राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्दाच्या शरीरावर महापुरुषांच्या ३२ सुलक्षणी खुणा होत्या, ८० उपलक्षणे होती. त्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्यांच्यासभोवार एक व्याम आकाराचा तेजस्वी प्रकाश फाकत होता. असे जे सांगितले जाते, ते खरे आहे काय? ''
''होय महाराज, तथागत खरोखरच तसे होते.''
''भंते, त्यांचे माता व पिता देखील तसेच होते काय? ''
''नाही महाराज, ते तसे नव्हते.''
''भंते, मुल हे एकतर आईच्या वंशावर जाते किंवा वडिलांच्या वंशावर जाते आणि भगवान बुध्द या दोहोंपैकी कोणाही सारखे नाहीत. तेव्हा ते तसे होऊच शकत नाही़. ''
''महाराज, आपण कमळाचे फूल पाहिले आहे काय? ''
''होय भंते, पाहिले आहे. ''
''ते कोठे उत्पन्न होते? ''
( पहा दीर्घ निकाय लक्षण सूत्र ) ''चिखलात ते उत्पन्न होते आणि पाण्यात त्याची वाढ होऊन पूर्णावस्थेस पोहोचते.
''महाराज, मग कमळाचे फूल, रंगात, गंधात किंवा चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते काय? ''
''मुळीच नाही़ भंते! ''
''तर काय पाण्याशी त्याचे साम्य आहे? ''
''नाही भंते! ''
''महाराज, याप्रमाणेच त्यांचे माता व पिता तसे नसले, तरी भगवान बुध्द सुलक्षणाने संपन्न होते.''
''भंते, उत्तम प्रकारे स्पष्टीकरण करुन सांगितले. ''
* भगवान बुध्द व ब्रह्म....
राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, भगवान बुध्द ब्रह्मचारी होते काय? ''
''होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. ''
''भंते, तर मग ते ब्रह्माचे आनुयायी होते. असेच म्हटले पाहिजे? ''
''महाराज, आपल्याजवळ एखादा हत्ती आहे काय? ''
''होय भंते, मला फार प्रिय असलेला हत्ती आहे. ''
''महाराज, तो हत्ती कधी तरी क्रौंच नाद करतो काय? ''
''होय भंते, कधी कधी, क्रौंच नाद करतो. ''
''महाराज, तर मग तो क्रौंच पक्षाचा आनुयायी झाला असला पाहिजे? ''
''नाही भंते, हे कसे शक्य आहे? ''
''महाराज, आता तुम्हीच सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुध्दी आहे की नाही?"
''होय भंते, बुध्दी आहे. ''
''महाराज, तर मग ब्रह्मा भगवान बुध्दाचा आनुयायी झाला, असेच म्हणावे लागेल. ''
''भंते, हे तर आपण खूपच सांगितले. ''
No comments:
Post a Comment