Tuesday, April 28, 2020

सुत्तनिपात

सुत्तनिपात. . . 
[१२. द्वयतानुपस्सनासुत्त]

असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें पूर्वारामांत मिगारमातेच्या प्रासादांत राहत होता. त्या वेळीं पौर्णिमेच्या उपोसथाच्या दिवशीं पूर्ण पौर्णिमेच्या रात्रीं भगवान् भिक्षुसंघासह उघड्या जागीं बसला होता. तेव्हां चुपचाप बसलेल्या भिक्षुसंघाकडे पाहून भगवान् भिक्षूंना म्हणाला- भिक्षूंनो, जे ते कुशल, आर्य, निर्यानक व संबोधगामी धर्म आहेत, त्या कुशल, आर्य, निर्यानक व संबोधगामी धर्माच्या श्रवणापासून (शिक्षणापासून) फायदा कोणता असें जर, भिक्षूंनो, तुम्हांस विचारणारे आढळले, तर त्यांना म्हणावें कीं, द्वैत धर्माचें (पदार्थाचें) यथार्थ ज्ञान करून घेणें हा फायदा होय. तें द्वैत कोणतें म्हणतां? हे दु:ख व हा दु:खसमुदय मिळून एक अनुपश्यना, आणि हा दु:खनिरोध व हा दु:खनिरोधगामी मार्ग मिळून दुसरी अनुपश्ययना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची सम्यक्-अनुपश्यना करणार्‍या, अप्रमत्त, उत्साही व दृढचित्त होऊन वागणार्‍या भिक्षूला याच जन्मीं अर्हत्त्व किंवा, उपादानशेष राहिल्यास, अनागामिता—या दोहोंपैकीं एक फळ मिळण्याची अपेक्षा करतां येईल. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—

७२४ जे दु:ख आणि दु:खाचा उगम जाणत नाहींत, आणि तें दु:ख जेथें नि:शेष विरोध पावतें तें स्थान (निर्वाण), व त्या दु:खनिरोधाप्रत जाणारा मार्ग जाणत नाहींत, (१)

७२५. त्यांना चित्ताची विमुक्ति आणि प्रज्ञेनें मिळालेली विमुक्ति नाहीं; ते (संसारदु:खाचा) अन्त करूं शकत नाहीत, आणि तेच जन्मजरा पावतात.(२)

७२६ जे दु:ख आणि दु:खाचा उगम जाणतात, आणि तें दु:ख जेथें नि:शेष निरोध पावतें तें स्थान व त्या दु:खनिरोधाप्रत जाणारा मार्ग जाणतात, (३)

७२७ ते चित्तविमुक्तीनें व प्रज्ञेनें मिळविलेल्या विमुक्तीनें संपन्न होत; ते (संसारदु:खाचा) अन्त करण्यास समर्थ होत आणि ते जन्मजरा पावत नाहींत.(४)

दुसर्‍याही पर्यायानें सम्यक्-द्वैतानुपश्यना असेल काय असें जर, भिक्षूंनो, तुम्हांस कोणी विचारणारे भेटतील तर, अशी असेल, असें त्यांस म्हणावें. ती कशी? जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व उपाधींपासून, हीं एक अनुपश्यना, आणि उपाधींचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव होत नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची...इत्यादी...तो सुगत शास्ता म्हणाला—

७२८ जीं कांहीं जगांत अनेक प्रकारचीं दु:खें आहेत, तीं सारीं उपाधींपासून होतात. जो अविद्वान् उपाधि जोडतो, तो मन्दबुद्धि पुन: पुन: दु:ख भोगतो. म्हणून दु:खाचें उत्पत्तिकारण पाहणार्‍या जाणत्या मनुष्यानें उपाधि जोडूं नयें.(५)

दुसर्‍याही पर्यायानें सम्यक्-द्वैतानुपश्यना असेल काय असें जर, भिक्षूंनो, तुम्हांस विचारणारे भेटतील तर, अशी असेल, असें त्यांस म्हणावें. ती कशी? जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व अविद्येपासून, हीं एक अनुपश्यना, आणि अविद्येचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव होत नाहीं ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची...इत्यादी...तो सुगत शास्ता म्हणाला—

७२९ जन्ममरणमय संसारांत जे पुन: पुन: पडतात, व मनुष्यत्व किंवा मनुष्येतरभाव पावतात, ते केवळ अविद्येमुळें ती गति भोगतात. (६)

