Sunday, February 14, 2016

मिलिंद प्रश्न !

राजा मिलिंद म्हणाला, ''भंते, 'आत्मा' म्हणून जाणणारा असा कोणी आहे काय?''

''महाराज, हा जाणणारा कोण? ''

''भंते, ज्याप्रमाणे आम्ही येथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडकी मधून बाहेरचे दृश्य पाहू शकतो, त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रुपे पाहतो, कानाद्वारे शब्द ऐकतो, नाकाद्वारे सुगंधाचा उपभोग घेतो, जीभेद्वारा आस्वाद घेतो, कातडीद्वारे स्पर्शाचा उपयोग घेतो आणि मनाद्वारे अनुभव करतो, असा जाणणारा ज्ञाता तो आत्मा ."

स्थविर म्हणाले,'' महाराज, पाच दरवाजे कोणते ते मी सांगेन, तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका.''
''महाराज, आपण या राजवाड्यात बसून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृश्य पाहू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या शरीरात वास्तव्य करुन बसलेला जीव (आत्मा) डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा इत्यादी सर्व इंद्रियांद्वारे रुप पाहण्याची, शब्द ऐकण्याची, सुगंध घेण्याची, रसांचा आस्वाद घेण्याची, त्वचेने स्पर्श करण्याची म्हणजे डोळ्याने ऐकण्याची किंवा कानाने पाहण्याची एकूण कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकस्त करीत असला पाहिजे, एवढे सामर्थ्य तर त्या आत्म्यास असावेच.''

''नाही़ भंते नागसेन, असे कोणतेच सामर्थ्य त्यात नाही़. ''
''महाराज, यावरुन आपल्या प्रथम बोलण्याचा नंतरच्या बोलण्याशी व नंतरच्या बोलण्याचा प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य जुळत नाही़. '' महाराज, या सर्व खिडक्या उघडल्या असता येथे बसल्या बसल्याच बाहेरील सर्व दृष्य म्हणजे ती झाडे, ती घरे, ते महाल पाहू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळेरुपी खिडकी उघडली असता म्हणजे डोळे एकदम काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्याप्रकारे पाहू शकतो काय? म्हणजे कान, नाक, जीभ आणि त्वचारुपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे, सुगंध घेण्याचे, रसांचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्याप्रकारे करीत असला पाहिजे. कारण या राजवाड्याबाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपणाबाहेरील सर्व दृश्य अधिक स्पष्टपणे पाहतोच की नाही़? ''

''नाही भंते, जीव (आत्म्याकडून) हे होणे शक्‍य नाही. ''

''महाराज, तर मग आपल्या प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा पहिल्या कथनाशी तिळमात्र संदर्भ जुळत नाही़.'' महाराज, समजा आपला हा दिन्न नामक सेनापती बाहेर जाऊन दरवाज्यापाशी जर उभा राहिला तर याची जाणीव आपणास होणार नाही़ काय? ''

''होय भंते,  अवश्य जाणीव होईल. ''
''महाराज, ज्याप्रमाणे जीभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, अंबटपणा, तिखटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही़?''

''होय भंते, अवश्य होईल. ''
''तद्वतच त्या रसाची चव तोंडातून पोटात आत गेली, तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, अंबटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही? ''

''नाही भंते, या चवीची जाणीव त्यास मुळीच होणार नाही. ''
''महाराज, तर मग आपण प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही. '' महाराज, समजा एखाद्या माणसाने शंभर घागरी मध मागवून एका रांजणात भरुन ठेवला, यानंतर दुसर्या एका मनुष्याचे तोंड चांगले घट्ट बांधून त्यास त्या रांजणात सोडले, तर तो मनुष्य आपणास ज्या पदार्थाने भरलेल्या रांजणात सोडले त्या पदार्थाची चव गोड आहे की नाही, हे तो सांगू शकेल काय? ''

''नाही भंते, त्याची त्यास जाणीव होणार नाही. ''
''ते का बरे? ''
''कारण मध त्या माणसाच्या तोंडात गेलेच नाही तेव्हा त्यास जाणीव व्हावी ती कशी! ''

''महाराज, तर मग आपण प्रथम केलेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी व नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही. ''

''भंते, आपणासारखा वादपटू पंडिताशी वादविवाद करावयास मी असमर्थ आहे. तेव्हा यातील खरी बाब काय आहे ते आपणच कृपा करुन सांगावे.''

यावर स्थविर नागसेन म्हणाले, ''महाराज, चक्षू व रुप यांच्या संयोगाने चक्षू विज्ञान (दृष्टि) उत्पन्न होते. यानंतर स्पर्श, संवेदना, संज्ञा, चेतना आणि एकाग्रता (ठाम निश्चय) एका मागे एक उत्पन्न होतात. इतर नाक, कान, त्वचा इंद्रियासंबंधाने सुध्दा तसेच घडते. एक उद्भवले की, त्यामागोमाग दुसरे अशी कारण व परिणामांची साखळी चालू असते. यात ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहींच कारण नाही.

"भंते, आपण उत्तरे देण्यात अत्यंत पटाईत आहात? एवढा गुंतागुंतीचा प्रश्न पण उत्तम रीतीने समजावून सांगितला."

2 comments:

  1. Fine interpretation. Milind panho is a milestone book in Buddhist Literature. Dr Babasaheb Ambedkar recommended this book to know some basics of Buddhism.

    ReplyDelete
  2. Fine interpretation. Milind panho is a milestone book in Buddhist Literature. Dr Babasaheb Ambedkar recommended this book to know some basics of Buddhism.

    ReplyDelete

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...