राजा मिलिंद: "भंते, जन्मास आलेली व्यक्ति आणि प्रौढावस्थेतील व्यक्ति एकच असतात की बदलून भीन्न भीन्न असतात?" कृपा करुन उदाहरण देऊन समजावून सांगा."
स्थविर नागसेन: "महाराज, जेव्हा आपण अगदी लहान बालक होतात, निव्वळ मांसाचा गोळा, इतके अजाण की, केवळ खाटेवर उताने पडून राहत होता. परंतु आता आपण मोठे झाला आहात. चांगले प्रौढ. तेव्हा आपण लहान असताना जी व्यक्ति होतात, तीच व्यक्ति आता प्रौढावस्थेत आहात असे आपणांस वाटते काय?"
राजा मिलिंद: "नाही भंते, आता माझ्यात भिन्नत्व आले आहे."
स्थविर नागसेन: "महाराज, आपण जर बालपणी असलेली व्यक्ति प्रौढावस्थेत नसाल, तर मग कोणी आपले माता, पिता अगर आचार्यही नाहीत, असेच म्हणावे लागेल. तसे असेल तर कोणी ज्ञानी किंवा शीलवान देखील होऊ शकत नाही. आपल्या भिन्न भिन्न अवस्थांतील म्हणजे बाल्यावस्थेतील माता वेगळ्या आणि प्रौढावस्थेतील माता वेगळ्या मानाव्या लागतील. शिल्प शिकणारा दुसरा आणि शिल्प शिकून तयार झालेला दुसरा मानावा लागेल."
राजा मिलिंद: "तसे नाही भंते, पण यावरुन आपण काय सिध्द करु इच्छिता?"
स्थविर नागसेन: "महाराज, मी बालपणी वेगळा आणि सद्यस्थितीत वेगळा झालो आहे खरा परंतु ह्या सर्व अवस्था या एकाच शरीरावर घडणार्या असल्यामुळे एकाच व्यक्तित समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
राजा मिलिंद: "भंते, उदाहरण देऊन सांगा."
स्थविर नागसेन: "महाराज, समजा एखाद्या माणसाने दिवा लावला, तर तो रात्रभर जळत राहिल की नाही?"
राजा मिलिंद: "होय भंते, रात्रभर जळत राहिल."
स्थविर नागसेन: "पण काय हो महाराज, रात्रीच्या पहिल्या प्रहरी दिव्याची जी वात होती तीच काय दुसर्या तिसर्या प्रहरी राहिल का?"
राजा मिलिंद: "नाही भंते!"
स्थविर नागसेन: "महाराज, तर काय पहिल्या प्रहरी असणारा दिवा दुसरा आणि दुसर्या व तिसर्या प्रहरी असणारा दिवा दुसरा होतो की काय?"
राजा मिलिंद: "नाही भंते, तोच दिवा रात्रभर जळत राहिल.
स्थविर नागसेन: "महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेत एक अवस्था उत्पन्न होत असतानाच पहिली अवस्था नष्ट होत असतें व याप्रमाणे ही प्रक्रिया किंवा प्रवाह एकसारखा सुरु राहतो; या एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही. कारण एका अवस्थेचा लय होतो न होतो तोच दुसरी अवस्था उत्पन्न होऊन पहिलीची रिक्त जागा भरुन काढते. यामुळे व्यक्ति एकच आहे असेही म्हणता येत नाही तसेच दुसरी होती असेही म्हणता येत नाही." एका जन्मातील शेवटच्या विज्ञानाचा (चेतनेचा) नाश होताच दुसर्या जन्माचे विज्ञान उठून उभे होते."
राजा मिलिंद: कृपा करुन अजून एक उदाहरण देऊन सांगावे."
स्थविर नागसेन: "महाराज, दूध काढल्यानंतर विरजन टाकले असता काही वेळाने त्याचे दही बनते. दह्यापासून लोणी व लोण्यापासून तूप बनविले जाते. तेव्हा कोणी म्हणेल की, दुध, दही, लोणी व तूप एकच आहे, तर असे म्हणणाराचे कथन मान्य करता येईल काय?"
राजा मिलिंद: "नाही भंते, परंतु दुधापासूनच दही, लोणी व तूप बनले आहे."
स्थविर नागसेन: "महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूंच्या अस्तित्वाच्या प्रवाहात एक अवस्था उत्पन्न होते, ती लय पावते आणि तात्काळ दुसरी अवस्था उत्पन्न होऊन तिची रिक्त जागा भरुन काढते. याप्रमाणे हा अतुट प्रवाह सतत चालू राहतो. जणू काय पुनर्जन्माचे कार्य एकाच वेळी चालू आहे. मात्र एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही. कारण एकाचा लय (नाश) होताच दुसरा उत्पन्न होतो. या कारणानेच तोच जीव राहतो असेही म्हणता येत नाही आणि उत्पन्न होणारा दुसरा आहे असेही म्हणता येत नाही." एका जन्माच्या शेवटच्या विज्ञानाचा लय होताच दुसर्या जन्माचे प्रथम विज्ञान उठून उभे राहते."
राजा मिलिंद: "भंते, आपले कथन अगदी संयुक्तिक आहे."
No comments:
Post a Comment