जेव्हा पृथ्वी धातूचे प्राबल्य वाढते तेव्हा कधी जड, तर कधी हलके-हलके वाटू लागते. जेव्हा वायू धातू प्रबल होतो तेव्हा चलन वलन, तरंग, धडधड वाढल्याचा अनुभव येतो. प्रत्येक धातू आपापल्या गुण, धर्म, स्वभावानुसार शरीरांत ती ती अवस्था निर्माण करत असतो. आपल्या देहातील परमाणु समूहात या चारही महाभूतांचे गुणधर्म सामावली आहेत. या चार महाभूतांपैकी एखादे अधिक समर्थ बनते तेव्हा ते आपल्या गुणाचा प्रभाव दाखविते आणि आपल्याला संवेदनांच्या रुपात त्याचा अनुभव मिळतो. अन्य धातू सुप्तावस्थेत असतात. कधी-कधी असे देखील घडते की दोन धातू एकदम प्रबळ होतात तेव्हा दोन्ही गुण, धर्म, स्वभावाचा अनुभव होतो. पण असे कधी घडत नाही की चारही धातू एकाच वेळी प्रबळ बनून अंमल गाजवितात.
बाह्य जगात आपण बर्फ पाहतो, तेव्हा त्याला पृथ्वी-धातू मानतो. बर्फ वितळला, तरल झाला, पाणी होऊन वाहू लागले की ते जल-धातू मानतो. वाफ होऊन, हवेत तरंगू लागली की वायु-धातू प्रकट होतो, आणि या तीनही अवस्थामध्ये त्यात जे तापमान असते त्याला अग्नि-धातू म्हणतो.
याप्रमाणे आपल्या अंतरंगात आपल्याला धातूंची अनुभूती येत असते. त्याकडे तटस्थतेने, साक्षीभावाने, अलिप्तपणे पहायचे असते. हे शरीरातील रसायन आहे, त्यामुळे शरीरात कधी या प्रकारे कलाप (परमाणु) तर कधी त्या प्रकारचे कलाप आपापल्या गुण, धर्म, स्वभावासह उत्पन्न होतात, नष्ट होतात. निसर्गाचा हा नियम, हा प्रपंच समजावून घ्यायला हवा. भोक्ताभाव ठेवला तर राग (लोभ) आणि द्वेषाचे नवीन संस्कार, प्रतिक्रिया बनतील. अज्ञानामुळे भोगवादाची व आत्मवादाची प्रवृत्ती निर्माण होत असते. भोगवादी किंवा आत्मवादी बनतो तेव्हाच बंधनात अडकून बसतो. ज्ञान झाले, जागृती आली, बोधी निर्माण झाली की मुक्तिचा मार्ग मोकळा होतो.
आपण आता हे देखील समजून घेऊ या की भिन्न-भिन्न परमाणु प्रबळ का बनतात? त्याचे कारण काय? कारणावाचून कार्य होत नाही हा जगाचा नियम आहे. याची चार प्रमुख, महत्त्वाची कारणे आहेत. एक महत्त्वाचे कारण असे आहे की या परमाणुपुंजाला म्हणजेच आपल्या शरीराला आपण भौतिक आहार देतो ते भोजन ज्या प्रकारचे देतो त्याच प्रकारचे परमाणु बनतात. एखाद्या दिवशी तिखटमिठाचे मसालेदार भोजन केले तर शरीरात उष्णता वाढल्याचे जाणवते. जळजळू लागते. याला म्हणतात अग्नि धातूचा प्रभाव. एखाद्या दिवशी शिळेपाके खाल्ले किंवा तळलेले पचायला जड असे अन्न खाल्ले तर जडपणा वाटतो. ही झाली पृथ्वी-धातू प्रबळ बनण्याची किमया. एखाद्या दिवशी आपण चांगला चौरस आहार घेतला तर शरीराचा कणन कण उल्लासित होतो. सारे शरीर सक्षम राहते. कार्यप्रवण होते. जर भोजन अव्यवस्थित झाले तर त्याचा परिणाम शरीर स्वास्थ्यावर होतो. स्वास्थ्य बिघडते. जसा आहार, भोजन त्याप्रकारे परमाणुंची निर्मिती होते. अशा प्रकारे आहार हे एक महत्त्वाचे कारण आहे.
