राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, सर्व मनुष्य सारखेच का होत नाहीत? कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी, कोणी आजारी आहेत तर कोणी एकदम आरोग्यसंपन्न; कोणी कुरुप तर कोणी फारच सुंदर; कोणी एकदम प्रभावहीन तर कोणी अत्यंत प्रभावशाली; कोणी दरिद्री तर कोणी खूप श्रीमंत; कोणी हलक्या कुळात जन्मले तर कोणी उच्च कुळात जन्मलेले; कोणी मूर्ख तर कोणी अतिशय हुशार, असे का व्हावे? ''
स्थविर नागसेन म्हणाले, ''सर्वच वनस्पती एकसारख्या नाहीत, असे का? काही आंबट, काही खारट, काही तिखट, काही कडू, काही तुरट आणि काही तर अत्यंत गोड असतात, असे का बरे व्हावे?
''भंते, बीजात भिन्नत्व असल्यामुळेच या वनस्पतीच्या चवीत भिन्नत्व दिसून येत असले पाहिजे, असा माझा अंदाज आहे.''
''महाराज, बरोबर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्राचे आपापले कर्म वेगवेगळे असल्याकारणानेच ते सर्व एकसारखे नाहीत. कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी... असे पहाण्यात येतात. महाराज, खुद्द भगवान बुध्दानेच म्हटले आहे की, हे मानव जीव सर्वच आपल्या कर्माचीच फळे भोगत असतात. सर्व जीव आपल्या कर्मफळाचे स्वतःच मालक आहेत. आपल्या कर्मफळानूसारच भिन्न भिन्न योनीत जन्मास येतात. कर्म हेच खरे नातेवाईक व कर्म हेच अश्रयस्थान आहेत. कर्मामुळे मनुष्य मात्राची अशी विभागणी झाली आहे.''
''भंते, आपण बरोबर सांगितले. ''
* मनुष्याने सदैव प्रयत्नशील असावे...
राजा मिलिंद म्हाणाला, ''भंते, आपण म्हणाले होते की, सद्यस्थितीत दु:खाचा नाश करण्यासाठी आणि भविष्यात येणार्या दु:खास पायबंद घालण्यासाठी म्हणून आम्ही प्रव्रजीत ( संन्यासी ) होतो.''
''होय महाराज, असे सांगितले आहे. ''
''भंते, परंतु आपण प्रव्रजीत होऊन भिक्खू बवता ते पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे की, याजन्मी त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी? ''
''स्थविर म्हणाले, ''महाराज, जे काही पूर्वजन्मीचे कर्मफळ लाभावयाचे ते तर आपोआपच लाभणार, परंतु जे काही दु:ख निवारणाचा दृष्टीने करणे शिल्लक आहे, त्यासाठी येथून पुढेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
''कृपाकरुन उपमा देऊन स्पष्ट करावे. ''
''महाराज, तहान लागल्यानंतर आपण एखादी विहिर किंवा तळे खोदावयास सुरु करता की काय? जेणे करुन पाणी प्यावयास मिळावे.''
''नाही भंते! ''
''महाराज, याप्रमाणेच पूर्वजन्मीचे कर्मफळ तर आपोआपच लाभणार परंतु जे काही दु:ख निवारण्याच्या दृष्टीने करने शिल्लक आहे, त्यासाठी येथून पुढेच करावे लागणार आहे.''
''कृपाकरुन पुन्हा उदाहरण देऊन समजावून सांगावे.''
''महाराज, आपल्या विरुद्ध युध्द सुरु झाल्यानंतर आपण, खंदक खोदणे, तटबंदी उभारणे, दीपस्तंभ उभारणे, बुरुज बांधणे, सैन्यासाठी धान्याची जमवाजमव करणे, हत्ती-घोड्यांना शिकवण देणे, रथ, धनुष्य, तलवार तयार करणे इत्यादी कामे करण्यास आपण सुरुवात करता की काय? ''
''नाही भंते! ''
''महाराज, याप्रमाणेच पूर्वजन्मीची फळे तर आपोआपच मिळतात. परंतु जे काही शिल्लक त्याच्या पूर्तीसाठी खरे प्रयत्न याच जन्मात करावयाचे असतात. ''
भगवान बुध्दाने देखील म्हटले आहे की, 'प्रसंग पाहून बुध्दीवान माणसाने असेच कार्य करावे की जेणेकरून त्यामुळे आपले हित होईल. जो मुर्ख गाडीवान विस्तीर्ण व सरळ मार्ग सोडून आडमार्गाने, खाच खळग्याच्या मार्गाने आपली गाडी हाकून त्यामुळे गाडीचा कणा मोडून तो संकटात सापडतो, तद्वत हे मूर्ख व दुबळ्या मनाचे लोक सध्दर्माकडे दुर्लक्ष करतात आणि अधर्माच्या नादी लागून मृत्युच्या जबड्यात जाऊन पडल्यावर आपला नाश पाहून पराभव पत्करुन अंत:करणात दु:खी होतात. ह्याची जाणीव ठेवून शहाण्या माणसाने दृढतापूर्वक कार्यसिध्दीकरीता सतत प्रयत्नशील रहावे.
No comments:
Post a Comment