Saturday, January 30, 2016

मिलिंद प्रश्न

राजा मिलिंद: "भंते, पुन्हा जन्मास न येणार्या अर्हतास सुखाच्या किंवा दु:खाच्या वेदना होतात काय?"

स्थविर नागसेन: "महाराज, काही वेदना होतात, तर काही वेदना होत नाहीत."

राजा मिलिंद: कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत, हे सांगाल काय?"

स्थविर नागसेन: "महाराज, शारीरिक वेदना होतात परंतु मानसिक वेदना होत नाहीत."

राजा मिलिंद: "भंते, हे कसे काय घडते?"

स्थविर नागसेन: "शारीरीक वेदना होण्याची जी कारणे किंवा हेतू आहेत ती कायम असल्यामुळे शारीरीक वेदना होतात, परंतु चित्तात उत्पन्न होणार्या वेदनांची कारणे किंवा हेतू नष्ट झाल्याने मानसिक सुख-दु:खाच्या वेदना त्यास होत नाहीत. खुद्द भगवान बुध्दांनीच म्हटले आहे की, 'अशी व्यक्ती फक्त एकाच प्रकारच्या वेदना भोगते. त्या म्हणजे शारीरीक, मानसिक वेदना त्यास भोगाव्या लागत नाहीत."

राजा मिलिंद: "भंते, अशी अर्हत्व प्राप्त केलेली व्यक्ती सुख व दु:खाच्या वेदना भोगण्याकरीता का बरे थांबून राहतो? आपले शरीर विसर्जन का करीत नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, अशा जीवनमुक्तास शरीराबद्दल खास आकर्षण किंवा तिरस्कारही वाटत नाही. तसेच तो कच्च्या स्वरुपात असलेली जीवन फळे तोडू इच्छित नाही, तर ते पूर्ण पक्व होण्याची तो वाट पाहतो. पंडित पुरुष कधी कोणत्याही गोष्टीची घाई करीत नाहीत. ती पूर्ण पक्व होईपर्यंत वाट पाहण्याइतकी त्यांच्यात सहनशीलता असते."

"महाराज, धम्मसेनापती सारीपुत्रांनी सुध्दा म्हटले आहे की, मला मृत्युची किंवा जगण्याची यापैकी कोणतीही इच्छा राहिली नाही. जसा एखादा मजूर काम केल्यानंतर आपल्या दामाची वाट पाहतो त्याप्रमाणे मी जीवनफळाची वाट पाहत आहे. मला मरण नको की, जन्म नको. ज्ञानपूर्वक जागृतपणे मी माझ्या वेळेची प्रतिक्षा करीत आहे."

* वेदनांचे कार्य,,,,,

राजा मिलिंद: "भंते, कुशल (पुण्यमय) वेदना, अकुशल (पापमय) वेदना किंवा अव्याकृत (पाप नाही की पुण्यमय नाही) वेदना आहेत की काय?"

स्थविर नागसेन: "होय महाराज, तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत."

राजा मिलिंद: "भंते, पण जी कुशल असते ती दु:खदायक नसते आणि जी दु:खदायक असते ती सुखद नसते. तेव्हा तर दु:खदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही."

स्थविर नागसेन: "महाराज, समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसर्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असेल, तर त्या दोन्ही गोळ्यांमुळे त्याला वेदना होतील की नाही?"

राजा मिलिंद: "होय भंते, त्यास दोन्ही गोळ्यांमुळे वेदना होतील."

स्थविर नागसेन: "तर दोन्ही वस्तू तप्त आहेत की  काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते!"

स्थविर नागसेन: "तर दोन्ही गोळे थंड आहेत की काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते!"

स्थविर नागसेन: "तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे! जर तप्त वस्तूच पीडा देणारी असेल, तर दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको आणि जर थंड वस्तूच पीडा देणारी असेल, तर दोन्ही वस्तू थंड नाहीत, तेेव्हा त्यामुळे देखील पीडा व्हायला नको. महाराज, दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही वस्तू थंड नाहीत. अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूंपासून पीडा वा कष्ट व्हायला नको. दोन्ही वस्तूंचे गुणधर्म वेगवेगळे म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे. तेव्हा दोन्ही पीडा पोचवितात. तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही."