७३० अविद्या हा महामोह आहे, ज्याच्यामुळें माणूस चिरकाळ संसारांत पडतो. पण जे विद्यालाभी प्राणी आहेत, ते पुनर्जन्म पावत नाहींत.(७)

दुसर्‍याही पर्यायानें...इत्यादी...ती कशी? जें कांहीं दु:ख उद्भवतें तें सर्व संस्कारापासून, ही एक अनुपश्यना; आणि संस्कारांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची...इत्यादि...तो सुगत शास्ता म्हणाला—

७३१ जें काहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व संस्कारांपासून; संस्कारांच्या निरोधानें दु:ख उद्भवत नाहीं.(८)

७३२ संस्कारांपासून दु:ख उद्भवतें, हा (संस्कारांतील) दोष जाणून सर्व संस्कार नाहींसे करून व संज्ञेचा निरोध करून, आणि याप्रमाणें दु:खनाश होतो हें यथार्थतया जाणून,(९)

७३३ सम्यग्दर्शी, वंदपारग, पण्डित सम्यक्-ज्ञानाच्या योगें भारबन्धन तोडून पुनर्जन्म पावत नाहींत.(१०)

दुसर्‍याही पर्यायानें.....इत्यादि...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व विज्ञानापासून, ही एक अनुपश्यना; आणि विज्ञानाचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि...तो सुगत शास्ता म्हणाला—

७३४ जें कांहीं दु:ख उद्भवतें तें सर्व विज्ञानापासून; विज्ञानाच्या निरोधानें दु:ख उद्भवत नाहीं.(११)

७३५ विज्ञानापासून दु:ख उद्भवतें, हा (विज्ञानांतील) दोष जाणून विज्ञानाच्या वीततृष्ण भिक्षु परिनिर्वाण पावतो.(१२)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व स्पर्शापासून, ही एक अनुपश्यना; आणि स्पर्शाचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७३६. जे संसारप्रवाहांत वाहत जाणारे, कुमार्गानें चालणारे, स्पर्शपरायण असे प्राणी त्यांजपासून संयोजनाचा क्षय फार दूर आहे(असें समजावें).(१३)

७३७. पण जे स्पर्श जाणून ज्ञानवान् होऊन निर्वाणांत रत होतात, ते वीततृष्ण स्पर्शाच्या निरोधानें परिनिर्वाण पावतात.(१४)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादि....ती कशी? जें कांहीं दु:ख उद्भवतें तें सर्व वेदनांपासून, ही एक अनुपश्यना; आणि वेदनांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७३८ आध्यात्मिक किंवा बाह्य, सुख, दु:ख किंवा उपेक्षा यांपैकीं कोणतीही वेदना,(१५)

७३९ ती नश्वर, लुप्त होणारी व दु:खद आहे व तिचा अनुभव मिळाल्यानंतर अखेर तिचा व्यय होतो असें जाणून भिक्षु तिच्या विषयीं विरक्त होतो, व वेदनांच्या क्षयानें निस्तृष्ण होऊन परिनिर्वाण पावतो.(१६)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व तृष्णेपासून, ही एक अनुपश्यना; आणि तृष्णेचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७४० तृष्णेचा साथी होऊन दीर्घ काळ पुनर्जन्म घेत मनुष्य मनुष्यत्व किंवा मनुष्येतरभाव पावून संसार अतिक्रमूं शकत नाहीं.(१७)

७४१ तृष्णेनें दु:खाचा उद्भव होतो, हा (तृष्णेंतील) दोष जाणून, वीततृष्ण, आदानविरहित व स्मृतिमान् होऊन, भिक्षु म्हणून प्रव्रज्या घ्यावी. (१८)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व उपादानांपासून, ही एक अनुपश्यना; आणि उपादानांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७४२ उपादानांपासून भव होतो, उत्पन्न झालेला प्राणी दु:ख भोगतो आणि जन्मलेल्याला मरण येतें, हा दु:खाचा उद्भव होय.(१९)

७४३ म्हणून सम्यकज्ञानानें उपादानक्षय करून व जन्मक्षय जाणून, पंडित पुनर्जन्म पावत नाहींत.(२०)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें कर्मांच्या धडपडीपासून, ही एक अनुपश्यना; आणि कर्माच्या धडपडीचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७४४. जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व कर्माच्या धडपडीपासून; कर्मांच्या धडपडीच्या निरोधानें दु:खाचा उद्भव होत नाहीं.(२१)