शरीरातील परमाणु निर्मितीचे आणखीही एक असेच महत्त्वाचे कारण आहे. भोजनाव्यतिरिक्त आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाकणाद्वारे निरंतर आहार घेत असतो. हा आहार आपल्याला बाहेरच्या वातावरणातून मिळत असतो. जसे बाहेरचे वातावरण असते, जसे हवामान असते तसाच आहार मिळत असतो व त्याप्रमाणे शरीरात परमाणु निर्माण होत असतात. अशा प्रकारे आपल्या शरीराला दोन प्रकारचे आहार मिळताहेत. ही शरीर-धारा म्हणजे रुप-धारा, हिच्याबरोबर चित्त-धारा किंवा जिला नाम-धारा म्हणतात, ती पण चालू असते. ही चित्त-धारा म्हणजे चेतनेचा विच्छिन्न प्रवाह सुध्दा आहारावाचून पुढे वाहत नाही. या चैतन्य प्रवाहालाहि चेतनेचाच आहार मिळतो. चेतनेचा हा आहार कोणता? ज्या क्षणी आपण जो संस्कार बनवतो, चित्तधारेचा त्या क्षणाचा तोच आहार असतो, तेच भोजन असते. अनुभूतीच्या पातळीवरुन हा सारा खेळ, ही सारी किमया पहायची. संताप आला, क्रोधाग्नि भडकला की पुढच्या क्षणाचे चित्त त्याच क्रोधाचे अपत्य असणार. दुसर्या क्षणी पुन्हा क्रोधाची प्रतिक्रिया -- संस्कार उमटणार. या क्रोधाच्या आहारावर ही चित्त-धारा पुढे सरकत राहते. एखादी वासना प्रबळ झाली तर त्या वासनेच्या आधाराने चैतन्यप्रवाह पुढे वाहत राहतो. प्रत्येक क्षणाला हे घडत असते. चित्तधारेला गतिमान होण्यासाठी प्रत्येक क्षणाला संस्काराचा आहार हवा, भोजन हवे. जर नवीन संस्कार मिळाला नाही तर जुन्या संस्कारांचे भांडार आहे त्यातून आहार मिळतो. जुने संस्कार उफाळून वर येतात. जी जुनी बीजे आहेत त्यांचे कर्मफळ फळाला येते. ते फळ चैतन्याचा आहार बनते, प्रवाह पुढे वाहू लागतो. जेव्हा फळ उफाळून वर येते, त्यात एक प्रकारची संवेदना निर्माण होते. तिला आम्ही प्रिय मानले तर रागाचा (लोभाचा) नवा संस्कार बनविला. अप्रिय मानले तर द्वेषाचा नवा संस्कार बनविला. जुन्या कर्मबीजाचे फळ तयार होऊन वर येते न येते तोच नवीन बीज पेरायला लागलो. याप्रमाणे क्षणाक्षणाला नवीन संस्कार बनवतच असतो. 'सङ्कार पच्चया विञ्ञाणं' या क्षणाच्या संस्कारातूनच दुसर्या क्षणाचे दुसरे विज्ञान, म्हणजे चित्त उत्पन्न होत असते. या क्षणाचे काही संस्कार नसले तर कोणत्या तरी पूर्व-संस्काराचे फळ उफाळून वर येते, तसे नवे विज्ञान म्हणजे नवे चित्त निर्माण होते. ज्या प्रकारचे नवे संस्कार आपण निर्माण करु किंवा जशी जुन्या कर्माची फळे मिळू लागतात तसेच परमाणु निर्माण होतील आणि तशीच संवेदना होऊ लागेल.
मनाचा आणि शरीराचा दृढ संबंध आहे. हे जे कलाप (परमाणु) आहेत ते मन आणि शरीर दोहोंमुळे निर्माण होतात. जर मनात संताप जागा झाला तर लगेच शरीरात अग्नितत्व प्रबळ बनते. ज्वलन क्रिया, उष्णता वाढते. भयाची भावना निर्माण झाली तर शरीराला कंप सुटतो. वायुतत्व प्रधान परमाणु निर्माण होतात. चित्तावर जसे संस्कार टाकाल तसेच परमाणु उत्पन्न होतील. क्रोधाचा जुना संस्कार जरी प्रबळ झाला तरी ज्वलन क्रिया प्रज्वलित होते. संतापाची लाट निर्माण होते. सभोवतालच्या वातावरणांत गारवा असला तरी शरीर गरम होते, उष्णता जाणवते.
