Sunday, February 28, 2016

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, तुम्ही लोक संसार संसार म्हणून उल्लेख करता, तर तो संसार काय आहे? ''

''महाराज, जीवप्राणी येथे जन्म घेतो व येथेच मृत्यू पावतो. येथे मृत्यू पावल्यानंतर दुसर्या ठिकाणी जन्म घेतो, तेथे जन्म घेऊन तेथेच मृत्यू पावतो. तेथे मृत्यू पावल्यानंतर पुन्हा तिसर्या अवस्थेत जन्म घेतो. संसाराचा हाच अर्थ आहे. ''

''कृपा करुन उदाहरणाने स्पष्ट करावे. ''

''महाराज, कोणी मनुष्य पिकलेला आंबा खातो व त्याची कोय ( बीज ) जमीनीत पुरतो. त्याला अंकुर फूटून त्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला आंबे लागतात. ते पिकल्यानंतर तो मनुष्य पुन्हा ते आंबे खाऊन त्याची कोय जमीनीत पुरतो. यापासून अजून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्यालासुध्दा फळे येतात, याप्रमाणे झाडापासून आंबे, आंब्यापासून झाड असे हे कोडे कोणीही उकलू शकत नाही. अर्थात याचा शेवट कोठेच होत नाही़.'' महाराज, याप्रमाणेच जन्मास येणे व मरणे, हाच संसार होय.''

''भंते, आपण छान समजावून सांगितले. ''

» स्मृतीचे स्मरण होते...

राजा मिलिंद म्हणाला, ''पूर्वी केलेल्या कृत्यांचे किंवा घडलेल्या गोष्टींचे स्मरण कसे होते? ''

''स्मृतीने स्मरण होते महाराज! ''

''भंते, स्मृतीने कसे, चित्तामुळे स्मरण होत असते ना? ''

''महाराज, आपण केलेले एखादे कार्य आता विसरलेत काय? ''

''होय भंते! ''

''महाराज, त्यावेळी आपल्याला चित्त नव्हते काय? ''

''भंते, चित्त होते, स्मृती नव्हती.''

''महाराज, मग आपण कसे म्हणाले की, चित्ताने ( मनाने ) स्मरण केले जाते, स्मृतीने नव्हे? ''

''भंते, आता मला बरोबर समजले.''

» स्मृतीचे उगमस्थान...

राजा म्हणाला, ''भंते, स्मृती नेहमी चित्तातूनच उत्पन्न होते की दुसर्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते? ''

''महाराज, चित्तातून ( मनातून ) ही उत्पन्न होते आणि दुसर्या बाहेरील वस्तूपासून देखील उत्पन्न होते. ''

''भंते, परंतु सर्वच स्मृत्या चित्तातून उत्पन्न होतात, दुसर्या बाह्य वस्तूपासून नव्हे. ''

''महाराज, जर बाह्य गोष्टीमुळे स्मृत्यांचा उगम झाला नसता तर शिल्पकला ही दुसर्या कडून शिकण्याची, अभ्यास करण्याची अवश्यकता मुळीच राहिली नसती आणि गुरुसुध्दा निरर्थक ठरतील. परंतु अशी स्थिती नाही.''

''छान भंते, फार छान. ''

मिलिंद प्रश्न?!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, आपली माता मरण पावली असता रडून रडून ढासळलेले अश्रू आणि धर्म प्रेमाने ओघळणारे अश्रू यांपैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात. म्हणजे कोणते योग्य आणि कोणते अयोग्य मानावे?"

''महाराज, पहिल्या प्रकारचे अश्रू राग, द्वेष व मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलीन आहेत, तर दुसर्या प्रकारचे अश्रू निर्मळ व थंड आहेत. कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र आहे. महाराज, थंड व निर्मळ अश्रू उपकारक व योग्य आहेत, तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी व वाईट आहेत. ''

''भंते, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. ''

राजा म्हणाला, ''भंते, रागाने भरलेले व रागरहित चित्त यातील भेद कोणता? ''

''महाराज, यातील एक तृष्णेत बुडून गेला असतो, तर दुसरा नसतो.''

''भंते, म्हणजे याचा अर्थ काय समजावा? ''

''महाराज, एक अत्यंत लोभी व स्वार्थी असतो तर दुसरा निर्लोभी व शांत असतो.''