७४५ कर्माच्या धडपडी पासून दु:ख होतें, हा (कर्मांच्या धडपडींतील) दोष जाणून सर्व कर्माची धडपड सोडून ज्या ठिकाणी कर्माची धडपड नाहीं अशा (निर्वाणांत) मुक्ति पावणार्‍या, (२२)

७४६ आणि भवतृष्णेचा उच्छेद करणार्‍या शांतचित्त भिक्षूची जन्मपरंपरा मागें पडली; त्याला पुनर्जन्म राहिला नाहीं.(२३)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व १आहारांपासून, (१ अन्न, स्पर्श, मन:संचेतना व विज्ञान-असे चार प्रकारचे आहार निरनिराळ्या लोकांतील प्राण्यांकरितां सांगितले आहेत.) ही एक अनुपश्यना; आणि आहारांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७४७. जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व आहारांपासून; आहारांच्या निरोधानें दु:खाचा उद्भव होत नाहीं.(२१)

७४८ आहारांपासून दु:ख होतें, हा (आहारांतील) दोष जाणून, व सर्व आहार ओळखून, कोणच्याही आहारांवर अवलंबून न राहतां,(२५)

७४९ सम्यकप्रज्ञेनें आरोग्य पाहून आश्रवांचा नाश करून जो विचारपूर्वक आहारांचा उपयोग करतो, तो धर्मस्थित वेदपारग पुन: नामाभिधान (जन्म) पावत नाहीं.(२६)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व प्रकंपांपासून, ही एक अनुपश्यना; आणि प्रकंपांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७५०. जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व प्रकंपांपासून; प्रकंपांच्या निरोधानें दु:खाचा उद्भव होत नाहीं.(२७)

७५१ प्रकंपांपासून दु:ख होतें, हा (प्रकंपांतील) दोष जाणून आणि म्हणून प्रकंप सोडून, व संस्कारांचा निरोध करून अप्रकम्प्य, अनुपादान व स्मृतिमान् होऊन भिक्षु म्हणून प्रव्रज्या घ्यावी.(२८)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? आश्रित हा चलन पावतो, ही एक अनुपश्यना; आणि अनाश्रित हा चलन पावत नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७५२ अनाश्रित चलन पावत नाहीं, पण जो आश्रित तो उपादानामुळें मनुष्यत्व व मनुष्येतरभाव यांनीं बनलेला संसार अतिक्रमूं शकत नाहीं.(२९)

७५३ आश्रयांमध्यें हा भयंकर दोष जाणून अनाश्रित, अनुपादान व स्मृतिमान् होऊन भिक्षु म्हणून प्रव्रज्या घ्यावी.(३०)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? भिक्षूंनो, रूपावचर-देवलोकांहून अरूपावचर देवलोक शांततर आहे, ही एक अनुपश्यना; आणि अरूपावचर-देवलोकांहून निरोध (निर्वाण) शांततर, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें.....इत्यादी... तो सुगत शास्ता म्हणाला—

७५४ जे रूपावचर-देव व अरूपावचर-देव आहेत, ते निरोध जाणत नाहींत म्हणून पुनर्जन्म पावतात. (३१)

७५५ पण जे रूपावचर-देवलोक जाणून व अरूपावचर-देव-लोकाविषयीं अनासक्त होऊन निरोधांत मुक्ति पावतात, ते जन मृत्यूला सोडून जातात.(३२)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? भिक्षूंनो, सदेवक समारक लोकांत सश्रमण ब्राह्मण आणि सदेवमनुष्य प्रजेंत जें सत्य समजलें जातें तें खोटें आहे असें सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही एक अनुपश्यना; आणि भिक्षूंनो, सदेवक .....इत्यादी....सदेवमनुष्य प्रजेंत जे खोटें समजलें जातें ते खरें आहे असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें.... इत्यादी....तो सुगत शास्ता म्हणाला—

७५६ अनात्म्यांत आत्मा आहे असें मानणार्‍या व नामरूपांत बद्ध झालेल्या सदेवक लोकांकडे पहा. ते हेंच सत्य आहे असें समजतात. (३३)