राजा मीलिंद: "आपणासारख्या वादपटूशी चर्चा करण्यास मी असमर्थ आहे. त्यातील इंगित काय आहे ते सांगण्याची कृपा करावी."

तेव्हा स्थविरांनी अभिधम्मानुसार स्पष्टीकरण करुन सांगितले....

"महाराज, सांसारीक जीवनातील सहा सुखे असून त्यागमय जीवनातील सहा सुखे आहेत. तसेच सांसारीक जीवनातील सहा दुःखे असून त्यागमय जीवनातील सहा दु:खे आहेत. त्याचप्रमाणे सांसारीक जीवनातील सहा उपेक्षा व त्यागमय जीवनातील सहा उपेक्षा आहेत. याप्रमाणे एकूण ३६ वेदना होतात. हे महाराज, भूतकाळातील ३६ वेदना आणि वर्तमान काळातील ३६ वेदना याप्रमाणे एकूण १०८ वेदना अस्तित्वात आहेत."

राजा मिलिंद: "भंते, आपण फारच छान सांगितले."

मिलिंद प्रश्न

राजा मिलिंद: "भंते, जो ज्ञानी असतो तो प्रज्ञावान देखील असतो काय?"

स्थविर नागसेन: "होय महाराज, तो प्रज्ञावान सुध्दा असतो."

राजा मिलंद: "भंते, असे असेल तर ज्ञान आणि प्रज्ञा एकच वस्तू मानावी लागेल?"

स्थविर नागसेन: "होय महाराज, ज्ञान आणि प्रज्ञा दोन्ही एकच आहेत."

राजा मिलिंद: "भंते, अशा अवस्थेत व्यक्तीला कोणत्या विषयात मोह असू शकेल की, नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, अशा व्यक्तीस काही विषयाबाबत मोह असू शकेल तर काही विषयाबाबत त्याला मोह असणार नाही."

राजा मिलिंद: "कोणत्या विषयाप्रती मोह असू शकेल आणि कोणत्या विषयाप्रती मोह असणार नाही."

स्थविर नागसेन: "महाराज, ज्या विषयाचे ज्ञान त्यास अवगत नाही, जे देश त्यानी पाहिलेले नाहीत, तसेच ज्या गोष्टी त्याने ऐकल्या नाहीत, त्या बाबींचा त्यास मोह होईल."

राजा मिलिंद: "आणि कोणत्या बबीचा त्यास मोह होणार नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, ज्या विषयाबाबत हे अनित्य आहे, हे दु:खद आहे आणि आत्मा म्हणून काही वस्तूच अस्तित्वात नाही, असे आपल्या प्रज्ञेच्या अंतर्दुष्टीने पाहिले आहे, त्या विषयात त्याला मोह होणार नाही."

राजा मिलिंद: "भंते, या विषयातील त्याचा मोह कोठे जातो म्हणजे त्या मोहाचे काय होते?"

स्थविर नागसेन: "महाराज, ज्ञान उत्पन्न होताच त्या विषयाबाबतचा मोह सर्वथा नाश पावतो."

राजा मिलिंद: "कृपा करुन उदाहरण देऊन समजावून सांगावे."

स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या अंधार कोठडीत सर्वत्र प्रकाश पसरतो. महाराज, त्याचप्रमाणे ज्ञान उत्पन्न होताच मोहाचा नाश होतो."

राजा मिलिंद: "भंते, आणि प्रज्ञेचे काय होते म्हणजे प्रज्ञा कोठे जाते?"

स्थविर नागसेन: "महाराज, प्रज्ञा देखील आपले कार्य उरकून निघून जाते. कारण पुन: पुन: झालेले कार्य करण्याची अवश्यकताच राहत नाही. परंतु तिच्यामुळे झालेले कार्य म्हणजे अनित्य, दु:ख आणि अनात्मतेचे ज्ञान मात्र असेच राहते. यामुळे प्रज्ञा आता कायमची गेली असे मात्र समजू नये. तर हुजर्या प्रमाणे दुसर्या हुकूमाची वाट पाहत राहते."

