साम्यवाद :
साम्यवादाच्या (मार्क्सवादाच्या) विजयदुंदुभीने तुम्ही बावरून जाऊ नका, भुलून जाऊ नका किंवा दिपूनही जाऊ नका. तुम्ही बौद्ध विचारसरणीचा व तत्वज्ञानाचा एक दशांश भाग जरी आत्मसात करू शकला तर साम्यवाद जे काही निर्माण करू इच्छितो, ते तुम्ही करूणा, न्याय व सद्भावना यांच्या जोरावर घडवून आणू शकाल यात तिळमात्र शंका नाही.
समाज :
समाज सुदृढ होण्याकरिता संख्याबल, संपत्तिबल आणि मनोबल या शक्ती आवश्यक आहेत. संख्याबल सशक्त आणि संघटितपणामुळे प्राप्त होते. संपत्तिबल व्यापार दिर्घोद्योग व निर्वेसनीपणामुळे प्राप्त होते आणि मनोबल सद्धम्माचरणाने प्राप्त होते.
चातुर्वर्ण्य :
मला चातुर्वण्याची अत्यंत घृणा आहे, आणि माझा समग्र समाज त्याविरुद्ध क्रांती करण्यास उभा ठाकलेला आहे. या चातुर्वर्ण्यप्रणीत समाज रचनेचा सूक्ष्म अभ्यास केला असता ही समाज पद्धती अत्यंत घातक, अव्यवहारी आणि अयशस्वी असल्याची माझी खात्री झाली आहे. भारतात सामाजिक क्रांत्या का झाल्या नाहीत? याचे कारण हिंदू समाजातील कनिष्ट वर्ग चातुर्वण्यांच्या विपन्नावस्थेला नेणा-या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्याच्या दृष्टीने हतबल झाला होेता. चातुर्वर्ण्य या सामाजिक संस्थेसारखी दुसरी कोणतीही संघटना अधिक अध:पात करणारी आढळणारी नाही. या संघटनेमुळे समाज मृतवत होतो, तो विकलांग होतो आणि उपकारक मदत करण्यासारखे कार्य करण्यापासून त्याला परावृत्त केले जाते. चातुर्वर्णाच्या आधाराने हिंदू समाजाची पुनर्घटना अशक्य आहे, नव्हे ते अपायकारक आहे. कारण चातुर्वर्णामुळे सामान्य जनतेचा ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारला जातो. शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाकारल्यामुळे सामान्य जनता पौरूषहीन बनते.
जातीसंस्था :
जाती संस्था हे केवळ श्रमविभाजन नव्हे, ते श्रमिकांचे सुद्धा विभाजन आहे. श्रमिकांच्या गटांची जन्मजात प्रतवारी लावून देणारी ही संस्था आहे. दुस-या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला अशा त-हेचा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही. जोपर्यंत जाती जिवंत आहेत तोपर्यंत हिंदूमध्ये संघटनाची आशा नाही आणि जोपर्यंत संघटना नाही तोपर्यंत हिंदू दुर्बल व लाचार राहतील. बहिष्कृत मानव हे जातिव्यवस्थेचे अवांतर उत्पादन आहे. जातिव्यवस्था नष्ट केल्याशिवाय, कोणत्याही उपायाने जातिबहिष्कृतांचा उद्धार होणार नाही. अनेक वचनात शक्य असते. एकवचनात ती अशक्यच.
बुद्धि :
बुद्धिमत्ता म्हणजे सद्गुण नाही, हे खरे आहे. बुद्धिक्षमता ही एक साधन आहे व तिचा उपयोग कसा करावा हे, बुद्धिमान व्यक्तीच्या अंतिम हेतूवर अवलंबून आहे. बुद्धिमान हा सज्जन असतो, त्याप्रमाणे तो दुर्जनही असू शकतो. तसेच या लोकांत रंजल्यागांजल्यांची सेवा करणारे, पतितांचा उद्धार करणारे महापुरुष जसे सापडतात, तसेच हीन मनोवृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक देखील यांच्यात असतात. बुद्धिचा उपयोग भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्यासाठी हवा.
भाषा :
सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो!
कार्य :
आमचे कार्य एवढे मोठे आहे की, आयुष्यातील एक-एक मिनिट देखील कमी पडतो.
युद्ध :
“युद्धाचा नायनाट केवळ बौद्धिक पातळीवर आव्हान करून होणार नाही तर युद्धप्रवृत्तीला विरोध करणारे मनोविकार व जीवनाकडे पहाण्याची विधायक प्रवृत्ती यांच्या संवर्धनामुळे होईल.” हे रसेलचे म्हणणे यथार्थ आहे. रसेल हे युद्धविरोधी होते. परंतु शांतीपंथवादी नव्हते. क्रियाशीलतेमुळे वाढ होते, निश्चलतेने नाश होतो. शक्ती म्हणजे उत्साह आणि ती विधायक कार्य साधण्याकडे लावली पाहिजे. तिचा वापर संहाराकरिता होता कामा नये.
ज्ञान :
पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. माझा प्रयत्न सर्व क्षेत्रांतील अज्ञानांच्या जागी ज्ञान संवर्धनाचा आहे. करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो.
मुक्ती :
एखादी व्यक्ती तुमची मुक्ती करील या भ्रमात तुम्ही राहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हातात आहे. तुम्ही क्रियावान व्हा. तोच मुक्तीचा मार्ग आहे.
पश्चात्ताप :
माणसाच्या हातून चुका होताच, त्याला पश्चातापही होतो. पण पश्चातापाने त्या चुकीची भरपाई होईलच असे नाही, जीवनातील हेच मोठे दुःख होय.
मन :
मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा विकास झाला असे म्हणता येणार नाही. उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल. जो कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो त्याच्या मध्ये उत्साह निर्माण होतो व त्याचा उत्कर्ष होतो.
प्रयत्न :
नुसत्या काळावर भिस्त ठेवून हितावह होणार नाही. कालगतीबरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे आवश्यक आहे. तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत बदल होणार नाही.
बुद्ध धर्म :
हा धर्म सर्वतोपरि परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
No comments:
Post a Comment