Saturday, January 30, 2016

मिलिंद प्रश्न

राजा मिलिंद: "भंते, पुन्हा जन्मास न येणार्या अर्हतास सुखाच्या किंवा दु:खाच्या वेदना होतात काय?"

स्थविर नागसेन: "महाराज, काही वेदना होतात, तर काही वेदना होत नाहीत."

राजा मिलिंद: कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत, हे सांगाल काय?"

स्थविर नागसेन: "महाराज, शारीरिक वेदना होतात परंतु मानसिक वेदना होत नाहीत."

राजा मिलिंद: "भंते, हे कसे काय घडते?"

स्थविर नागसेन: "शारीरीक वेदना होण्याची जी कारणे किंवा हेतू आहेत ती कायम असल्यामुळे शारीरीक वेदना होतात, परंतु चित्तात उत्पन्न होणार्या वेदनांची कारणे किंवा हेतू नष्ट झाल्याने मानसिक सुख-दु:खाच्या वेदना त्यास होत नाहीत. खुद्द भगवान बुध्दांनीच म्हटले आहे की, 'अशी व्यक्ती फक्त एकाच प्रकारच्या वेदना भोगते. त्या म्हणजे शारीरीक, मानसिक वेदना त्यास भोगाव्या लागत नाहीत."

राजा मिलिंद: "भंते, अशी अर्हत्व प्राप्त केलेली व्यक्ती सुख व दु:खाच्या वेदना भोगण्याकरीता का बरे थांबून राहतो? आपले शरीर विसर्जन का करीत नाही?"

स्थविर नागसेन: "महाराज, अशा जीवनमुक्तास शरीराबद्दल खास आकर्षण किंवा तिरस्कारही वाटत नाही. तसेच तो कच्च्या स्वरुपात असलेली जीवन फळे तोडू इच्छित नाही, तर ते पूर्ण पक्व होण्याची तो वाट पाहतो. पंडित पुरुष कधी कोणत्याही गोष्टीची घाई करीत नाहीत. ती पूर्ण पक्व होईपर्यंत वाट पाहण्याइतकी त्यांच्यात सहनशीलता असते."

"महाराज, धम्मसेनापती सारीपुत्रांनी सुध्दा म्हटले आहे की, मला मृत्युची किंवा जगण्याची यापैकी कोणतीही इच्छा राहिली नाही. जसा एखादा मजूर काम केल्यानंतर आपल्या दामाची वाट पाहतो त्याप्रमाणे मी जीवनफळाची वाट पाहत आहे. मला मरण नको की, जन्म नको. ज्ञानपूर्वक जागृतपणे मी माझ्या वेळेची प्रतिक्षा करीत आहे."

* वेदनांचे कार्य,,,,,

राजा मिलिंद: "भंते, कुशल (पुण्यमय) वेदना, अकुशल (पापमय) वेदना किंवा अव्याकृत (पाप नाही की पुण्यमय नाही) वेदना आहेत की काय?"

स्थविर नागसेन: "होय महाराज, तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत."

राजा मिलिंद: "भंते, पण जी कुशल असते ती दु:खदायक नसते आणि जी दु:खदायक असते ती सुखद नसते. तेव्हा तर दु:खदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही."

स्थविर नागसेन: "महाराज, समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसर्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असेल, तर त्या दोन्ही गोळ्यांमुळे त्याला वेदना होतील की नाही?"

राजा मिलिंद: "होय भंते, त्यास दोन्ही गोळ्यांमुळे वेदना होतील."

स्थविर नागसेन: "तर दोन्ही वस्तू तप्त आहेत की  काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते!"

स्थविर नागसेन: "तर दोन्ही गोळे थंड आहेत की काय?"

राजा मिलिंद: "नाही भंते!"

स्थविर नागसेन: "तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे! जर तप्त वस्तूच पीडा देणारी असेल, तर दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको आणि जर थंड वस्तूच पीडा देणारी असेल, तर दोन्ही वस्तू थंड नाहीत, तेेव्हा त्यामुळे देखील पीडा व्हायला नको. महाराज, दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही वस्तू थंड नाहीत. अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूंपासून पीडा वा कष्ट व्हायला नको. दोन्ही वस्तूंचे गुणधर्म वेगवेगळे म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे. तेव्हा दोन्ही पीडा पोचवितात. तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही."

राजा मीलिंद: "आपणासारख्या वादपटूशी चर्चा करण्यास मी असमर्थ आहे. त्यातील इंगित काय आहे ते सांगण्याची कृपा करावी."

तेव्हा स्थविरांनी अभिधम्मानुसार स्पष्टीकरण करुन सांगितले....

"महाराज, सांसारीक जीवनातील सहा सुखे असून त्यागमय जीवनातील सहा सुखे आहेत. तसेच सांसारीक जीवनातील सहा दुःखे असून त्यागमय जीवनातील सहा दु:खे आहेत. त्याचप्रमाणे सांसारीक जीवनातील सहा उपेक्षा व त्यागमय जीवनातील सहा उपेक्षा आहेत. याप्रमाणे एकूण ३६ वेदना होतात. हे महाराज, भूतकाळातील ३६ वेदना आणि वर्तमान काळातील ३६ वेदना याप्रमाणे एकूण १०८ वेदना अस्तित्वात आहेत."

राजा मिलिंद: "भंते, आपण फारच छान सांगितले."

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...