राजा मिलिंद: "हेच स्पष्ट करण्यासाठी कृपा करुन उदाहरण देऊन सांगितल्यास बरे होईल."

स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या श्रीमंताने आपल्या कारकुनास बोलावून रात्रीच्या वेळी दिवा लावून त्या प्रकाशात पत्र लिहावयास सांगीतले आणि पत्र लिहिल्यावर तो दिवा विझवून टाकला तरी पत्र लिहिलेला मजकूर तसाच कायम राहिला, या उदाहरणाप्रमाणेच प्रज्ञेने आपले काम करुन निघून गेल्यावर देखील त्यामुळे झालेले ज्ञान कायम राहते."

राजा मिलिंद: "भंते, पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगा."

स्थविर नागसेन: "महाराज, पूर्वेकडील लोकात अशी रुढीवादी आहे की, ते लोक घराशेजारी पाण्याने भरलेले निदान पाच घडे तरी ठेवतात. उद्देश हा की, चुकून एखाद्या घरात आग लागली की चटकन विझविता यावी. समजा, त्याच्या शंकेप्रमाणे एखाद्या घरात आग लागली असता त्या पाचही घड्यातील पाणी ती विझविण्याच्या कामी आणून आग विझविली. तेव्हा पूर्णपणे आग विझल्यानंतरही घरातील लोक पुन: पुन: पाणी शिंपडत राहतील काय?"

राजा मिलिंद: "भंते नागसेन, मुळीच नाही. का की, आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही, तेव्हा रिकामे घडे जेथल्या तेथे ठेवलेलेच बरे."

स्थविर नागसेन: "महाराज, तेथील पाच घडे म्हणजे श्रध्दा, परिश्रम, जागरुकता, चिंतन व प्रज्ञा हे पंचेद्रिय किंवा पाच प्रकारचे नैतिक सद्गुण होत. आग विझलिणारी घरातील माणसे म्हणजे साधक होय. विझविल्या गेलेली आग म्हणजे क्लेश (तृष्णा) होय. जसे पाण्याने भरलेले मडके आग विझविण्याच्या कामी आले तसेच वरील पाच नैतिक सद्गुण क्लेशाची आग विझविण्याचे कामी येतात असे समजावे आणि एकदा क्लेश नाश पावले की, पुन्हा त्याची उत्पत्ती संभवनीय नाही." महाराज, याप्रमाणेच प्रज्ञा आपले कार्य आटोपून निघून जाते. परंतु तिच्यामुळे घडलेले कार्य कायम राहते."

राजा मिलिंद: "भंते, पुन्हा एखादे उदाहरण देऊन सांगावे."

स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या सैनिकाने लढाईत गेल्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पाचही प्रकारच्या बाणांपैकी काही बाण सोडून शत्रूला हरविले व पिटाळून लावले. आता शत्रू पळून गेल्यानंतर देखील तो सैनिक बाण पुन: पुन: सोडतच राहिल काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते, शत्रू पळून गेल्यानंतर बाण सोडण्यात काय उपयोग?"

स्थविर नागसेन: "महाराज, जसे पाच प्रकारचे बाण तसे येथे पाच नैतिक सद्गुण समजावे. सैनिक तसा साधक (योगी) समजावा. जसे लढाईतील शत्रू तसे येथे क्लेश समजावेत. आणि ज्याप्रमाणे पाच प्रकारच्या बाणांचा मारा करुन शत्रूंना हरविले तद्वतच पाच इंद्रिये बाणांनी क्लेश नाश केले जातात.

महाराज, पळून गेलेला शत्रू पुन: परत येत नाही तसे एकदा शमविलेले क्लेश पुन्हा उद्भवत नाहीत." महाराज, याप्रमाणे प्रज्ञा आपले कार्य आटोपून निघून गेल्यानंतर देखील तिच्यामुळे झालेले ज्ञान नष्ट होत नाही, हे या उदाहरणावरुन सिध्द होते."