''भंते, परंतु मी या प्रश्नाकडे पाहतो, तेव्हा असे दिसून येत, की रागयुक्त असो की रागरहित, हे दोघेही खाण्याकरिता चांगल्याच पक्वान्नाची इच्छा धरतात, वाईट पक्वान्नाची तर कोणी इच्छा धरीत नाहीत.''

''महाराज, हे जरी खरे असले तरी, रागयुक्त व्यक्ति उत्तम भोजनाचा आस्वादही घेतात आणि त्यात रागही व्यक्त करतात. परंतु रागरहित व्यक्ति आस्वाद घेतात खरे पण त्यात राग मुळीच मानत नाही.''

''भंते, आपण फारच छान समजावून सांगितले. ''

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्दाच्या शरीरावर महापुरुषांच्या ३२ सुलक्षणी खुणा होत्या, ८० उपलक्षणे होती. त्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्यांच्यासभोवार एक व्याम आकाराचा तेजस्वी प्रकाश फाकत होता. असे जे सांगितले जाते, ते खरे आहे काय? ''

''होय महाराज, तथागत खरोखरच तसे होते.''

''भंते, त्यांचे माता व पिता देखील तसेच होते काय? ''

''नाही महाराज, ते तसे नव्हते.''

''भंते, मुल हे एकतर आईच्या वंशावर जाते किंवा वडिलांच्या वंशावर जाते आणि भगवान बुध्द या दोहोंपैकी कोणाही सारखे नाहीत. तेव्हा ते तसे होऊच शकत नाही़. ''

''महाराज, आपण कमळाचे फूल पाहिले आहे काय? ''

''होय भंते, पाहिले आहे. ''

''ते कोठे उत्पन्न होते? ''

( पहा दीर्घ निकाय लक्षण सूत्र ) ''चिखलात ते उत्पन्न होते आणि पाण्यात त्याची वाढ होऊन पूर्णावस्थेस पोहोचते.

''महाराज, मग कमळाचे फूल, रंगात, गंधात किंवा चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते काय? ''

''मुळीच नाही़ भंते! ''

''तर काय पाण्याशी त्याचे साम्य आहे? ''

''नाही भंते! ''

''महाराज, याप्रमाणेच त्यांचे माता व पिता तसे नसले, तरी भगवान बुध्द सुलक्षणाने संपन्न होते.''

''भंते, उत्तम प्रकारे स्पष्टीकरण करुन सांगितले. ''

* भगवान बुध्द व ब्रह्म....

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्द ब्रह्मचारी होते काय? ''

''होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. ''

''भंते, तर मग ते ब्रह्माचे आनुयायी होते. असेच म्हटले पाहिजे? ''

''महाराज, आपल्याजवळ एखादा हत्ती आहे काय? ''

''होय भंते, मला फार प्रिय असलेला हत्ती आहे. ''

''महाराज, तो हत्ती कधी तरी क्रौंच नाद करतो काय? ''

''होय भंते, कधी कधी, क्रौंच नाद करतो. ''

''महाराज, तर मग तो क्रौंच पक्षाचा आनुयायी झाला असला पाहिजे? ''

''नाही भंते, हे कसे शक्‍य आहे? ''

''महाराज, आता तुम्हीच सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुध्दी आहे की नाही?"

''होय भंते, बुध्दी आहे. ''

''महाराज, तर मग ब्रह्मा भगवान बुध्दाचा आनुयायी झाला, असेच म्हणावे लागेल. ''

''भंते, हे तर आपण खूपच सांगितले. ''

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, बौध्द भिक्खूंना आपले शरीर प्रिय असते की नाही? ''

भंते नागसेन म्हणाले, ''नाही़ महाराज, ते शरीरावर प्रेम करीत नाही़. ''

''भंते, तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता? शरीराप्रती इतका आदर का बाळगता? ''

''महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एखादा तीर लागतो की नाही?''

''होय भंते, लागतो. ''

''महाराज, अशावेळी आपण ज्या जखमेस तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही? ''

''होय भंते, आम्ही तसे निश्चितच करतो.''

''महाराज, तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय, जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता?

''भंते, त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसतेच परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मांस वाढावे म्हणून हे उपचार करावे लागतात. ''

महाराज, याप्रमाणेच आम्हा भिक्खूंना आमचे शरीर प्रिय नसते परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता शुद्ध ब्रह्मचर्येचे पालन करण्यासाठी एवढी त्याची काळजी वहावी लागते. भगवंतांनी तर शरीरास एका फोड्याची उपमा दिली की- ''ओल्या त्वचेने झाकलेले हे शरीर म्हणजे एक नऊ मुखांचा फोडा आहे, त्यातून सदैव दुर्गंधाचाच उत्सर्ग होत असतो.''

