Tuesday, March 16, 2021

कलहविवाद-सुत्तं-11-सुत्तनिपात

कलहविवाद-सुत्तं-11-सुत्तनिपात:

८६२. “कलह आणि विवाद, परिदेव, शोक आणि मत्सर हे कोठून उत्पन्न होतात? आणि अहंकार, अतिमान, आणि चाहाड्या कोठून उत्पन्न होतात हें कृपा करून सांग.” (१)

८६३. “कलह आणि विवाद, परिदेव, शोक आणि मत्सर, अहंकार, अतिमान आणि चाहाड्या प्रिय वस्तूंपासून उत्पन्न होतात. मात्सर्यापासून कलह आणि विवाद उत्पन्न होतात, आणि वादविवादांत पडणार्‍या मनुष्यांमध्यें चाहाड्या उद्‍भवतात.” (२)

८६४. “या जगांत वस्तू प्रिय कशामुळें उत्पन्न होतात? जे जगांत लोभ वावरतात ते कशामुळें उत्पन्न होतात? आणि माणसांच्या पुनर्भवाला ज्या कारणीभूत होतात त्या आशा आणि निष्ठा कशामुळें उत्पन्न होतात?” (३)

८६५ “या जगांत वस्तू छंदामुळें प्रिय होतात. जगांत वावरणारे लोभ छंदामुळें होतात; माणसांच्या पुनर्भवाला ज्या कारणीभूत होतात त्या आशा आणि निष्ठा (फलप्राप्ति) यामुळें होतात.” (४)

८६६. “जगांत छंद कशामुळें (उत्पन्न) होतो? ठाम मतें कोठून उत्पन्न होतात? आणि क्रोध, लबाडी, कुशंका किंवा श्रमणानें (बुद्धानें) दाखवून दिलेले असे दुसरे (दोष) कशामुळें (उत्पन्न) होतात?” (५)

८६७ “ज्याला जगांत सुख आणि दु:ख म्हणतात त्यापासून छंद उत्पन्न होतो. (मनाचे विषय बनलेल्या) रूपांमधील उत्पाद आणि व्यय पाहून प्राणी जगांत ठाम मतें बनवतो. (६)

८६८ क्रोध, लबाडी आणि कुशंका या गोष्टीही याच द्वयामुळें (सुखदु:खामुळें) उत्पन्न होतात. श्रमणानें ज्ञान मिळवून हे (कुशलाकुशल) धर्म दाखवून दिले आहेत. म्हणून संशयग्रस्त माणसानें त्याचा धर्ममार्ग शिकावा.” (७)

८६९ “सुख आणि दु:ख हीं कशामुळें (उत्पन्न) होतात? कोणत्या गोष्टीचा नाश झाल्यानें हीं होत (उत्पन्न) नाहींत? आणि (ह्यांचाच) लाभ आणि हानि कशामुळें होतात हेंही मला सांग.” (८)

८७० “स्पर्शामुळें सुख आणि दु:ख हीं (उत्पन्न) होतात; स्पर्श नसला तर हीं होत नाहींत; (ह्यांचा) लाभ आणि (ह्यांची) हानिही याचमुळें होते. असें मी म्हणतों.” (९)

८७१ “जगांत स्पर्श कशामुळें (उत्पन्न) होतो? परिग्रह कशामुळें उत्पन्न होतात? कशाचा नाश झाला असतां ममत्व राहत नाहीं? आणि कशाच्या नाशानें स्पर्श उत्पन्न होत नाहीं?” (१०)

८७२ “नाम आणि रूप (मन-शरीर) यांवर अवलंबून स्पर्श उत्पन्न होतात; इच्छेमुळें परिग्रह (संग्रहण) उत्पन्न होतात. इच्छा नष्ट झाली तर ममत्व राहत नाहीं, आणि रूप-(विचार) नष्ट झाल्यानें स्पर्श उत्पन्न होत नाहीं. (११)

८७३ “कोणत्या गुणांनीं युक्त झाल्यानें रूप-विचार नष्ट होतो? सुख आणि दु:ख कशामुळें नष्ट होतें? हीं कशीं नष्ट होतात, हे मला सांग. तें जाणण्याची माझी इच्छा आहे.” (१२)

८७४ “(प्राकृतिक) संज्ञा नसलेला, किंवा ज्याची संज्ञा नष्ट झाली आहे असा (वेडा किंवा भ्रमिष्ट) नसणारा, (निरोध-समाधि प्राप्त झाल्यामुळें किंवा असंज्ञी-सत्त्व बनल्यामुळें) संज्ञाविहीन झाला आहे असेंही नसणारा, किंवा (अरूपध्यान प्राप्त झाल्यामुळें) रूपें ओलांडलीं आहेत असें ही नसणारा- अशा गुणांनीं जो युक्त, त्याचा रूपविचार नष्ट होतो. कारण ज्याला प्रपंच म्हणतात तो ह्या संज्ञेमुळें होतो१?” (१ टीकाकाराला अनुसरून ह्या कूटगाथेचा अर्थ दिलेला आहे.) (१३)

८७५ “जें आम्हीं विचारलें, तें तूं आम्हांस सांगितलेंस. आता तुला आम्ही आणखी एक विचारतों तें कृपा करून सांग. या जगांत जे पंडित आहेत, ते (रूपविचाराचा नाश) हीच अग्र आत्मशुद्धि म्हणतात काय? किंवा याहून अन्य शुद्धि समजात?” (१४)

८७६. “या जगांत कित्येक पंडित हीच अग्र आत्मशुद्धि असें म्हणतात. पण दुसरे कांहीं आपणाला अनुपादिशेष (निरोधांत) कुशल समजणारे आपला उच्छेदवाद अग्र आहे असें सांगतात. (१५)

८७७. पण हे सर्व उपनिश्रित (आश्रित) आहेत असें जाणून मुनि यांच्या आश्रयांची मीमांसा करून ज्ञान मिळवून मुक्त होतो, आणि वादांत पडत नाहीं; आणि तो सुज्ञ (पुढें) कोणच्याही भवांत जन्म घेत नाहीं. (१६)

कलहविवादसुत्त समाप्त. .

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...