Thursday, January 28, 2016

मिलिंद प्रश्न, लक्षण प्रश्न

राजा मिलिंद: "भंते, जन्मास आलेली व्यक्ति आणि प्रौढावस्थेतील व्यक्ति एकच असतात की बदलून भीन्न भीन्न असतात?" कृपा करुन उदाहरण देऊन समजावून सांगा."

स्थविर नागसेन: "महाराज, जेव्हा आपण अगदी लहान बालक होतात, निव्वळ मांसाचा गोळा, इतके अजाण की, केवळ खाटेवर उताने पडून राहत होता. परंतु आता आपण मोठे झाला आहात. चांगले प्रौढ. तेव्हा आपण लहान असताना जी व्यक्ति होतात, तीच व्यक्ति आता प्रौढावस्थेत आहात असे आपणांस वाटते काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते, आता माझ्यात भिन्नत्व आले आहे."

स्थविर नागसेन: "महाराज, आपण जर बालपणी असलेली व्यक्ति प्रौढावस्थेत नसाल, तर मग कोणी आपले माता, पिता अगर आचार्यही नाहीत, असेच म्हणावे लागेल. तसे असेल तर कोणी ज्ञानी किंवा शीलवान देखील होऊ शकत नाही. आपल्या भिन्न भिन्न अवस्थांतील म्हणजे बाल्यावस्थेतील माता वेगळ्या आणि प्रौढावस्थेतील माता वेगळ्या मानाव्या लागतील. शिल्प शिकणारा दुसरा आणि शिल्प शिकून तयार झालेला दुसरा मानावा लागेल."

राजा मिलिंद: "तसे नाही भंते, पण यावरुन आपण काय सिध्द करु इच्छिता?"

स्थविर नागसेन: "महाराज, मी बालपणी वेगळा आणि सद्यस्थितीत वेगळा झालो आहे खरा परंतु ह्या सर्व अवस्था या एकाच शरीरावर घडणार्या असल्यामुळे एकाच व्यक्तित समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

राजा मिलिंद: "भंते, उदाहरण देऊन सांगा."

स्थविर नागसेन: "महाराज, समजा एखाद्या माणसाने दिवा लावला, तर तो रात्रभर जळत राहिल की नाही?"

राजा मिलिंद: "होय भंते, रात्रभर जळत राहिल."

स्थविर नागसेन: "पण काय हो महाराज, रात्रीच्या पहिल्या प्रहरी दिव्याची जी वात होती तीच काय दुसर्या तिसर्या प्रहरी राहिल का?"

राजा मिलिंद: "नाही भंते!"

स्थविर नागसेन: "महाराज, तर काय पहिल्या प्रहरी असणारा दिवा दुसरा आणि दुसर्या व तिसर्या प्रहरी असणारा दिवा दुसरा होतो की काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते, तोच दिवा रात्रभर जळत राहिल.

स्थविर नागसेन: "महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेत एक अवस्था उत्पन्न होत असतानाच पहिली अवस्था नष्ट होत असतें व याप्रमाणे ही प्रक्रिया किंवा प्रवाह एकसारखा सुरु राहतो; या एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही. कारण एका अवस्थेचा लय होतो न होतो तोच दुसरी अवस्था उत्पन्न होऊन पहिलीची रिक्त जागा भरुन काढते. यामुळे व्यक्ति एकच आहे असेही म्हणता येत नाही तसेच दुसरी होती असेही म्हणता येत नाही." एका जन्मातील शेवटच्या विज्ञानाचा (चेतनेचा) नाश होताच दुसर्या जन्माचे विज्ञान उठून उभे होते."

राजा मिलिंद: कृपा करुन अजून एक उदाहरण देऊन सांगावे."

स्थविर नागसेन: "महाराज, दूध काढल्यानंतर विरजन टाकले असता काही वेळाने त्याचे दही बनते. दह्यापासून लोणी व लोण्यापासून तूप बनविले जाते. तेव्हा कोणी म्हणेल की, दुध, दही, लोणी व तूप एकच आहे, तर असे म्हणणाराचे कथन मान्य करता येईल काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते, परंतु दुधापासूनच दही, लोणी व तूप बनले आहे."

