राजा मिलिंद: "भंते, जो ज्ञानी असतो तो प्रज्ञावान देखील असतो काय?"
स्थविर नागसेन: "होय महाराज, तो प्रज्ञावान सुध्दा असतो."
राजा मिलंद: "भंते, असे असेल तर ज्ञान आणि प्रज्ञा एकच वस्तू मानावी लागेल?"
स्थविर नागसेन: "होय महाराज, ज्ञान आणि प्रज्ञा दोन्ही एकच आहेत."
राजा मिलिंद: "भंते, अशा अवस्थेत व्यक्तीला कोणत्या विषयात मोह असू शकेल की, नाही?"
स्थविर नागसेन: "महाराज, अशा व्यक्तीस काही विषयाबाबत मोह असू शकेल तर काही विषयाबाबत त्याला मोह असणार नाही."
राजा मिलिंद: "कोणत्या विषयाप्रती मोह असू शकेल आणि कोणत्या विषयाप्रती मोह असणार नाही."
स्थविर नागसेन: "महाराज, ज्या विषयाचे ज्ञान त्यास अवगत नाही, जे देश त्यानी पाहिलेले नाहीत, तसेच ज्या गोष्टी त्याने ऐकल्या नाहीत, त्या बाबींचा त्यास मोह होईल."
राजा मिलिंद: "आणि कोणत्या बबीचा त्यास मोह होणार नाही?"
स्थविर नागसेन: "महाराज, ज्या विषयाबाबत हे अनित्य आहे, हे दु:खद आहे आणि आत्मा म्हणून काही वस्तूच अस्तित्वात नाही, असे आपल्या प्रज्ञेच्या अंतर्दुष्टीने पाहिले आहे, त्या विषयात त्याला मोह होणार नाही."
राजा मिलिंद: "भंते, या विषयातील त्याचा मोह कोठे जातो म्हणजे त्या मोहाचे काय होते?"
स्थविर नागसेन: "महाराज, ज्ञान उत्पन्न होताच त्या विषयाबाबतचा मोह सर्वथा नाश पावतो."
राजा मिलिंद: "कृपा करुन उदाहरण देऊन समजावून सांगावे."
स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या अंधार कोठडीत सर्वत्र प्रकाश पसरतो. महाराज, त्याचप्रमाणे ज्ञान उत्पन्न होताच मोहाचा नाश होतो."
राजा मिलिंद: "भंते, आणि प्रज्ञेचे काय होते म्हणजे प्रज्ञा कोठे जाते?"
स्थविर नागसेन: "महाराज, प्रज्ञा देखील आपले कार्य उरकून निघून जाते. कारण पुन: पुन: झालेले कार्य करण्याची अवश्यकताच राहत नाही. परंतु तिच्यामुळे झालेले कार्य म्हणजे अनित्य, दु:ख आणि अनात्मतेचे ज्ञान मात्र असेच राहते. यामुळे प्रज्ञा आता कायमची गेली असे मात्र समजू नये. तर हुजर्या प्रमाणे दुसर्या हुकूमाची वाट पाहत राहते."
राजा मिलिंद: "हेच स्पष्ट करण्यासाठी कृपा करुन उदाहरण देऊन सांगितल्यास बरे होईल."
स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या श्रीमंताने आपल्या कारकुनास बोलावून रात्रीच्या वेळी दिवा लावून त्या प्रकाशात पत्र लिहावयास सांगीतले आणि पत्र लिहिल्यावर तो दिवा विझवून टाकला तरी पत्र लिहिलेला मजकूर तसाच कायम राहिला, या उदाहरणाप्रमाणेच प्रज्ञेने आपले काम करुन निघून गेल्यावर देखील त्यामुळे झालेले ज्ञान कायम राहते."
राजा मिलिंद: "भंते, पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगा."
स्थविर नागसेन: "महाराज, पूर्वेकडील लोकात अशी रुढीवादी आहे की, ते लोक घराशेजारी पाण्याने भरलेले निदान पाच घडे तरी ठेवतात. उद्देश हा की, चुकून एखाद्या घरात आग लागली की चटकन विझविता यावी. समजा, त्याच्या शंकेप्रमाणे एखाद्या घरात आग लागली असता त्या पाचही घड्यातील पाणी ती विझविण्याच्या कामी आणून आग विझविली. तेव्हा पूर्णपणे आग विझल्यानंतरही घरातील लोक पुन: पुन: पाणी शिंपडत राहतील काय?"
राजा मिलिंद: "भंते नागसेन, मुळीच नाही. का की, आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही, तेव्हा रिकामे घडे जेथल्या तेथे ठेवलेलेच बरे."
स्थविर नागसेन: "महाराज, तेथील पाच घडे म्हणजे श्रध्दा, परिश्रम, जागरुकता, चिंतन व प्रज्ञा हे पंचेद्रिय किंवा पाच प्रकारचे नैतिक सद्गुण होत. आग विझलिणारी घरातील माणसे म्हणजे साधक होय. विझविल्या गेलेली आग म्हणजे क्लेश (तृष्णा) होय. जसे पाण्याने भरलेले मडके आग विझविण्याच्या कामी आले तसेच वरील पाच नैतिक सद्गुण क्लेशाची आग विझविण्याचे कामी येतात असे समजावे आणि एकदा क्लेश नाश पावले की, पुन्हा त्याची उत्पत्ती संभवनीय नाही." महाराज, याप्रमाणेच प्रज्ञा आपले कार्य आटोपून निघून जाते. परंतु तिच्यामुळे घडलेले कार्य कायम राहते."
राजा मिलिंद: "भंते, पुन्हा एखादे उदाहरण देऊन सांगावे."
स्थविर नागसेन: "महाराज, एखाद्या सैनिकाने लढाईत गेल्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पाचही प्रकारच्या बाणांपैकी काही बाण सोडून शत्रूला हरविले व पिटाळून लावले. आता शत्रू पळून गेल्यानंतर देखील तो सैनिक बाण पुन: पुन: सोडतच राहिल काय?"
राजा मिलिंद: "नाही भंते, शत्रू पळून गेल्यानंतर बाण सोडण्यात काय उपयोग?"
स्थविर नागसेन: "महाराज, जसे पाच प्रकारचे बाण तसे येथे पाच नैतिक सद्गुण समजावे. सैनिक तसा साधक (योगी) समजावा. जसे लढाईतील शत्रू तसे येथे क्लेश समजावेत. आणि ज्याप्रमाणे पाच प्रकारच्या बाणांचा मारा करुन शत्रूंना हरविले तद्वतच पाच इंद्रिये बाणांनी क्लेश नाश केले जातात.
महाराज, पळून गेलेला शत्रू पुन: परत येत नाही तसे एकदा शमविलेले क्लेश पुन्हा उद्भवत नाहीत." महाराज, याप्रमाणे प्रज्ञा आपले कार्य आटोपून निघून गेल्यानंतर देखील तिच्यामुळे झालेले ज्ञान नष्ट होत नाही, हे या उदाहरणावरुन सिध्द होते."
No comments:
Post a Comment