''भंते, आपण उत्तमरितीने पटवून दिले. ''

* भगवान बुध्द सर्वज्ञ होते....

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्द सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते काय? ''

''होय महाराज, ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टी वाले होते.''

''भंते, असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनूसार निरनिराळ्या प्रसंगी विनय तयार करण्याची रीत कशी काय अवलंबिली? एकाच वेळी सर्व विनय का बरे केले नाहीत? ''

''महाराज, सर्व प्रकारच्या औषधांची माहिती असलेला आपला कोणी वैद्य आहे काय? ''

''होय भंते, आहे. ''

''महाराज, तो आजारी पडल्यानंतरच औषध देतो की आजारापूर्वीही देत राहतो? ''

''भंते, आजारी पडल्यानंतर कोणाला औषध देतो, त्यापूर्वी नाही़. ''

''महाराज, याप्रमाणे भगवान बुध्द जरी सर्वज्ञ आणि सर्वद्रष्टे होते तरी देखील योग्यवेळ आल्याशिवाय त्यांनी कधीही आपल्या श्रावकासाठी कोणताही विनय तयार केला नाही़, अगर त्यांचा उपदेशही ते देत नव्हते. प्रसंग उद्भवल्यावरच भगवंतांनी असे नियम तयार केले आणि ते आजिवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला.''

''भंते, आपण बरोबर सांगितले. ''

Sunday, February 21, 2016

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, सर्व मनुष्य सारखेच का होत नाहीत? कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी, कोणी आजारी आहेत तर कोणी एकदम आरोग्यसंपन्न; कोणी कुरुप तर कोणी फारच सुंदर; कोणी एकदम प्रभावहीन तर कोणी अत्यंत प्रभावशाली; कोणी दरिद्री तर कोणी खूप श्रीमंत; कोणी हलक्या कुळात जन्मले तर कोणी उच्च कुळात जन्मलेले; कोणी मूर्ख तर कोणी अतिशय हुशार, असे का व्हावे? ''

स्थविर नागसेन म्हणाले, ''सर्वच वनस्पती एकसारख्या नाहीत, असे का? काही आंबट, काही खारट, काही तिखट, काही कडू, काही तुरट आणि काही तर अत्यंत गोड असतात, असे का बरे व्हावे?

''भंते, बीजात भिन्नत्व असल्यामुळेच या वनस्पतीच्या चवीत भिन्नत्व दिसून येत असले पाहिजे, असा माझा अंदाज आहे.''

''महाराज, बरोबर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्राचे आपापले कर्म वेगवेगळे असल्याकारणानेच ते सर्व एकसारखे नाहीत. कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी...  असे पहाण्यात येतात. महाराज, खुद्द भगवान बुध्दानेच म्हटले आहे की, हे मानव जीव सर्वच आपल्या कर्माचीच फळे भोगत असतात. सर्व जीव आपल्या कर्मफळाचे स्वतःच मालक आहेत. आपल्या कर्मफळानूसारच भिन्न भिन्न योनीत जन्मास येतात. कर्म हेच खरे नातेवाईक व कर्म हेच अश्रयस्थान आहेत. कर्मामुळे मनुष्य मात्राची अशी विभागणी झाली आहे.''

''भंते, आपण बरोबर सांगितले. ''

* मनुष्याने सदैव प्रयत्नशील असावे...
राजा मिलिंद म्हाणाला, ''भंते, आपण म्हणाले होते की, सद्यस्थितीत दु:खाचा नाश करण्यासाठी आणि भविष्यात येणार्या दु:खास पायबंद घालण्यासाठी म्हणून आम्ही प्रव्रजीत ( संन्यासी ) होतो.''