स्थविर नागसेन: "महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूंच्या अस्तित्वाच्या प्रवाहात एक अवस्था उत्पन्न होते, ती लय पावते आणि तात्काळ दुसरी अवस्था उत्पन्न होऊन तिची रिक्त जागा भरुन काढते. याप्रमाणे हा अतुट प्रवाह सतत चालू राहतो. जणू काय पुनर्जन्माचे कार्य एकाच वेळी चालू आहे. मात्र एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही. कारण एकाचा लय (नाश) होताच दुसरा उत्पन्न होतो. या कारणानेच तोच जीव राहतो असेही म्हणता येत नाही आणि उत्पन्न होणारा दुसरा आहे असेही म्हणता येत नाही." एका जन्माच्या शेवटच्या विज्ञानाचा लय होताच दुसर्या जन्माचे प्रथम विज्ञान उठून उभे राहते."

राजा मिलिंद: "भंते, आपले कथन अगदी संयुक्तिक आहे."

Sunday, January 17, 2016

मिलिंद प्रश्न, खण्ड २, प्रकरण पहिले

राजा मिलिंद आयुष्यमान नागसेनाजवळ गेला आणि अभिवादन करुन एके बाजूस बसला. नागसेनानेही राजाचे अभिनंदन केले. त्यामुळे राजाच्या चित्ताला सांत्वना मिळाली.

राजाने शिष्ठाचारपूर्वक प्रश्न केला, "भंते, आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले शुभ नाव काय आहे बरे?"

"महाराज, 'नागसेन' नावाने मला ओळखतात आणि माझे ब्रह्मचारी याच नावाने मला संबोधतात. आई-बाप आपल्या मुलांची नावें, सुरसेन, वीरसेन, सिंहसेन अशाप्रकारे ठेवीत असतात, ही नेहमीच्या व्यवहारातील नावे आहेत. माझेही नाव त्यापैकी एक आहे. परंतु यथार्थ दृष्टीने चिरंतन (आत्मा) स्वरुप पुरुष नावात काही नाही."

यावर राजा मिलिंद म्हणाला, "हे माझ्या पाचशे यवनांनो आणि ऐंशी हजार आदरणीय भिक्षूंनो, तुम्ही सुध्दा कान लावून एकचित्ताने ऐका. अपणांमध्ये चिरंतन (आत्मा) स्वरुप नाही. त्यांच्या या विधानास कोणत्या अर्थाने समजावे?"

"भंते नागसेन, जर चिरंतन असा कोणी पुरुष नाही, हे आपले म्हणणे खरे मानावे, तर आपणांस चीवर, पिण्ङतात, शयनास व औषधे इत्यादि देतो तो कोण? तसेच त्यांचा उपभोग घेतात ते कोण? सदाचारांचे रक्षण करतात ते कोण? ध्यानावस्थेत चिंतन करीत बसतात ते कोण? पुरुषोत्तम श्रेष्ठांच्या मार्गातील दिव्य लाभ जे निर्वाण, त्याचा साक्षात्कार करतात ते कोण? प्राणी हिंसा करतात ते कोण? चोरी करतात ते कोण? भोग-वासनात दुष्ट जीवन कंठणारे ते कोण? खोटे बोलतात ते कोण? दारु पितात ते कोण? थोङक्यात, पंचशील न पाळल्यामुळे ज्या दुष्ट कृत्यांची फळे जिवंतपणीच भोगतात, ते कोण? आपलें म्हणणे जर सत्य असेल, तर पुण्यही नाही की पापही नाही, असेच म्हणावे लागेल. मग पाप पुण्य करणाराही कोणी नाही? आणि करविणाराही कोणी नाही? तसेच पाप व पुण्य कर्माची फळे भोगणारा देखील कोणी नाही. भंते नागसेन, कल्पना करा की, कोण्या एखाद्या इसमाने आपणांस ठार मारले तर तो खुन ठरणार नाही. कारण तुमच्या मते नावाप्रमाणे चिरंतन असे काहीच स्वरुप नाही ना! मग तुमचे आचार्य निरर्थक ठरतील, तुमचे उपाध्याय व तुमची उपसंपदा देखील निरर्थक ठरेल. तथापि आपण म्हणाले की, आपले ब्रह्मचारी आपणांस 'नागसेन' नावाने संबोधितात. तेव्हा ही 'नागसेन' काय भानगङ आहे? भंते, अंगावरील केसांना नागसेन समजावे काय?