अशा प्रकारे शरीरात जे परमाणु उत्पन्न होत राहतात ते आहारामुळे असोत, बाह्य वातावरणामुळे असोत किंवा जुन्या संस्कारामुळे असोत या संवेदनांकडे आपण जर अनासक्त भावाने, अलिप्तपणे पाहू लागलो तर नवीन संस्कार निर्माण होणार नाहीत; जुने क्षीण होतील, कमी होतील. अशा प्रकारे गुंता सोडविण्याची युक्ति मिळाली. मार्ग सापडला. अजूनपर्यंत अज्ञानामुळे जे संस्कार निर्माण होत होत त्यांचे रहस्य लक्षात येऊ लागेल. 'अविज्जा पच्चया सङ्कारा' एखादा परमाणु उठला त्याने आपला नैसर्गिक स्वभाव प्रकट केला. संवेदना निर्माण झाली. दु:खदायक संवेदना निर्माण झाली तर प्रतिक्रिया होईल --- नको, नको, नको. द्वेषच द्वेष निर्मिती. सुखद संवेदना निर्माण झाली --- हवी हवीशी वाटली की रागच राग (लोभच लोभ) याप्रमाणे प्रत्येक क्षणाला संस्कार निर्माण होत राहतात.
तुमच्या लक्षात रहस्य आले तर मग कोणतीच प्रतिक्रिया होता कामा नये. धैर्याने, समतेने, साक्षीभावाने, संवेदनेचा स्वभाव पहाल तर नवीन संस्कार निर्माणच होणार नाहीत व जुने संस्कार कमी होत जातील. 'खीणं पुराणं, नवं नत्थि सम्भवं' बस मुद्याची गोष्ट लक्षात आली. बंधनापासून मुक्त होण्याची पध्दत मिळाली. पण बंधनमुक्त होण्याचे हे काम तुम्हाला स्वत:लाच करावे लागेल. जर तुम्ही स्वत: अनुभूतीच्या कसोटीवर घासूनच पाहिले नाही की केव्हा राग (लोभ) निर्माण झाला, आणि केव्हा द्वेष जागला तर राग आणि द्वेषापासून मुक्तता कशी होणार? जेव्हा जेव्हा संवेदना अनुभवाल, ती सुखद असो वा दुखद तिच्याकडे साक्षीभावानेच पाहिलेत तर राग किंवा द्वेष निर्माण होणार नाही. प्रज्ञाच जागृत होईल. 'वेदना पच्चया पञ्ञा' अशा रीतीने प्रज्ञेमध्ये पुष्ट होत होत तुम्ही स्थितप्रज्ञ बनाल. जीवनमुक्त व्हाल. केवळ 'स्थितप्रज्ञा' ची लक्षणे पाठ करुन माणूस स्थितप्रज्ञ होत नाही. स्वत: श्रध्दापूर्वक परिश्रम केले तरच हे होईल. या मार्गात अनंत अडचणी आहेत व येतील; पण त्या अडचणी दूर करुन साधना केली पाहिजे. काही तरी चमत्कार होऊन हे घडणार नाही.
हा अज्ञानी, मूढ, बुध्दि-विलासी स्वभाव कसा बनला? सतत एकाच प्रकारचा व्यवहार करीत राहिल्यामुळे माणसाचा स्वभाव बनत जातो. लोभ करण्याचा स्वभाव, द्वेष करण्याचा स्वभाव. हे स्वभाव बदलायचे म्हणजे थोडासा कालावधी लागणारच. पण स्वभाव बदलता येऊ शकतो एवढी जाणीव झाली, म्हणजे फार मोलाची गोष्ट साध्य झाली. यापुढे मग आपला स्वभाव बदलण्याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि तेच करीत आहोत. एखादी घटना घडल्यानंतर जर आपण समतादृष्टीने पाहू लागलो तर आपण आंधळा राग, आंधळा द्वेष करणार नाही. समतेत राहिलो तर क्रिया होईल, प्रतिक्रिया नाही. क्रिया नेहमी रचनात्मक, विधायकच असते म्हणून ती कल्याणकारी, मंगलमय, पवित्र असते.
No comments:
Post a Comment