''होय महाराज, असे सांगितले आहे. ''

''भंते, परंतु आपण प्रव्रजीत होऊन भिक्खू बवता ते पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे की, याजन्मी त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी? ''

''स्थविर म्हणाले, ''महाराज, जे काही पूर्वजन्मीचे कर्मफळ लाभावयाचे ते तर आपोआपच लाभणार, परंतु जे काही दु:ख निवारणाचा दृष्टीने करणे शिल्लक आहे, त्यासाठी येथून पुढेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

''कृपाकरुन उपमा देऊन स्पष्ट करावे. ''

''महाराज, तहान लागल्यानंतर आपण एखादी विहिर किंवा तळे खोदावयास सुरु करता की काय? जेणे करुन पाणी प्यावयास मिळावे.''
''नाही भंते! ''
''महाराज, याप्रमाणेच पूर्वजन्मीचे कर्मफळ तर आपोआपच लाभणार परंतु जे काही दु:ख निवारण्याच्या दृष्टीने करने शिल्लक आहे, त्यासाठी येथून पुढेच करावे लागणार आहे.''

''कृपाकरुन पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगावे.''

''महाराज, आपल्या विरुद्ध युध्द सुरु झाल्यानंतर आपण, खंदक खोदणे, तटबंदी उभारणे, दीपस्तंभ उभारणे, बुरुज बांधणे, सैन्यासाठी धान्याची जमवाजमव करणे, हत्ती-घोड्यांना शिकवण देणे, रथ, धनुष्य, तलवार तयार करणे इत्यादी कामे करण्यास आपण सुरुवात करता की काय? ''

''नाही भंते! ''

''महाराज, याप्रमाणेच पूर्वजन्मीची फळे तर आपोआपच मिळतात. परंतु जे काही शिल्लक त्याच्या पूर्तीसाठी खरे प्रयत्न याच जन्मात करावयाचे असतात. ''

भगवान बुध्दाने देखील म्हटले आहे की, 'प्रसंग पाहून बुध्दीवान माणसाने असेच कार्य करावे की जेणेकरून त्यामुळे आपले हित होईल. जो मुर्ख गाडीवान विस्तीर्ण व सरळ मार्ग सोडून आडमार्गाने, खाच खळग्याच्या मार्गाने आपली गाडी हाकून त्यामुळे गाडीचा कणा मोडून तो संकटात सापडतो, तद्वत हे मूर्ख व दुबळ्या मनाचे लोक सध्दर्माकडे दुर्लक्ष करतात आणि अधर्माच्या नादी लागून मृत्युच्या जबड्यात जाऊन पडल्यावर आपला नाश पाहून पराभव पत्करुन अंत:करणात दु:खी होतात. ह्याची जाणीव ठेवून शहाण्या माणसाने दृढतापूर्वक कार्यसिध्दीकरीता सतत प्रयत्नशील रहावे.

Sunday, February 14, 2016

मिलिंद प्रश्न!

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, जेथे मनो-विज्ञान उद्भवते तेथे वेदना, सुध्दा उद्भवते काय? ''

''होय महाराज, जेथे मनो-विज्ञान उद्भवते तेथे स्पर्श, वेदना, संज्ञा, चेतना, वितर्क, विचार देखील असतात. म्हणजे स्पर्शामुळे होणारे सर्वच धर्म असतात.

क) स्पर्शाचे लक्षण...
''भंते, स्पर्शाचे लक्षण कोणते? ''
महाराज, 'शिवणे' हे स्पर्शाचे लक्षण आहे.
भंते, उदाहरण देऊन समजावून सांगावे.''
''महाराज, दोन मेंढे टक्कर घेतात. त्यापैकी एक मेंढ्यास 'चक्षू' व दुसर्यास 'रुप' असे समजूया आणि त्यांच्यात झालेल्या टकरीस स्पर्श समजावे.
"भंते, पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगावे."
"महाराज, कोणी मनुष्य टाळी वाजवितो. तेव्हा त्याच्या एका हातास चक्षू तर दुसर्या हातास रुप समजावे. दोन्ही हाताच्या मिलापास स्पर्श समजावा."

"भंते, कृपा करुन पुन्हा उदाहरण द्यावे."
"महाराज, कोणी एक मनुष्य झांज वाजवित आहे. त्यापैकी एका झांजेला चक्षू तर दुसर्या झांजेला रुप समजावे आणि त्या दोन्ही झांजांच्या परस्परांच्या टकरावास स्पर्श समजावा."

"भंते, तुमचे कथन अगदी योग्य आहे."