"नाही महाराज!"
"तर मग रोम म्हणजे नागसेन असावे."
"नाही महाराज, अंगावरील रोम म्हणजे नागसेन म्हणता येणार नाही."
"ही नखे, दात, त्वचा, मांस, स्नायू, हाङे, मज्जा, छाती, ह्रदय, यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, आतङी, बारीक आतङे, पोट, शौचमळ, पित्त, कफ, पू, रक्त, घाम, मेद, आसवे, चर्बी, लाळ, शेंबूङ, मूत्राशय व मेंदू म्हणजे नागसेन काय?"
"नाही महाराज!"
"मग आपल्या रुपासच नागसेन असे संबोधिलेले बरे"
"नाही महाराज!"
"तुमच्या वेदना म्हणजे नागसेन काय!"
"नाही महाराज!"
"संज्ञासच नागसेन म्हणावें वाटते?"
"नाही महाराज!"
"तुमचें संस्कार हेच नागसेन की काय?"
"नाही महाराज!"
"मग विज्ञान (चेतना) तरी नागसेन असावे?"
"नाही महाराज!"
"भंते नागसेन, रुपादी स्कंध व्यतिरिक्त कोणी नागसेन आहे काय?"
"नाही महाराज, तसेही काही नाही."
"भंते, मी आपणांस विचारुन विचारुन अगदी थकून गेलो. यामध्ये कोठेही नागसेन सापङला नाही. अखेर नागसेन निव्वळ शब्द मात्र आहे, काय? अखेर नागसेन आहे तरी कोण? भंते, नागसेन कोणी नाही म्हणून आपण व्यर्थच खोटे बोलत आहात.

यानंतर आयुष्यमान नागसेन राजा मिलिंदास म्हणाले, "महाराज, आपण क्षत्रिय राजे लोक अत्यंत सुकुमार आहात. कारण आपण विलास मंदिरात वाढलें आहात आणि आताच या भर दुपारच्या रखरखत्या उन्हाने तापलेल्या वाळूवरुन व खङ्यांनी झाकलेल्या जमीनीवरुन पायी चालत आल्यामुळे आपल्या पायांस चटके बसले असावेत आणि दुखत असावेत, शरीर थकवा येऊन शिणले असावे. तुमचे मनही दु:खींच झाले असावे, आणि भयंकर शारिरीक पीङा होत असाव्यात. काय आपण पायी आलात की एखाद्या वाहनावर बसून येथे आलात?

"भंते, मी पायी आलो नाही, तर रथातून आलो आहे."
"काय रथातून आलो म्हणता? कोठे आहे तुमचा रथ? हा दांङा म्हणजे रथ काय?"
"नाही भंते!"
"हा कणा रथ आहे काय?"
"नाही भंते!"
"काय ही चाके रथ आहेत?"
"नाही भंते!"
"हा सांगाङा म्हणजे रथ काय?"
"नाही भंते!"
"ह्या दोर्या रथ आहेत काय?"
"नाही भंते!"
"हा लगाम रथ आहे काय?"
"नाही भंते!"
"हा चाबूक म्हणजे रथ आहे काय?"
"नाही भंते!"
"महाराज, दांङा, पाळणा, दोर, जू, खीळ इत्यादि सर्व रथ काय?"
"नाही भंते!"
"मग या भागांशिवाय अजून काही भाग आहेत काय की ज्याला रथ म्हणता येईल?"

