता येत नाही़.

''महाराज, पित्ताचा प्रकोप होण्याची तीन कारणे आहेत - १. थंडी, २. उष्णता, ३. अनियमित भोजन तसेच महाराज, कफ वृध्दीचे सुध्दा तीन कारणे आहेत- १. थंडी, २. उष्णता आणि ३. खाण्यापिण्यातील दोष. या तिन्हीपैकी एखादे जरी बिघडले तरी त्यामुळे वेदना होतात. ह्या वेगवेगळ्या वेदना आपापल्या स्वतंत्र कारणामुळेच होत असतात. महाराज, याप्रमाणे कर्म फळामुळे होणारी दु:खे थोडी आहेत, परंतु अधिक दु:खे तर इतर कारणांमुळेच होणारी आहेत. तथापि मूर्ख लोक मात्र सर्व प्रकारच्या दु:खाची मुळे कर्मफळात आहेत, असे समजतात. कोणाचे कर्मफळ कशात आहे, हे भगवान बुध्दावाचून कोणीही सांगू शकत नाही.''

महाराज, भगवान बुध्दाच्या पायास दगडाचा एक लहानसा अणकुचीदार तुकडा लागून जी दुखापत झाली होती ती वायू किंवा पित्तादी प्रकोपामुळे नाही तर संयोगवश बाह्य कारणामुळेच झाली होती. महाराज, शेकडो-हजारो वर्षांपासून भगवान बुध्दाबद्दल देवदत्ताच्या मनात वैरत्व चालून राहिले होते. त्याच वैरामुळे देवदत्ताने एका पहाडाच्या उतारावरुन खालच्या रस्त्याने चालत जात असलेल्या भगवान बुध्दाच्या डोक्यावर पडेल अशा बेताने फार मोठा धोंडा लोटला, परंतु मध्येच दोन धोंडे आडवे आल्यामुळे तो धोंडा त्यात अडकून राहिला. एवढेच की, त्या धोंड्याशी टक्कर होऊन त्यातील एक लहानसा पापुद्रा उसळून भगवान बुध्दाच्या पायास लागून रक्त आले. महाराज, यामुळे भगवान बुध्दाला जे दु:ख झाले ते एकतर त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसर्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही. जसे एखादे बीज उगवत नाही. त्याचे कारण जमीन चांगली नसावी किंवा बीजातच काही दोष असावा. तसेच अन्न पचन होत नाही़, याचे कारण पोटात काहीतरी दोष असावा किंवा अतिभोजन झाले असावे, हेच याचे कारण असू शकते. तद्वतच महाराज, भगवान बुध्दाला ते झालेले दु:ख त्यांच्याच कृत्यामुळे किंवा दुसर्या कोणाच्या तरी कृत्यामुळे झाले असावे. याशिवाय तिसरे कारण असूच शकत नाही.

''महाराज, भगवान बुध्दास त्यांच्या स्वतःच्या कर्मफळामुळे किंवा खानपानाच्या दोषामुळे कधीही दु:ख झालेले नाही़. हे खरे की, इतर सहा कारणांपैकी कोणत्या तरी एकामुळे कधी शारीरिक पीडा होत असते. तथापि त्यामुळे भगवान बुध्दाच्या जीवनाचा अंत होईल इतकी शक्ती त्यात मुळीच नव्हती. महाराज, चार महाभूतांपासून बनलेल्या या शरीराला थोडेफार सुख-दु:ख तर होतच असते.''

''महाराज, समजा एखादे लहानसे मातीचे ढेकूळ वर फेकले असता ते परत जमीनीवरच येऊन पडते. म्हणजे जमीनीने पूर्वी केलेल्या कृत्याचे हे फळ आहे म्हणून ते तिच्यावर जोराने येऊन आदळते असे समजावे काय? ''

''नाही़ भंते, जमीनीचे चांगले अगर वाईट कर्म ते काय असणार की ज्यायोगे तिला सुख-दु:खे भोगावी लागतात! ते जमिनीच्या कर्मफळामुळे नव्हे तर दुसर्याकडून वर फेकले गेल्यामुळे अशारीतीने येऊन पडते.''