ख) वेदनेचे लक्षण ...
"भंते, नागसेन, वेदनेचे लक्षण काय बरे?"
"महाराज, अनुभव करणे, हेच वेदनेचे लक्षण आहे."
"भंते, कृपा करुन उदाहरण देऊन समजावून सांगा."
"महाराज, एखाद्याने राजाची सेवा केली असता त्यावर खुश होऊन राजाने त्याला एखादे पद दिले. हे पद मिळाल्यामुळे तो आता ऐशोरामात आपले जीवन घालवित आहे. तेव्हा त्या मनुष्याच्या मनात आले की, प्रथम मी राजाची सेवा केल्यामुळेच राजाने मला एवढे इनाम दिले. आणि मी एवढे ऐशोरामाचे जीवन भोगत आहे.''
''त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याने आपल्या पुण्यकर्माच्या प्रतापाने मृत्यूनंतर सद्गतीचा लाभ करुन घेतला आहे. तो तेथे पाचही कामगुणांचा उत्तम रितीने उपभोग घेत आहे. तेव्हा त्याच्या मनात असा विचार आला की, मी पुर्वी पुण्य कार्य केले म्हणूनच या दिव्य अशा पाचही कामगुणांचा उपभोग घेत आहे, असा तो अनुभव करतो. ''
''महाराज, याप्रमाणे 'अनुभव करणे' हे वेदनेचे लक्षण आहे.''

''भंते, आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. ''

ग) संज्ञेचे लक्षण...

''भंते, संज्ञेचे लक्षण कोणते, ते सांगाल का? ''
महाराज, 'ओळखणे ' हे संज्ञेचे लक्षण आहे., जसे ''हे निळे, हे पिवळे, हे लाल, हे शुभ्र आणि हे केसरी रंगाचे आहे. असे 'ओळखणे' संज्ञेचे लक्षण आहे''

''भंते, उदाहरण देऊन समजावून सांगा. ''
''महाराज, एखाद्या राजाचा खजिनदार कोठारात जाऊन निळ्या, पिवळ्या, लाल, शुभ्र व केसरी अशा रंगाच्या राजोपयोगी ज्या ज्या वस्तू त्याच्या नजरेस पडतील त्या ओळखतो व ह्यावर राजमान्य चिन्ह आहे अशी त्याला जाणीव होते. म्हणून त्यास राजरंगाची संज्ञा मिळत असते, याप्रमाणे 'ओळखणे' हे संज्ञेचे लक्षण आहे महाराज!''

''भंते, आपण अगदी बरोबर सांगितले.''

घ) चेतनेचे लक्षण...
''भंते नागसेन, चेतनेचे काय लक्षण आहे? ''
''महाराज, समजने व तयारी करणे ही चेतनेची लक्षण होत.''

''भंते, एखादे उदाहरण देऊन सांगावे.''
महाराज, एखाद्याने विष तयार करुन स्वतःच प्याला व दुसर्यास देखील पाजले. त्यामुळे स्वत:ही भोगतो व दुसर्यासही दु:ख भोगावयास भाग पाडतो. याप्रमाणे स्वत: असले वाईट कृत्य करतो व दुसर्यांना देखील वाईट कृत्य करण्यासाठी चेतना देतो. त्यामुळे स्वत: मृत्यूनंतर नरकात ( दुर्गतीला ) जातो व दुसरा देखील त्याच्या शिकवणूकीमुळे दष्कृत्य केल्यामुळे मृत्यूनंतर नरकात ( दुर्गतीला ) जातो.''

तसेच महाराज, ''कोणी मनुष्य, तूप, लोणी, तेल, मध व साखरयुक्त पेय पदार्थ तयार करुन स्वत: पितो व दुसर्यांना देखील पिण्यासाठी चेतना देतो. त्यामुळे स्वत: सुखी होतो पण दुसर्यासही सुखी बनवतो. महाराज, याप्रमाणे पुण्य कृत्य करुन स्वत: मृत्यूनंतर सुगती प्राप्‍त करतो व दुसर्यास देखील त्याच्यापासून चेतना होऊन पुण्य करुन सुगती पद गाठतो. ''

याप्रमाणे हे महाराज, पाप कृत्यामुळे दर्गती व पुण्य कृत्यामुळे सुगती लाभते, असे 'समजने' त्यासाठी 'तयारी करणे' हीच चेतनेची लक्षणे हेत.''
''भंते, आपण उत्तमरितीने समजावून सांगितले. ''