यावर देखील राजाने नकारार्थीच उत्तर दिले, तेव्हा आयुष्यमान नागसेन म्हणाले. "महाराज! रथातून आलो असे तर आपण सांगितले. अखेर आपण ज्या रथातून आलात तो रथ तरी कोणता? अहो, आपणास विचारुन विचारुन थकून गेलो परंतु आपला रथ मला पाहता आला नाही. महाराज रथ नाही म्हणून व्यर्थ खोटे तर बोलत नाही ना? अहो, आपण समस्त जंबुद्वीपात महान आहात, मग कोणाच्या भयामुळे असे खोटे बोलत आहात?"

यानंतर तेथे उपस्थित समस्त लोकांना उद्देशून नागसेन म्हणाले, हे पाचशे राज पुरुष यवनांनो आणि माझ्या ऐंशी हजार आदरणीय भिक्षूंनो, आपण सर्व लक्षपूर्वक एका. राजा मिलिंदाने आताच रथातून आलो म्हणून सांगितले, परंतु रथ कोठे आहे असे विचारले असता ते रथ दाखवू शकले नाही. तेव्हा त्यांचे खरे तरी कसे मानावे?"

नागसेनाने असा खुलासा केल्यावर पाचशे यवन लोकांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या व नागसेनास साधुवाद दिला आणि ते राजास म्हणाले, "महाराज, या कोङ्यातून आपण निघू शकत असल्यास उत्तर द्यावे."

यावर राजा मिलिंद उत्तरले,"भंते, मी आपणांस खोटे असे काहीही सांगीतले नाही. दांङा, कणा इत्यादि रथाच्या विविध अवयवांच्या आधारावरच केवळ व्यवहाराकरिता 'रथ' हे नामाभिधान दिलेले आहे."

यावर भंते नागसेन उत्तरले, "अगदी बरोबर, रथाचा खरा अर्थ महाराजांनी अगदी अचूकपणे ग्रहण केला आहे. तीच गोष्ट मनुष्यमात्राच्या 'नागसेन' इत्यादि नावासंबंधाने लागू होते. केसादी शारीरीक अवयव व स्कंधादिच्या आधारावरच व्यवहारासाठीच माझे नाव 'नागसेन' असे ठेवण्यात आले आहे. परंतु परमार्थात असा चिरंतन पुरुष किंवा आत्मा कोठेही विद्यमान नाही. भिक्खुणी वजीरा तथागताजवळ एकदा म्हणाली होती की, तशा अवयवयांच्या आधारावरच 'रथ' ही संज्ञा अस्तित्वात येते. त्याचप्रमाणे स्कंधादी अवयव एकत्र आल्याने एक सत्वजीव समजला जातो."

या उत्तराने राजा मिलिंद अत्यंत खुश होऊन उद्गारला, "भंते नागसेन, किती आश्चर्यकारक पध्दतिने आपण हे कूट व बिकट कोङे सोङविले. किती अद्भूत आहे. हे भंते, यावेळी जर भगवान बुध्द असतें तर त्यांनी सुध्दा तुमच्या वचनास मान्यता दिली असती, शाब्बास नागसेन शाब्बास!"

* जन्म-मृत्यू विषयी प्रश्न,,,,

राजा मिलिंद: भंते नागसेन, अशी कोणी व्यक्ति आहे काय की जी मृत्यूनंतर पुन्हा जन्म ग्रहण करीत नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, काही व्यक्ति मृत्युनंतर जन्मास येतात तर काही व्यक्ति असे आहेत की, पुन्हा जन्मास येत नाहीत."

राजा मिलिंद: "भंते, कोण जन्मास येतात आणि कोण जन्मास येत नाहीत?"

स्थविर नागसेन: "ज्यांचे चित्तमळ (क्लेश) अवशिष्ट आहेत, अशांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो तर ज्यांचे चित्तमळ नाश पावलेत त्यांना जन्म घ्यावा लागत नाही."

राजा मिलिंद: "भंते, आपण पुन्हा जन्मास येणार की नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, जर संसारीक आसक्ति मनात कायम राहिल, तर जन्म घ्यावा लागेल आणि जर माझे चित्त आसक्ति पासून मुक्त झाले, तर जन्म घ्यावा लागणार नाही."

राजा मिलिंद: "भंते, फारच छान!"

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...