''महाराज, बरोबर याच उदाहरणाप्रमाणे भगवान बुध्दास पृथ्वी समजावे. कोणत्याही कर्मफळापासून ते ढेकूळ पृथ्वीवर येऊन आदळते. त्याप्रमाणे कोणत्याही कर्मफळावाचून भगवान बुध्दाच्या पायावर तो दगडाचा पापुद्रा पडला, असेच समजावे.

''महाराज, लोक जमीन खणतात किंवा तिची कुळकाठी काढतात. तेव्हा हे तिच्या पूर्व कर्माच्या फळामुळे असे घडते, असे मानावे काय? ''

''नाही़ भंते''

''महाराज, भगवान बुध्दाच्या पायास दगडाचा एक तुकडा लागला होता, त्याचेही असेच आहे. भगवान बुध्दाला अतिसार झाला होता, तो सुध्दा त्यांच्या कर्मफळामुळे नाही़ तर सन्निपातामुळे होय. यात कर्मफळ व सन्निपात याचा तिळमात्र संबंध येत नाही. याशिवाय आणखी जे काही दु:ख तथागताला झाले होते त्याचे कारण त्यांचे स्वतः च्या कर्मफळात नसून त्या सहा दुसर्या दोषांत आहेत. महाराज, संयुक्त निकायातील मोलियसीवक सुत्तात स्वतः देवाधिदेव भगवान बुध्दानेच म्हटले आहे की, 'सीवक, संसारात काही यातना तर पित्त प्रकोप पावल्यामुळे होतात. याची जाणीव स्वतः ला देखील होऊ शकते आणि हीच बाब दुसरे सर्वच लोक कबुल करतात. सीवक सर्व प्रकारची सुख-दु:खे किंवा अन्य कष्ट प्राणीमात्रास भोगावे लागतात, याचे कारण केवळ त्याचे स्वतःचेच पूर्वजन्मीचे कर्मफळ होय, असे जे काही श्रवण परिव्राजक निर्ग्रथ मानतात ते स्वतःच्याच ज्ञानाची फसवणूक करीत आहेत व लोकांच्या अनुभवाची ते पायमल्ली करतात, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच मी म्हणतो की, त्यांचे असे मत चुकीचे आहे. कफ, वायू, सन्निपात इत्यादी समस्त बाह्य दोषांपासून उद्भवणार्या कष्ट व यातना यासंबंधी देखील असेच समजले पाहिजे. याविषयी स्वतः च समजून घेतले पाहिजे आणि समस्त लोक देखील असेच मानतात. सीवक, सर्वच सुख, दु:ख, उपेक्षा व वेदना भोगाव्या लागतात त्या स्वतःच्याच पूर्वजन्मीच्या कर्माच्या फळामुळे होते, असे जे काही दुसरे श्रमण-ब्राह्मण म्हणतात, ते आपल्या स्वतःच्याच ज्ञानाची व इतर लोकांच्या अनुभवाची अवहेलना करतात. त्याप्रमाणे ते दोन्ही दृष्टीने केवळ लोकांची फसवणूक करीत असल्यामुळे मी म्हणतो की, त्यांचे असे म्हणने एकदमच चुकीचे आहे.''

''महाराज, यावरुन असाच सारांश निघतो की, सर्वच दु:खाचे वा कष्टाचे कारण आपल्या पूर्वजन्मीचे कर्मफळ नाहीत. तेव्हा आता तुम्ही भगवान बुध्दाने आपल्या बुध्दत्व प्राप्तीपूर्वी सर्वच पापांना ( क्लेशांना ) जाळून टाकले होते, हे विधान विश्वासपूर्वक मानावयास पाहिजे.''

''बरोबर आहे भंते, आपले म्हणने. हे मी सहर्ष स्वीकार करतो.''

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...