ड) विज्ञानाची ओळख...
''भंते, विज्ञानाचे लक्षण कोणते ते सांगाल काय? ''
''महाराज, 'जाणून घेणे' विज्ञानाचे लक्षण आहे. ''
भंते, कृपा करुन समजावून सांगावे.''
''महाराज, कोणी शहराचा रक्षक अशा चौकात बसतो की, चारही दिशांनी येणार्या जाणार्या लोकांवर तो नजर ठेवू शकेल, जी गोष्ट चहूबाजूंनी देखरेख करणार्याची तीच गोष्ट महाराज, डोळ्यांनी पाहण्याची, विज्ञानाने जाणून घेण्याची, कानाने ऐकण्याची व ते विज्ञानाने जाणून घेण्याची, नाकाने सुगंध घेण्याची व ते विज्ञानाने जाणून घेण्याची, जिभेने आस्वाद घेण्याची व ते विज्ञानाने जाणून घेण्याची,  शरीराने स्पर्श करण्याची व तेसुद्धा विज्ञानाने जाणून घेण्याची, जे धर्म मनाने अनुभव करतो ते देखील विज्ञानाने जाणून घेण्याची आहे. याप्रमाणे हे महाराज, 'जाणून घेणे' हे विज्ञानाचे लक्षण आहे.''

च) वितर्काचे लक्षण...
''भंते, नागसेन, वितर्काचे लक्षण कोणते? ''
''महाराज, हेतु सिद्धी हे वितर्काचे लक्षण आहे. ''
''भंते,  कृपा करुन उदाहरणाने सांगावे.''
''महाराज, एखाद्या रंधाराने लाकडावर चांगले नक्षीकाम केले, त्यावर जोडपट्टी देण्यासाठी वितर्क करतो. कारण कौशल्यपूर्वक जोडपट्टी देण्याचा त्याचा निर्धार असतो म्हणून 'हेतुसिध्दी' हे वितर्काचे लक्षण आहे.''
''भंते, आपण संयुक्तिक असेच कथन केले आहे.''

क) विचाराचे लक्षण....
''भंते, नागसेन, विचाराचे लक्षण कोणते? ''
''महाराज, 'आनुमार्जन हे विचाराचे लक्षण होय.''
''भंते, कृपाकरुन उदाहरण देवून स्पष्ट करावे.''
महाराज,  काशाच्या भांड्यात ठोका दिला असता आवाज बाहेर निघतो. येथे जसे ठोका देणे आहे, तसा वितर्क आणि 'आवाज निघणे' आहे तसा विचार समजावा.''

मिलिंद प्रश्न !

राजा मिलिंद म्हणाला, "भंते, जेथे जेथे चक्षू-विज्ञान (दृष्टि) उत्पन्न होते, तेथे तेथे मनो-विज्ञान (विचार) याचाही आविष्कार होतो काय?"

"होय महाराज, मनो-विज्ञानाचा तोच गुणधर्म आहे."

"भंते, प्रथम कोण उत्पन्न होतो, चक्षू-विज्ञान की मनो-विज्ञान?"

"महाराज, प्रथम चक्षू-विज्ञान, नंतर मनो-विज्ञान उत्पन्न होतो."

"भंते, म्हणजे चक्षू-विज्ञानास, हुकूमत सोडते की, जेथे जेथे मी असेन, तेथे तेथे तू उभा रहा किंवा मनो-विज्ञान चक्षू विज्ञानास म्हणतो की, जेथे जेथे तू राहशील तेथे तेथे मी सुध्दा राहीन, असा याचा अर्थ समजावा की काय?"

"नाही महाराजा, त्यांच्यात असे आपसातील कोणतेही देण्याघेण्याचे व्यवहार नाहीत.''

''भंते, मग कोणत्या गोष्टीवरून जेथे जेथे चक्षू-विज्ञान प्रादुर्भूत होतो तेथे तेथे मनोविज्ञानाचा सुध्दा प्रादुर्भाव होतो?"

"महाराज, असे घडण्याचे चार कारणे आहेत- १) त्या परस्परात उतार आहे, २) त्याच्यात एकच सामाजिक दरवाजा आहे, ३) त्याच्यात एक संबंध आहे आणि ४) त्यांची संगत आहे."

"भंते, परस्परात उतार असल्यामुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान उद्भव होते तेथे तेथे मनो-विज्ञान देखील उद्भवते. हे कसे? कृपा करुन उदाहरण देऊन सांगावे."

