शाक्यमुनि गौतम बुद्ध तसेच पुराणातील भगवान बुध्द एकच की वेगवेगळे? :
गौतम बुध्दाचा जन्मकाळ व दशावतारातील बुध्दाचा जन्मकाळ, गौतम बुध्दाची जन्मभूमी व वंश आणि पुराणातील बुध्दावताराची जन्मभूमी व वंश, गौतम बुध्दाची मते व दशावतारातील बुध्दाची अवतार-कृत्य यांच्यांत खरोखर कांही साम्य आहे की काय हे पाहिल्यानंतर या प्रश्नाचा आपोआप निकाल लागेल, असे मला वाटते.
'कृष्णावतार सरल्यावरि बौध्द होतो।
संप्राप्तकाळ कलिच्या खर वत्सरीं तो।।
आश्विन शुक्ल दशमी रविवार देखा।
तैं शुक्लयोग असतां घटि षड् विशाखा।।१।।
कवी वामण पंडित यांनी या श्लोकांत बुध्द हा विष्णुचाच अवतार असे सांगुन तो अवतार केव्हा झाला त्याविषयीचा काळही दिला आहे, तो हिंदुपुराणांच्या आधाराने दिलेला आहे. हा जन्मकाळ जैनग्रंथात दिलेलेल्या बुध्दकाळाशी जुळतो.
'द्वे ऋषीनंदसंखायां गतायां तद्दिने शुभे।
खर-वर्ष दशम्यां च शुक्ले मासे तथा अश्विने।।
...योगवित् परमो जातो महाख्यातो हि बुध्दराट्।।
कित्येक बौध्द ग्रंथकार गौतम बुध्दाचा जन्म वैशाख शु.१५ ला झाला असे समजतात, आणि कित्येक म्हणतात की प्रत्येक्ष जन्म जरी अश्वीन महिण्यात झाला असला, तरी त्यांचा गर्भसंचार वैशाख शुध्द १५ हाच असल्यामुळे व बौध्द ग्रंथकार बुध्दत्वप्राप्तीला (ज्ञान-प्राप्तिला) त्यांच्या जन्मकाळापेक्षा फार अधिक महत्त्व देत असल्यामुळे, गौतमाचा बुध्दत्व-प्राप्तिचा जो दिवस तोच त्यांचा खरा जन्मदिवस असे मानतात. सारांश, गौतम बुध्दाच्या जन्मकाळापासून या प्रश्नाचा समाधानकारक निकाल जरा लागला नाही तरी बुध्दावताराशी गौतम बुध्दाचे जन्मकाळापुरते साम्य दिसते.
आता बुध्दाची जन्मभूमी व वंश यांचा विचार करु. श्रीमद्भागवतात 'बुध्दोनामां~जनसुत: कीकटेषु भविष्यति' असे म्हटले आहे. (प्रथम स्कंध, अध्याय ४, श्लोक २४) म्हणजे पुराणकारांच्या मते बुध्दावतार कीकटदेशांत अंजनाच्या पोटी झाला. भागवतावरील टीकाकार श्रीधरस्वामी 'कीकटेषु' म्हणजे 'मध्ये गया प्रदेशे' असे स्पष्ट सांगतात. बौध्दग्रंथकाराच्या मते गौतम बुध्दाचा जन्म नेपाळ प्रदेशात लुंबिनी येथे झाला, तथापि गौतमाला बुध्दत्व प्राप्त झाले ते गयेजवळ... म्हणजे शाक्य गौतम या दृष्टीने त्यांचा स्वाभाविक जन्म लुंबिनी येथे, आणि बुध्द या दृष्टीने लौकिक जन्म गया येथे झाला. लुंबिनी येथे जन्मलेल्या गौतमाचाच पुढे ३३ व्या वर्षी गया येथे बुध्दत्व प्राप्तिमुळे बुध्द झाला. त्याचप्रमाणे अवतारबुध्दाचा जन्म अंजनाच्या पोटी झाला असे पुराणग्रंथात म्हटले आहे. बौध्दग्रंथकाराच्या मते गौतमाची आई मायादेवी ही अंजनाची मुलगी म्हणुन तिला अंजना म्हणत असत. (पहा महावंश नामक सुप्रसिद्ध ग्रंथ) तेव्हा अंजन हे गौतमाच्या आजाचे नाव होते, आणि आजाचे नाव नातवाला ठेवण्याची चाल हल्लीप्रमाणे प्राचीन काळीही होती. यावरुन पुराणातील बुध्द अवतार व बौध्दधर्म प्रवर्तक गौतम हे एक असावेत असे म्हणण्यास पुष्टि मिळते.