७५७ ज्या ज्या रीतीनें ते कल्पना करतात, त्याहून ती वस्तु निराळीच असते, आणि त्यांचीं कल्पना खोटी ठरते. कारण जें क्षणभंगुर तें नश्वर असतें.(३४)

७५८ पण निर्वाण अनश्वर आहे आणि आर्य ‘तें सत्य आहे’ असें जाणतात आणि त्या सत्याच्या ज्ञानानें निस्तृष्ण होऊन ते निर्वाण पावतात.(३५)

दुसर्‍याही प्रकारानें सम्यक्-द्वैतानुपश्यना असेल काय असें जर भिक्षूंनो, तुम्हांस कोणी विचारणारे भेटतील, तर अशी असेल असें त्यांस म्हणावें. ती कशी? भिक्षूंनो, सदेवक....इत्यादी...सदेवकमनुष्य प्रजेंत जें सुख समजलें जातें तें दु:ख आहे, असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही एक अनुपश्यना; आणि भिक्षूंनो, सदेवक....इत्यादी...सदेवकमनुष्य प्रजेंत जें दु:ख समजलें जातें तें सुख आहे, असें आर्य सम्यक्-प्रज्ञेनें यथार्थतया उत्तम रीतीनें पाहतात, ही दुसरी अनुपश्यना; भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची सम्यक्-अनुपश्यना करणार्‍या, अप्रमत, उत्साही व दृढचित्त होऊन वागणार्‍या भिक्षूला याच जन्मीं अर्हत्त्व किंवा, उपादानशेष राहिल्यास, अनागामिता-या दोहोंपैकी एक फळ मिळण्याची अपेक्षा करतां येईल. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—

७५९ रूप, शब्द, रस, गन्ध, स्पर्श आणि १धर्म (१ टिकाकर ह्या शब्दासह सहा आलम्बनांचा निर्देश करतो.) म्हणून जे सगळे आहेत त्यांना इष्ट, कान्त आणि मनोहर समजतात.(३६)

७६० सदेवक लोकांना हे सुखकारक वाटतात, आणि ते जेथ निरोध पावतात तें (स्थान) त्यांना दु:खकारक वाटतें. (३७)

७६१ सत्कायबुद्धीचा१ (१ ‘पंचस्कन्धाचा’ असा अर्थ टीकाकार घेतो. पण गाथा २३१ मध्यें हा ‘सक्काय’ शब्द आलेला आहे, तेथें ह्या शब्दाचा अर्थ ‘देहांत आत्मा आहे असा समज’-असा आहे.) निरोध सुखकारक आहे असें आर्य जाणतात; पण त्या ज्ञात्यांच्या उलट लोकांची समजूत असते.(३८)

७६२ इतर ज्याला सुख समजतात तें दु:ख आहे असें आर्य जाणतात; व जें इतरांना दु:ख वाटतें तें सुख आहे असें आर्य जाणतात. ज्यांत मूर्ख लोक मोहित होतात, तो हा दुर्ज्ञेय लोकस्वभाव पहा!(३९)

७६३ (अविद्येंने) आच्छादिलेल्यांना तम व अज्ञानांना हा अन्धकार वाटतो. पण डोळसांना जसा प्रकाश तसा हा प्रकार सन्तांना स्पष्ट दिसतो. धर्मज्ञानविहीन मूढ आपणांपाशींच असलेला (अमूल्य ठेवाही) जाणत नाहींत.(४०)

७६४ भवासक्तिपरायण, भवनदींत वाहणारे, व माराच्या तडाक्यांत सांपडलेले जे, त्यांना या धर्माचा बोध होणें सोपें नाहीं.(४१)

७६५ लोक सम्यक्-ज्ञानानें जें पद जाणून अनाश्रव होऊन परिनिर्वाण पावतात, त्या पदाचा आर्यांवाचून दुसर्‍या कोणास बोध होणें शक्य नाहीं.(४२)

असें भगवान् म्हणाला. मुदित मनानें त्या भिक्षूंनीं भगवन्ताच्या भाषणाचें अभिनन्दन केलें. हें व्याख्यान केलें जात असतां साठ भिक्षूंची अन्त:करणें उपादानरहित होऊन आश्रवांपासून मुक्त झालीं.

द्वयतानुपस्सनासुत्त समाप्त. . .

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...