"महाराज, पाऊस पडला असता ते पाणी कुठे जाईल?"
"भंते जिकडे जमीनीचा उतार असेल, तिकडेच ते पाणी वाहून जाईल."
"आणि पुन्हा दुसर्या दिवशी पाऊस पडला तर ते पाणी कोठे जाईल?"
"भंते, त्याच बाजूने"
"महाराज, म्हणजे प्रथम वाहून गेलेले दुसर्या पाण्यास असा हुकूम सोडतो काय की, जिकडे मी वाहून जाईन तिकडे तू सुध्दा वाहात ये की, दुसर्या पाण्याने पहिल्या पाण्यास हुकूम केला की, जिकडे तू वाहू लागशील तिकडेच मी सुध्दा वाहत येईन. ''

''नाही भंते, त्याच्या आपसात अशा कोणत्याही गोष्टी होत नाहीत. जमीन उतार असल्यामुळे केवळ दोन्ही प्रकारचे पाणी असे वाहू लागते.''

''महाराज, आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या परस्परात उताराचा संबंध असल्यामुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान उद्भवते, तेथे तेथे मनो-विज्ञान सुध्दा आविष्कृत होते."

"भंते, त्याचा सामाजिक दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान उद्भूत होते. तेथे तेथे मनो-विज्ञान सुध्दा उद्भवते हे कसे? कृपाकरुन उदाहरण देऊन समजावून सांगा."

"महराज, एखाद्या राजाच्या राज्य सरहद्दीवर असलेल्या शहराचे संरक्षण करण्याचे दृष्टीने त्या शहराभोवती एक मोठा किल्ला बांधलेला असून त्यास मजबूत असा एकच दरवाजा आहे. आता कोणत्या मनुष्याला शहराबाहेर पडावयाचे असल्यास कोठून जाईल? ''

''भंते, त्याच दरवाजातून बाहेर जाईल. ''
''यानंतर दुसरा मनुष्य बाहेर जाऊ इच्छित असेल तर तो कोठून जाईल?''
''भंते, त्याच दरवाजातून ''
''महाराज, येथे पहिला माणूस दुसर्यास हुकूम करतो काय की, ज्या दरवाजाने मी बाहेर निघेन त्याच दरवाजाने तू पण बाहेर निघावे किंवा दुसर्याने आज्ञापिले असते काय की, ज्या दरवाजाने तू बाहेर पडशील, त्याच दरवाजाने मी पण बाहेर निघेन."

"नाही भंते, त्याच्यात अशा कोणत्याही गोष्टी होत नसतात. परंतु शहराबाहेर जाण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्यामुळे दोघेही एकाच मार्गाने बाहेर पडतात.''

''महाराज, चक्षू-विज्ञान या मनो-विज्ञान दोघांनाही एकच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनो-विज्ञानाचा सुध्दा आविष्कार होतो."

"भंते, सवय असल्यामुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनो-विज्ञान देखील आविष्कृत होते. हे कसे? कृपाकरुन उदाहरण देऊन सांगावे."
"महाराज, कोण्या एका गावाला जाण्याकरीता एकच बैलगाडीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने एक बैलगाडी गेली असल्यास दुसरी बैलगाडी कोणत्या मार्गाने जाईल? ''
''भंते, त्यामार्गाने पहिली बैलगाडी गेली असेल त्याच मार्गाने जाईल. ''
''महाराज, तर काय पहिल्या गाडीवानाने दुसर्या गाडीवानास आज्ञापिले होते की, या मार्गाने माझी बैलगाड़ी जाईल, त्याच मार्गाने तुझी बैलगाडी तू घेऊन ये किंवा दुसर्या गाडीवानाने पहिल्या गाडीवानास आज्ञापिले की, ज्या मार्गाने तुझी बैलगाडी त्याच मार्गाने मी सुध्दा माझी बैलगाडी आणेल?"

"नाही भंते, त्यांच्यात अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नसतात. बैलांना त्याच मार्गाने जाण्याची सवय असल्यामुळे ते एक दुसर्याचे अनुकरण करतात.''

''महाराज, या उदाहरणाप्रमाणेच केवळ सवयीमुळे जेथे जेथे चक्षू-विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनो-विज्ञानही उद्भवते."
"भंते, संगतीमुळे कसे काय जेथे जेथे चक्षू-विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञानही उद्भवते."
"याप्रमाणे दुसर्या इंद्रियांच्या विज्ञानासह मनो-विज्ञान उत्पन्न होते हे सांगणे न लगे."
"भंते, आपण उत्तमरीतीने पटवून दिले."

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...