Monday, November 25, 2019

बौध्द पर्व

बौध्दधर्माबद्दल गैरसमज :

कित्येक असे म्हणतात की बौध्दधर्म हा धर्मच नव्हे, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. बौध्दधर्माला 'धर्म' म्हणावे की नुसते 'तत्त्वज्ञान' म्हणावे हा प्रश्न मुळ पाश्चात्य पंडितानी उपस्थित केला व आमच्यातल्या जुण्या पिढीतील विद्वानांनी त्यांच्या ग्रन्थांवरच सगळी भिस्त ठेवून त्यांच्या मताचा अनुवाद केला. वस्तुतः बौध्दधर्म जितका तत्त्वज्ञानमय आहे, तितकाच तो धर्म या संज्ञेलाही पात्र आहे. किंबहुना धर्म, नीति आणि तत्त्वज्ञान ही तिन्ही त्याच्या ठिकाणी एकवटलेली आहेत असे म्हणने अधिक योग्य होईल. या विश्वाचे स्वरुप व त्याला चलन देणार्या शक्ति यांचे ज्ञान बौध्दधर्म करुन देतो; मनुष्याला त्याच्या अंतरात्म्याचे खरे स्वरुप व्यक्त करुन दाखवितो; त्याच्या उन्नतीची पराकाष्ठा कोणती आहे ती सांगतो; मनुष्याच्या अंत:करणातल्या गूढ नैतिक वृत्तिंवर प्रकाश पाडतो, व त्यांना जागृत करुन सन्मार्गाकडे प्रवृत्त करतो; मनुष्याचे 'दैव' म्हणतात ते त्याच्याच स्वत:च्या हातात असते, हि गोष्ट त्याच्या मनावर बिंबवून स्वत:च्या प्रयत्नाच्या हिम्मतीवर मनुष्याच्या अक्षय्य शांततामुख-चिरकालीन निर्वाण-पद प्राप्त करुन घेता येते, हेही तो धर्म सांगतो. सारांश, विश्वाचे सत्य स्वरुप, त्याला हालविणार्या शक्ति, त्यात वागणारांचे परस्परांशी सम्बन्ध, उत्तम गतीचा मार्ग, त्या मार्गाने जाणारे साधन व अंतिम साध्य, इतक्या सगळ्या गोष्टी दाखवणार्या बौध्द धर्माला जर 'धर्म' म्हणावयाचे नाही तर मग म्हणावयाचे तरी कोणाला?

'धर्म' शब्दाचा सामान्यत: जो अर्थ लोक घेतात, तो याहून किंचित निराळा असल्यामुळे समजूतीचा घोटाळा झालेला आहे. आपल्या ज्ञानेन्द्रियाच्या अकलनशक्तिच्या मर्यादेच्या बाहेर अज्ञेय असे जे काही आहे, त्याची प्राप्ति करुन घेण्याची हाव आमच्या धर्मकल्पनेच्या मुळाशी बहुधा असते. तेव्हा ईश्वराविषीच्या आपल्या कल्पना, त्याविषयीचे भय, अलौकिक चमत्कार, ईश्वरी कृपा इ. गोष्टी ज्यात नाहीत, त्याला धर्म ही संज्ञा देण्यास आमचे मन कचरावे हे साहजिक आहे. बौध्दधर्माचा पायाच मुळी निराळा आहे. तो अज्ञेयावरील श्रध्देसारखा संशयीत गोष्टींवर बसविलेला नाही; तर प्रत्येक्ष प्रमाणावर दु:खाचे अस्तित्व या जगात आहे; तोवर शाश्वत शांती प्राप्त होणार नाही या गोष्टींवर बसविलेला आहे. त्यांत संदिग्धता, अंधश्रध्दा किंवा गूढ मुळीच नाही. तथापि मनुष्याच्या जीविताचा सद्विनियोग कसा करता येईल, हे बौध्दधर्माने जितके उत्कृष्ट प्रकारे दाखवले आहे, तितके अन्यत्र क्वचितच दाखविलेले असेल. बौध्द धर्माची 'धर्म' या दृष्टीने महती आहे ती याच गोष्टीत आहे.

बौध्दधर्मात धर्मतत्त्वे तर समाविष्टि आहेतच पण त्यांत नीतितत्वांचाही प्रकर्ष झालेला दिसतो. अंधश्रध्दा ठेवण्यास तो धर्म कधी सांगत नाही. स्वत: विचार करा, प्रतीती पहा, खात्री करुन घ्या, आणि मग खरे माना असे तो सांगतो. अज्ञेय अशा ईश्वराने ही गोष्ट सांगितलेली आहे, आणि म्हणून ती खरी मानली पाहिजे अशा तत्त्वावर त्याच्या इमारतीची उभारणी झालेली नाही. तर जग व माणवी जिवित यांची अंगेउपांगे काय आहेत त्याची मीमांसा करुन, मनुष्य व मनुष्ये व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी यांच्यांतला संबंध ठरवून, त्या स्वाभाविक संबंधाच्या पायावर त्याने आपले नियम रचिले. मनाला (आत्मपरहिताची) जी गोष्ट पटेल तिचाच स्वीकार विहीत, त्यांत दुराग्रहाचा भाग नसावा, असे तो सांगतो. दुराचरण करणाराला चिरकालीन शासनाचा बागुलबोवा किंवा अंधश्रध्दा ठेवणाराला पापमुक्ततेचे आमिष दाखविण्याचा यत्न करण्याचे त्याने मनांत सुध्दा आणिले नाही; पण प्रत्येक माणसाला त्याच्या बर्या-वाईट कर्माप्रमाणे फळ मिळावयाचेच, चुकावयाचे नाही, असे लोकांच्या मनावर बिंबवल्याने सदाचरणाविषयी स्फुर्ति व दुराचाराला प्रतिबंध व्हावा, पापाचरणाविषयीच्या मोहाचे पटल गळून पडावे, सत्याच्या प्रकाशाने दिव्य दृष्टि प्राप्त व्हावी व सर्वांची क्षणिक-नश्वर-सुखाची दृष्टि निघून ती चिरकालीन व शाश्वत सुखाकडे वळावी व माणसाचे हातून सदाचरण, परोपकार, धर्मकृत्ये, समाजसेवा इ. व्हावीत, अशी योजना बौध्दधर्माने करुन ठेविली आहे. अशा रीतीन धर्म आणि नीति यांचा मिलाप करुन ज्या बौध्दधर्माने त्याला व्यावहारीक स्वरुप दिले, त्याला एकांगी म्हणने ही निखालस चूक हाटली पाहिजे.

बौध्द पर्व
लेखक- वासुदेव गोविंद आपटे

No comments:

Post a Comment

सौन्दरनन्द-महाकाव्य, आज्ञा-व्याकरण, सर्ग १८

सौन्दरानन्द महाकाव्य, अष्टादश (१८ वां) सर्ग, आज्ञा-व्याकरण (उपदेश): अथ द्विजो बाल इवाप्तवेदः क्षिप्रं वणिक् प्राप्त इवाप्तलाभः । जित्वा च रा...