आता तिसरे प्रमाण मतांचे साम्य, हे कितपत जुळते हे पाहू. बुध्दावताराचे कृत्य पुराणांतरी जे वर्णिले आहे, ते इतर अवतारकृत्यांवरुन अगदी निराळ्याप्रकारचे आहे. इतर अवतार हे पृथ्वीवरील पापाचा भार हलका करुन गोब्राह्मणांना छळणार्या दुष्ट राक्षसांचा उच्छेद करण्यासाठी झाले. परंतु बुध्दावतारासंबंधाने लिहिताना श्रीमद्भागवतकार लिहितात की, बुध्दावतार हा देवांच्या शत्रूंना मोह पाडण्यासाठी झाला. 'तत: कलौ संप्रयुत्ते संमोहाय सुरद्विषाम्। बुध्दो नामां~जनसुत: कीकटेषु भविष्यति' 'आर्यविद्यासुधारक' नामक ग्रंथात बुध्दावतारासंबंधाने म्हटले आहे ----
नीचानामसता विमोहजननं श्रोताध्वनिंदामीषात्।
भूताहिंसनमुख्यधर्ममतनोत्सर्वज्ञ एष प्रभु:।।
म्हणजे नीच व असज्जन यांच्या बुध्दीस मोह (भ्रांति) उत्पन्न करण्यासाठी श्रृतिमार्गाच्या निंदामिषाने याने (बुध्दावताराने) मुख्यत्वे करुन अहिंसाधर्माचा प्रसार केला. विष्णुपुराणात (तृतीय अंश, १७/१८ अध्याय) बुध्दावताराला 'मायामोह' असे नाव दिले आहे, आणि त्याने विष्णुच्या शरीरापासून निर्माण झाल्यामुळे नंतर नर्मदेच्या तीरी जाऊन तेथे तपश्चर्या करीत असलेल्या दैत्यांना संदेहजनक वाक्यानी श्रुतुक्तधर्मापासून पराग्मुख करुन अर्हत धर्माचा उपदेश केला आणि तुम्हाला निर्वाण पाहिजे तर, पशुयज्ञाचा त्याग करा, आणि हे जग विज्ञानमय करुन सोडा, या जगाला कोणाचा आधार नाही हे निश्चये करुन जाणा, वगैरे सांगितले, अशा प्रकारे बुध्दावताराचे कृत्य वर्णिले आहे.
वरील सर्व उल्लेखांचा, विशेषत: विष्णुपुराणात सांगितलेल्या दैत्यांना केलेल्या उपदेशात 'अर्हत' 'निर्वाण' 'विज्ञान' आणि जगाचा कोणी आधार किंवा नियंता नसने इ. गोष्टींचा उल्लेख व त्यांची गौतम बुध्दाच्या मताशी तुलना करुन पाहिले तर, बुध्दावतार म्हणजे गौतम बुध्दच की अन्य कोणी याविषयी संदेह राहण्याचे वस्तुतः काही कारण दिसत नाही.
यावरुन ऐतिहासिक गौतम बुद्ध व अवतारधारी पुराणातील बुध्द दोन्ही एकच आहेत, हे सिध्द होते. पण येथे हे अवश्य सांगितले पाहिजे की, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने स्वत:ला son of god, मुहम्मद पैगम्बराने स्वत:ला देवाचा दूत, कृष्णाने स्वत:ला देवाचा देव म्हटले त्याप्रमाणे गौतम बुध्दाने स्वत:ला विष्णूचा अवतार किंवा देवाचा अंश असे कुठेही म्हटलेले नाही.
No comments:
Post a Comment